राजकारणामुळे तरुणांची होरपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 04:02 AM2020-01-28T04:02:04+5:302020-01-28T07:02:11+5:30

भरपूर अनुभव घेतल्यावर आणि जीवनासंबंधी स्वत:चे विचार परिपक्व झाल्यावरच विद्यार्थ्यांनी राजकारणाकडे वळावे.

Horror of youth because of politics | राजकारणामुळे तरुणांची होरपळ

राजकारणामुळे तरुणांची होरपळ

googlenewsNext

- संतोष देसाई (माजी सीईओ फ्यूचर ब्रॅन्ड्स)

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि स्वत:चे भवितव्य घडविण्याचा सध्याचा काळ आहे. राजकारणात पडून त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये. राजकारणाच्या भूलभुलैयात विद्यार्थ्यांनी पडणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचा उपयोग स्वत:चे हित साधण्यासाठी राजकीय पक्ष करतात आणि विद्यार्थी त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. काही जण राष्ट्रविरोधी कृत्येसुद्धा करू लागतात. भरपूर अनुभव घेतल्यावर आणि जीवनासंबंधी स्वत:चे विचार परिपक्व झाल्यावरच विद्यार्थ्यांनी राजकारणाकडे वळावे.

सर्वच जण विद्यार्थ्यांना असा उपदेश करीत असतात. पण जी पिढी विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्याचा सल्ला देत असते, तिच्यातच अभ्यासपूर्ण विचार करण्याचा अभाव जाणवतो. काही शाळा, कॉलेजांचा अपवाद वगळता कोणतीही शाळा, कॉलेजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. पण कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना राजकारणाऐवजी अन्य सुखलोलुपतेकडेच अधिक प्रमाणात वळविले जाते. खरे सांगायचे तर सध्याच्या पिढीने परंपरेचा विचार करून कॉलेजातील वर्ग बुडवून मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे बघण्यात, मॉलमध्ये हिंडण्यात आणि मजनूगिरी करण्यात वेळ घालविला असता तर त्याबद्दल कुणी तक्रारही केली नसती. पण त्यांचे लक्ष राजकारणाकडे वळले आहे म्हणूनच प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यातही हे राजकारण जर विशिष्ट छापाचे असते तर त्याविषयी कुणी तक्रारही केली नसती. विद्यार्थी जर राजकारणी लोकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध उभे ठाकले असते तर त्याबद्दल कुणी चिंता व्यक्त केली असती का? सत्तारूढ पक्षाला तरुण विद्यार्थ्यांना राजकारणात ओढणे गैर वाटत नाही, जर त्यांनी सीएएच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आणि सीएएला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही म्हटले तर! सत्तारूढ पक्षाची विद्यार्थी संघटना अशी ओळख असलेली अभाविप अनेक आक्रमक गोष्टी करीतच असते आणि विद्यार्थ्यांच्या राजकारण प्रवेशावर आक्षेप घेणारे लोक त्यांना प्रोत्साहन देतच असतात!

राजकारणात उतरणारी ही पहिलीच पिढी आहे, असेही समजण्याचे कारण नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीतही विद्यार्थ्यांचा सहभाग होताच. १९७४ च्या नवनिर्माण आंदोलनात वानरसेना या नावाने ओळखली जाणारी विद्यार्थी संघटना सहभागी झाली होती. १९८० सालच्या मंडल आंदोलनातही विद्यार्थ्यांचा सहभाग होताच. पण आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर देशात जो चंगळवाद फोफावला त्यामुळे विद्यार्थी भोगवादाकडे अधिक प्रमाणात वळले.



ही गोष्ट त्याआधीच्या पिढीला आवडली नव्हती. पण आजचा विद्यार्थी हा राजकीय रंगात अधिक प्रमाणात रंगून गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता राजकारण टाळणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे, कारण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातच राजकारणाने प्रवेश केला आहे.
फॅशन, मनोरंजन आणि ब्रॅण्डिंगचे क्षेत्रसुद्धा राजकीय प्रभावापासून सुटलेले नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चश्म्यातूनच पाहिले जाऊ लागले आहे. त्यातूनच मलाला आणि ग्रेटा थनबर्ग जन्माला आल्या. आजची पिढी राजकारणाच्या प्रभावापासून दूर राहूच शकत नाही, अशी आजची अवस्था आहे.

आजच्या तरुणात राजकीय ऊर्मी मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्यांच्यात निर्लज्जपणा निर्माण करण्याचे काम सोशल मीडियाकडून मोठ्या प्रमाणात होत असते. सोशल मीडिया त्यांच्यात क्रोधाची भावनासुद्धा निर्माण करतो आणि त्यातून बलिदान करण्याची भावना तरुणांत निर्माण होत आहे. ही भावना त्यांना दीर्घकाळ लढा देण्याची प्रेरणा देत असते. त्याचा त्रास जुन्या पिढीला होत असतो. नैतिकतेचा उपदेश करण्याचा अधिकार जुनी पिढी स्वत:कडे घेते. तरुणाच्या भावनांना आजच्या राजकारणात कशा प्रकारे स्थान द्यावे हे राजकीय पक्षांना समजत नाही. पण भारतीय जनता पक्ष स्वत:कडे नीतिमत्तेचे पितृत्व घेत असल्याने नैतिकता शिकवण्याचा अधिकार आपल्यालाच आहे, अशी या पक्षाची धारणा आहे.

तो पक्ष आधुनिक जगाकडे संशयानेच बघत असतो. पायाभूत सोयींसाठी आधुनिकतेचा वापर करणे त्या पक्षाला गैर वाटत नाही, पण आधुनिक विचारांची मात्र त्या पक्षाला भीती वाटत असते. तरुणांनी केवळ ऐकण्याचे आणि अनुकरण करण्याचे काम करायचे असते, अशी त्या पक्षाची धारणा आहे. तरुणांचा वापर त्यांच्या बळासाठी करावा, विचारांसाठी नव्हे, असे त्या पक्षाला वाटते. त्यामुळे तो पक्ष तरुणांनी व्हॅलेन्टाइन डे ‘हा पेरेन्ट रिस्पेक्ट डे’ म्हणून पाळावा, असे त्या पक्षाला वाटत असते. तसे करीत असताना वस्तुस्थितीकडे मात्र त्या पक्षाचे दुर्लक्ष होत असते.

वास्तविक आजच्या तरुणांसाठी त्यांनी निषेध व्यक्त करावा, अशा अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत. तरुणांच्या अपेक्षा आणि वाढती बेरोजगारी या गोष्टी कोणत्याही क्षणी ठिणगी पेटवू शकतात. घटनाकारांनी ज्या ज्या संस्था निर्माण केल्या होत्या, त्या सर्व नष्ट करण्याचे काम नंतरच्या पिढ्यांनी केले आहे आणि त्याची किंमत चुकविण्याचे काम आजच्या पिढीला करावे लागत आहे. आपल्या विधिलिखितावर स्वत:चे नियंत्रण असावे, असा प्रयत्न आजच्या पिढीकडून केला जात आहे आणि त्यांना थोपवून धरणे हे सोपे नाही.

 

Web Title: Horror of youth because of politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.