मोदी काहीच कसे बोलत नाहीत? ...'हे' नेमके काय चालले आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:23 AM2021-05-13T06:23:21+5:302021-05-13T06:24:06+5:30

मोदींनी मौन पत्करणे, भाजपच्या स्लिपिंग सेलने डोळे किलकिले करणे, ट्विटर सेनेने एक पाऊल मागे घेणे... हे नेमके काय चालले आहे?

How Modi is not saying anything | मोदी काहीच कसे बोलत नाहीत? ...'हे' नेमके काय चालले आहे?

मोदी काहीच कसे बोलत नाहीत? ...'हे' नेमके काय चालले आहे?

googlenewsNext

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

दोन मे रोजी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा लाजिरवाणा पराभव झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षरश: मौनकोशात गेले आहेत. कोरोनाविरुद्ध त्यांची अहोरात्र लढाई चालू असली तरी काही ट्विट्स वगळता त्यांनी जाहीर बोलणे टाळले आहे. या महामारीत देशात जे काय घडते आहे, त्याचे  दूरगामी राजकीय परिणाम काय संभवतात हे मोदी उत्तम जाणून आहेत. सध्या उडालेली देशाची दाणादाण हे मोदी विरोधकांना एकत्र येण्यास उत्तम निमित्त ठरेल आणि एकदा हे सुरू झाले की  थांबणार नाही. वाजपेयींविरुद्ध यूपीए १ तयार होताना २००४ साली सोनिया गांधी यांनी तडजोड केली होती, तशीच तडजोड  त्या पुन्हा करू शकतात. वाजपेयी सरकार त्यावेळी पदच्युत झाले होते. स्वत: पराभूत असतानाही सोनिया गांधी यूपीए ३ च्या नेतेपदी ममता किंवा अन्य कोणालाही निवडून हुकमी एक्का स्वत:कडे ठेवू शकतात. अर्थात, याला अजून पुष्कळ वेळ आहे, कारण लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत. 

वाराणसीच्या पंचायत निवडणुकांत झालेला पराभव ही मोदींची आणखी एक डोकेदुखी आहे. पंतप्रधान कार्यालयातील माजी सहकारी आणि उत्तर प्रदेश विधान परिषद आमदार ए. के. शर्मा यांच्या निगराणीत या निवडणुका झाल्या होत्या. 

 हे कमी म्हणून की काय देशातील न्यायव्यवस्था अचानक सक्रिय झाली आहे. निवडणूक आयोगातही दोन तट पडले आहेत. मुद्दाम निवडलेले काही नाणावलेले नोकरशहाही हलके हलके  आपला कणा दाखवू शकतात, हेच यातून सिद्ध होते.  तत्कालीन महालेखापाल विनोद राय यांनी मनमोहनसिंग सरकार एकहाती खाली आणले होते, हे विसरता कामा नये. - भाजपच्या स्लिपिंग सेलने हा सगळा संभाव्य धोका ओळखून ७ वर्षांनंतर डोळे किलकिले केले आहेत. निवडणुकीतील धक्क्यानंतर भाजपतील  ट्विटर सेना एक पाऊल मागे गेली आहे.

ममताही गप्प
नितीशकुमार यांनी २०१५ साली मोदी यांच्यापुढे जेवढी चिंता निर्माण केली होती त्यापेक्षा जास्त काळजीत ममतांनी मोदींना पाडले  आहे. बिहारमध्ये त्यावेळी मोदी यांना चांगला धक्का बसला आणि नितीशकुमार रातोरात राष्ट्रीय पटलावर आले; पण पुढे नितीश यांचे लालूंशी फाटले, आघाडी तुटली आणि अरुण जेटली यांनी नितीश यांना पुन्हा रालोआजवळ आणले. नितीश का आले हे कायम कोडे राहील. वास्तविक राहुल गांधी निकट आले असताना नितीश यांनी २०१९ साली मोदी याना चांगले आव्हान निर्माण केले असते. त्यांच्या काही बैठकाही झाल्या होत्या. काहीतरी अपरिहार्य घडले आणि नितीश पुन्हा रालोआच्या गोटात आले. २०२० साली भाजपने पुन्हा त्यांना  कोपऱ्यात ढकलले. एक प्रकारे नितीश यांनी किंमत मोजली. आता ते पुन्हा कुंपणावर जाऊन बसले आहेत. 

 ममता मात्र वेगळ्या मुशीत घडलेल्या आहेत. आपला लढाऊ बाणा त्यांनी दाखवून दिला आहे. त्याही काहीशा मोदींसारख्याच आहेत. 
एकट्या, स्वत:शीच राहणाऱ्या आणि हट्टी! पक्षाच्या बड्या नेत्यांना घोटाळ्यांनी वेढलेले असताना, निम्मे मोठे नेते भाजपच्या वळचणीला गेलेले असताही एकट्याने लढून त्यांनी आपल्या पक्षावर ओरखडाही उमटू दिला नाही. कोणत्याही अन्य विरोधी नेत्यापेक्षा ममता यांना आज अधिक विश्वासार्हता आहे.  नितीश यांना निदान  लालू किंवा भाजपचा आधार तरी घ्यावा लागला, ममता मात्र त्यांची लढाइ एकट्याने लढल्या. असे असूनही राष्ट्रीय प्रश्नांवर ममता मौनात गेल्या आहेत.

शरद पवार खोल ‘चिंतनात’ 
अलीकडच्या निवडणुकांनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही जरा बदल म्हणून कोशात गेलेले दिसतात. राष्ट्रवादीला तीन जागा सोडाव्यात म्हणून निवडणुकीआधी त्यांनी आपला दूत ममतांकडे पाठविला होता. आपला पक्ष दुखावेल असे कारण देऊन ममतांनी नम्र नकार दिला. आपली मागणी अव्हेरली जाणार नाही असे  पवार यांना वाटत होते. काँग्रेसविरोधात पवार यांच्या राष्ट्रीय स्वप्नांना ममता यांनी नेहमीच खतपाणी घातले आहे; परंतु पश्चिम बंगालमधल्या दणदणीत विजयाने ममता इतरांना बाजूला सारून एकट्या राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या झाल्या आहेत. कदाचित ममतांचे अभिनंदन करणारे पवार पहिले असतील; पण थोड्याच वेळात पक्षाकडून पत्रक काढून पवार विरोधी पक्षाच्या ऐक्यासाठी प्रयत्न करीत राहतील असे स्पष्ट करण्यात आले. त्या पत्रकावर मात्र अगदी शिवसेनेकडूनही प्रतिसाद आला नाही, शिवाय ममताही बोलल्या नाहीत, तेव्हापासून पवार खोल चिंतनात बुडालेले आहेत.
सरमानी भाजपचा हात कसा पिरगाळला? 

आसामात सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री व्हायचे होते; पण त्यांना बाजूला सारून हिमंत बिश्व सरमा कसे झाले, हे एक कोडेच वाटत होते. २०१५ साली राहुल गांधी यांची थट्टा करून सरमा काँग्रेस पक्षातून भाजपत आले तेव्हापासून ते या पक्षात वट जमवून आहेत. त्यावेळी अमित शहा पक्षाध्यक्ष होते. सरमा  त्यांचे आवडते. शहा त्यांच्या कार्यकाळात ईशान्य भारतात पक्षाचे खाते उघडण्यास फारच उत्सुक होते. सोनोवाल आसाम गण परिषदेतून भाजपत आले. नितीन गडकरी यांनी त्यांना पुढे आणले. 

२०१४ साली सोनोवाल यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. त्याच वेळी सरमा यांना ईशान्येत रालोआचे अध्यक्षपद देण्यात आले. भाजपचे ताकदवान सरचिटणीस राम माधव यांना हटवून सरमा यांनी तेथे त्यांचा माणूस आणला. यावेळी निवडणुकीत भाजपने आगप आणि यूपीपीएल यांना बरोबर घेतले. १२६ पैकी ९३ तिकिटे सरमा यांनी भाजपसाठी काढली. 

२०१६ च्या तुलनेत भाजपने १ टक्का मते गमावल्याचे निकालात दिसले. एकही जागा अधिक मिळाली नाही. सरमा यांच्या ४२ आमदारांनी दिल्लीला सांगावा धाडला की आमच्या नेत्याला धक्का लागता कामा नये... परिणाम उघडच होता!
 

 

Web Title: How Modi is not saying anything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.