अस्सल बंगाली, प्रणवदांनी जे दिले, ते केवळ अनमोल आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:19 AM2020-09-01T05:19:13+5:302020-09-01T05:19:56+5:30

प्रणवदा पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनले, तेव्हा मी शाळेत होतो. म्हणजे आमच्या पिढीला ते इतके ज्येष्ठ. पण या ज्येष्ठतेचा धाक त्यांनी ना त्यांच्या वर्तनातून कधी दाखवला, ना त्यांच्या विचारात तो होता.

Genuine Bengali, what Pranavada gave is just priceless! | अस्सल बंगाली, प्रणवदांनी जे दिले, ते केवळ अनमोल आहे!

अस्सल बंगाली, प्रणवदांनी जे दिले, ते केवळ अनमोल आहे!

Next

- सीताराम येचूरी
माकपा नेते

प्रणवदांच्या निधनाने भारताच्या राजकीय अवकाशात निर्माण झालेल्या पोकळीची कल्पना करता येणेही अशक्य आहे. प्रणवदा पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनले, तेव्हा मी शाळेत होतो. म्हणजे आमच्या पिढीला ते इतके ज्येष्ठ. पण या ज्येष्ठतेचा धाक त्यांनी ना त्यांच्या वर्तनातून कधी दाखवला, ना त्यांच्या विचारात तो होता. प्रणवदांशी मतभेदांचे प्रसंग काही कमी आले नाहीत. आणीबाणीच्या काळात त्यांच्याशी अनेकदा वादविवाद झडल्याचेही मला आठवते. त्यांचा-माझा सहवास चाळीस वर्षांचा! अनेक शिष्टमंडळांचा सदस्य म्हणून प्रणवदांशी मतभेद होण्याचे आणि ते व्यक्त करावे लागण्याचे प्रसंग माझ्यावर आले. विशेषत: विश्व व्यापार संघटनेची स्थापना आणि डंकेलला पाठिंबा असलेल्या देशांच्या गटात भारताचा समावेशाच्या वेळी व्यापार मंत्री म्हणून प्रणवदा चर्चांमध्ये आघाडीवर असत, आणि मी त्यांच्या विरोधात! मात्र प्रणवदांबरोबर अधिक जवळून काम करण्याची संधी मला मिळाली ती वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात! 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशातल्या धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करण्याच्या, विरोधी पक्षीयांची एकजूट घडवण्याच्या कामात प्रणवदांबरोबर चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या. त्याचवेळी आंध्र प्रदेश विधानसभेची निवडणूकही लागली होती. आंध्र प्रदेशात कॉंग्रेसबरोबर आघाडीच्या चर्चा करताना प्रणवदांनीच कॉंग्रेसच्या समितीचे नेतृत्व केले होते. मला आठवते, एकदा आघाडीच्या जागावाटपाची बैठक चालू होती. वातावरण काहीसे तापले होते. त्या बैठकीतून अचानक प्रणवदांनी मला बाजूला बोलावून घेतले आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी का?- यावर सल्ला विचारला. मी त्यांना म्हटले, मी तुमच्यापेक्षा राजकारणात किती कच्चा आहे, मी कसा तुम्हाला सल्ला देऊ?
- पण प्रणवदा ऐकायला तयार नव्हते. त्यांनी आग्रहच धरला तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘तुम्हाला विजयाची पूर्ण खात्री असेल, तरच निवडणूक लढवण्याचा विचार करा!’ प्रणवदांनी ती निवडणूक लढवली आणि जिंकलीही! पुढे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे एक शिल्पकार म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
मी संसदेच्या सभागृहात यावे याबद्दल प्रणवदा फार आग्रही होते. अखेरीस 2005 साली पक्षाच्या आग्रहावरून मी राज्यसभेचा सदस्य झालो, तेव्हा प्रणवदांनीच माझा हात धरून संसदीय रीतीभातीं आणि संकेतांचे शिक्षण मला दिले. आमच्यातला संवाद अखंड चालू राहिला. मतभेद होतेच. ते संसदेच्या सभागृहात, बाहेरही व्यक्त होत, पण तो आमच्या स्नेहातला अडसर मात्र बनला नाही.
2008 च्या जागतिक मंदीच्या अरिष्टातून भारतीय अर्थव्यवस्था वाचली याचे श्रेय इंदिरा गांधींनी केलेल्या बैंकांच्या राष्ट्रीयीकरणाला आहे’, अशा अर्थाचे प्रतिपादन एकदा प्रणवदा राज्यसभेत करत होते. मी मध्येच उभा राहिलो आणि मतभेद व्यक्त केला. भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्यावरून डाव्या पक्षांनी युपीए सरकारचा पाठिंबा नुकताच काढला होता. मी म्हणालो, बैंकांचे राष्ट्रीयीकरण करावे ही अट घालूनच डाव्या पक्षांनी तेव्हा इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता, हे विसरू नका. कॉंग्रेसने जेव्हा जेव्हा डाव्यांचे ऐकले आहे, तेव्हातेव्हा या पक्षाचा आणि सरकारांचा फायदाच झाला आहे!
नुक्त्याच घडून गेलेल्या वादळामुळे राज्यसभेत पुन्हा एकदा हलकल्लोळ सुरू झाला, पण प्रणवदांनी जराही तोल जाऊ न देता मला माझे म्हणणे मांडू दिले, एवढेच नव्हे, तर माझ्या मुद्यांमध्ये भरही घातली. हे संसदीय सौजन्य ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची आगळीच शान होती.
राष्ट्रपती झाल्यानंतर प्रणवदांनी पहिला दौरा केला तो बांग्लादेशचा. ते बांग्लादेशचे जावई. त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. बंगाली भाषा, संस्कृती आणि राजकारण याबद्द्लचे त्यांचे ज्ञान आणि समज अचंबा वाटावा इतकी खोल होती. दरवर्षी नवरात्रात प्रणवदा त्यांच्या गावाला जाऊन ‘पूजा’ महोत्सवात सहभागी होत. यामागे त्यांची व्यक्तीगत धार्मिक निष्ठा होती, तसाच बंगाली संस्कृतीबद्द्लचा विलक्षण आदरही होता! गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मगावाला भेट देण्यासाठी आम्ही गेलो, तेव्हा गुरुदेव नदीच्या पलीकडे एकांतात लिहायला जात असत, तिथे बोटीतून आम्हाला घेऊन चला म्हणून प्रणवदांनी आग्रह केला होता... त्यांची आठवण सदैव येत राहील...

Web Title: Genuine Bengali, what Pranavada gave is just priceless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.