चीनशी मैत्री ठीक, पण विश्वास कसा ठेवावा?

By विजय दर्डा | Published: October 14, 2019 05:24 AM2019-10-14T05:24:57+5:302019-10-14T05:27:18+5:30

मोदी - शी जिन पिंग यांच्या मनोमिलनाचा अन्वयार्थ पाहायला हवा

Friendship with China OK, but how to trust? | चीनशी मैत्री ठीक, पण विश्वास कसा ठेवावा?

चीनशी मैत्री ठीक, पण विश्वास कसा ठेवावा?

googlenewsNext

इतिहासात पूर्वी एकेकाळी तामिळनाडूमधील महाबलीपूरम येथून भारत आणि चीन यांच्यात सागरी मार्गाने व्यापार होत असे. त्याच महाबलीपूरममध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनौपचारिक शिखर बैठकीत दोन दिवस व्यक्तिगत पातळीवर विचार-विमर्श केला, तेव्हा दोन्ही देशांतील मैत्री अधिक घनिष्ठ होत असल्याचा संदेश त्यातून जरूर दिला गेला. पण खरेच वास्तव तसे आहे?


अनुभवावरून तरी असे दिसते की चीन या देशाची वाटचाल कोणी विश्वास ठेवायला तयार नाही अशी असते! चीनने जवळीक केली तरी कुठे तरी मनात शंका येतेच. त्यामुळे या वाढत्या दोस्तीच्या वातावरणात चीनशी असलेले तंटे व वाद मिटतीलच, असा समज करून घेणे म्हणजे भ्रमात राहणे ठरेल. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात ‘हिंदी चीनी भाई भाई’ असे म्हणत केलेल्या आक्रमणापासून ते आता जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम ३७0 रद्द केल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेण्यापर्यंतच्या वागणुकीवरून चीनने हेच दाखवून दिले आहे की, तो आपला मित्र कधीच नव्हता व मैत्रीची त्याची इच्छाही नाही.


चीनला भारताविषयी प्रेम नाही तर येथील अफाट बाजारपेठेवर त्याची नजर आहे. चीनला त्यांचा माल भारतात जास्तीत जास्त विकायचा आहे. ज्यात चीन मागे आहे असे उत्पादनाचे एकही क्षेत्र नाही. तेथील महाकाय कारखाने पाहिले की, मती गुंग होऊन जाते. अनेक बाबतीत तर चीन आता जगातील प्रमुख उत्पादक देश बनला आहे. म्हणूनच जगभरातील १५२ देशांना व्यापारी मार्गांनी जोडण्याची ‘वन बेल्ट, वन रोड’ ही महत्त्वाकांक्षी योजना चीनने आखली. त्यात भारत नसला तरी इतर अनेक देश सहभागी झाले आहेत. आपला माल विकत घेण्यासाठी चीनने अनेक देशांना मोठी कर्जे देणेही सुरू केले आहे. चीनची जोरदार घोडदौड सुरू आहे. पण यातून खटके उडून चीन व अमेरिकेत आता व्यापारयुद्धास तोंड फुटले आहे. अशा परिस्थितीत भारताशी मैत्री वाढवणे ही चीनची अपरिहार्य गरज बनली आहे. अमेरिकेशी होणाऱ्या व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी चीनला भारतासारखी अन्य बाजारपेठ कुठे मिळणार? भारताशी होणारा व्यापार वर्षाला २00 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचा चीनचा मनसुबा आहे. वर्ष २0१८-१९ मध्ये भारत व चीन यांच्यात ८८ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. त्यात भारताचा व्यापार घाटा ६३ अब्ज डॉलरचा होता. चीनकडून भारत प्रामुख्याने विद्युत उपकरणे, कार्बनी रसायने इत्यादीची आयात करतो, तर चीन भारताकडून खनीज, काही औषधे व कापूस घेतो. हा द्विपक्षीय व्यापार लवकरच १00 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.


आयटी, फलोत्पादन, कापड, रसायने, दुग्धोत्पादन इत्यादी क्षेत्रात आपण मजबूत स्थितीत आहोत वा यासंबंधीच्या जागतिक बाजारातही आपला चांगला जम असल्याने, हा माल चीननेही खरेदी करावा, असे भारताचे म्हणणे आहे. भारताने अशा ३८0 उत्पादनांची यादीही चीनकडे सुपुर्दं केली आहे. चीन कधी आश्वासन देतो तर कधी मौन बाळगून बसतो. कधी आमिषे दाखवतो. सध्या चीनची भारतातील गुंतवणूक सुमारे ८ अब्ज डॉलर एवढी आहे. चीनच्या संपूर्ण जगातील गुंतवणुकीच्या फक्त अर्धा टक्का एवढी ती आहे. ही गुंतवणूक २0 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे आश्वासन चीनने दिले असले तरी हा आकडा किमान ५0 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचावा, अशी भारताची इच्छा आहे. यासाठी भारत चीनवर कायम दबाव आणत असतो. सध्या व्यापारावरून चीनचे अमेरिकेशी बिनसले असल्याने भारताला थोडी आशा आहे. पण यासाठी केवळ दबाव पुरेसा नाही. चीनशी खºया अर्थी मुकाबला करायचा असेल तर भारताला कमीतकमी खर्चात दर्जेदार मालाचे उत्पादन करणारा देश म्हणून आपली ओळख निर्माण करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचे अनेक वेळा सांगितले आहे. त्याचा त्वरेने अंमल होणे गरजेचे आहे. ज्याने चीनची गरज भागविली जाऊ शकेल अशा क्षेत्रात आपल्याला अधिक लक्ष द्यावे लागेल. उदाहरणार्थ, चीन दरवर्षी ४५0 अब्ज डॉलरची विद्युत यंत्रसामग्री व ९७ अब्ज डॉलरची वैद्यकीय उपकरणे आयात करतो. भारताला चीनमध्ये निर्यात वाढवता येईल अशी आणखी बरीच क्षेत्रे आहेत. आपल्याला त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन खास प्रयत्न करावे लागतील.


चीनशी असलेला आपला सीमातंटा अद्याप सुटलेला नाही, याचा व्यापारवाढीवर फारसा परिणाम होणार नाही. हा वाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्या नियमित बैठका होत असतात. एकीकडे व्यापारही सुरू आहेच! भविष्यात भारत हाच आपला प्रमुख स्पर्धक असेल याची पूर्ण जाणीव असल्याने भारतावर अंकुश ठेवण्याचा चीन प्रयत्न करणार हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. भारताकडे प्रचंड बाजारपेठ आहे, पैसा व साधनेही उभी राहत आहेत. त्यामुळे एक दिवस भारत आपल्याला टक्कर देण्याच्या स्थितीत नक्की येईल, हे चीन पक्के ओळखून आहे.

Web Title: Friendship with China OK, but how to trust?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.