Follow-up by former Chief Minister | माजी मुख्यमंत्र्यांकडून स्वकीयांची पाठराखण

माजी मुख्यमंत्र्यांकडून स्वकीयांची पाठराखण

मिलिंद कुलकर्णी
कोरोना काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी जळगावला भेट देऊन कोविड रुग्णालयाची पाहणी केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन काही सूचना केल्या. विरोधी पक्षनेते या नात्याने त्यांची भेट आणि त्यांनी केलेल्या सूचना या योग्य आणि समर्थनीय आहेत. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी, पालिकांचे पदाधिकारी यांनाही थोडे अनुभवाचे दोन शब्द सांगितले असते तर जनतेच्यादृष्टीने ते न्याय्य ठरले असते.
राज्य सरकारचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांचे बहुतांश मंत्री कोरोना काळात घराबाहेर पडत नसल्याने सामान्य जनतेमध्ये तीव्र भावना आहेत. मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे नियंत्रण नसले की, प्रशासकीय यंत्रणा सामान्य जनतेला जुमानत नाही. राष्टÑीय आपत्तीमुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अचाट निर्णय घेतले जातात. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता या नात्याने संपूर्ण महाराष्टÑाचा दौरा करण्याची कृती वाखाणण्यासारखी आहे. विरोधी पक्षनेत्याचा दरारा आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य महाराष्टÑाने बºयाच वर्षाने पुन्हा एकदा अनुभवले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्या दौºयाला काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध करणे स्वाभाविक आहे. सरकार आणि प्रशासनाचे वाभाडे काढण्यासाठी ते आल्याने सत्ताधारी पदाधिकाºयांना ते रुचणार नव्हतेच.
जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले असताना फडणवीस यांनी यायला नको, असाही सूर सत्ताधारी मंडळींकडून लावला गेला. अर्ध्या महाराष्टÑात लॉकडाऊन सुरु असताना विरोधी पक्षनेते असो की, मंत्री यांनी फिरुच नये, असा याचा अर्थ झाला. एकमात्र खरे की, राजकीय नेते आले की, त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा अकारण होत असतो. किमान कोरोना काळात तरी शारीरिक अंतराचे भान ठेवायला हवे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे असो की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, दोन्ही नेत्यांभोवती गर्दी जमली होतीच. कोरोनापश्चात सर्वच क्षेत्रात बदल होत असताना राजकारणात मात्र काही बदलणार नाही, असे यावरुन तरी स्पष्ट झाले.
जळगाव जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आहे. अहवाल २४ तासात यायला हवे. तपासणीची संख्या वाढायला हवी, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या. त्या रास्त आहेत. देशापेक्षा चौपट मृत्यूदरामुळे जळगाव आधीच बदनाम झालेले असताना या गोष्टींमध्ये यंत्रणेत बदल झाला तरी सुधारणा अद्याप झालेली नाही. जिल्हाधिकारी व अधिष्ठाता बदलले म्हणजे सगळी यंत्रणा बदलली असे होत नाही. एकदम चमत्कार होईल, अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. फडणवीस यांनी अपेक्षा व्यक्त करणे योग्य आहे. मात्र यासोबत त्यांनी स्वकीयांना काही प्रश्न विचारायला हवे. फडणवीस यांचे उजवे हात असलेले गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले. त्यांनीच अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे आणि इतर वैद्यकीय अधिकारी याठिकाणी आणले. हे महाविद्यालय कोविड रुग्णालय केल्यानंतर उपचार, औषधी आणि यंत्रसामुग्री या तिन्ही पातळीवर सपशेल अपयशी ठरले. दोनशेहून अधिक वैद्यकीय अधिकारी याठिकाणी तैनात असताना प्रत्यक्ष कामावर ५० देखील अधिकारी नसल्याचे उघड झाले. अनेक यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. व्हेंटीलेटर नाहीत. मालती नेहेते या वृध्देचा मृत्यू हा तर या ठिकाणच्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा बळी होता. भाजप आणि महाजन यांची सत्ता गेली तरी जळगाव जिल्ह्यात त्या काळातील अधिकारी तैनात होते आणि अप्रत्यक्ष महाजन आणि त्यांच्या आरोग्यदूतांची सत्ता रुग्णालयात अबाधित होती. ेएकूण ३१५ मृत्यूंपैकी २३१ मृत्यू या रुग्णालयात झालेले आहेत. त्याविषयी फडणवीस यांनी बोलणे अपेक्षित होते.
भाजपची सत्ता असलेल्या पालिका आणि आमदार असलेल्या मतदारसंघात कोरोना स्थिती बिकट आहे. रुग्ण आणि मृत्यूसंख्येचा आढावा घेऊया. जळगाव : रुग्ण : १२७२ (मृत्यू: ५९), भुसावळ : ५२९ (५१), अमळनेर : ४५२( ३०), एरंडोल : २७४ (१०), जामनेर : २९३ (२२), पारोळा : ३०१ (०७), चाळीसगाव : ११७ (०८), मुक्ताईनगर : १२८ (०४), बोदवड : १७२ (०५). अशी स्थिती असतानाही जळगाव महापालिका रुग्णांसाठी आवश्यक असलेली औषधी व सामुग्री विकत घेण्यासाठी दोन आमदारांनी दिलेला एक कोटींचा निधी महिना उलटूनही खर्च करु शकलेली नाही. गिरीश महाजन यांनी रिलायन्सच्या मदतीने जामनेरला उभारलेले रुग्णालय आणि जळगावात पालिकेच्या नानीबाई रुग्णालयाचे अत्याधुनिकरण अद्याप झालेले नाही. जनतेला ते उपयोगी पडलेले नाही. पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक फडणवीस यांच्या दौºयातच जनतेला दिसले. तीन महिन्यापासून तेही घरात आहेत. त्यांनाही वडिलकीच्या नात्याने तंबी दिली असती तर जनतेचे भले झाले असते.

Web Title: Follow-up by former Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.