समीकरणे बदलत असल्याने निकालाविषयी उत्कंठा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:16 PM2019-10-16T22:16:46+5:302019-10-16T22:17:36+5:30

नवनव्या घडामोडींमुळे उलटफेर

As the equations change, curiosity about the outcome persists | समीकरणे बदलत असल्याने निकालाविषयी उत्कंठा कायम

समीकरणे बदलत असल्याने निकालाविषयी उत्कंठा कायम

Next

मिलिंद कुलकर्णी
विधानसभा निवडणुकीत खान्देशातील २० मतदारसंघात रोज समीकरणांमध्ये बदल होत आहे. नवनव्या घडामोडींमुळे उलटफेर होत आहे. एखाद्या उमेदवाराचा वरचष्मा वाटत असताना दोन दिवसात असे काही तरी घडते की, त्या उमेदवाराला पुन्हा नव्याने मांडणी करावी लागत आहे.
रणांगणातील रणनीतीसुध्दा बदलत आहे. प्रतिस्पर्धी असलेला उमेदवार पाठिंबा द्यायला पुढे येतो. प्रचारात सहभागी होतो. विरोध अचानक कसा मावळला हा प्रश्न मतदाराला पडतो. पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे तत्त्व मतदाराच्या तोंडावर फेकले जाते. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या गोटातील काही मंडळी रात्रीच्या अंधारात मदतीचा हात पुढे करतात, तेव्हा ही मैत्री आहे की, फसवे जाळे आहे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
प्रतिस्पर्धी उमेदवार दुबळा आहे, आर्थिकदृष्टया कमकुवत आहे, पक्षातील मंडळी सहकार्य करीत नाही, असे चित्र असताना शेवटच्या टप्प्यात त्याचा आत्मविश्वास दुणावलेला दिसतो. प्रचार फेऱ्यांमध्ये गर्दी वाढलेली असते. वाहनांची संख्या वाढते. पडद्याआडून सूत्रे हलविली जात असल्याची कुजबूज कानावर येऊ लागते. विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवाराचा जीव भांड्यात पडतो. पुन्हा नव्याने मांडणी करुन पहिल्या दिवसासारखा तो प्रचाराला लागतो.
अशी साधारण निरीक्षणे खान्देशात फिरल्यानंतर, राजकीय मंडळी, माध्यम व्यवसायातील मित्र, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी झालेल्या चर्चेनंतर समोर आली.
नंदुरबार जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घडामोडींनी राजकीय पंडित देखील अचंबित झालेले आहेत. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर मिरविणारे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत गेले. चारपैकी अक्कलकुवा ही जागा सेना लढवत आहे. स्वत: जिल्हाप्रमुख आमशा पाडवी उमेदवार आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तेथे सभा घेतली. परंतु, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी तेथे बंडखोरी केली. काँग्रेसचे प्रवक्ते अ‍ॅड.के.सी.पाडवी हे आठव्यांदा याठिकाणी नशिब अजमावत आहेत. शहादा मतदारसंघात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू आणि राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी हे खडसे गटाचे असल्याने त्यांचे तिकीट कापून पूत्र राजेश पाडवी यांना देण्यात आले. त्यांचा सामना काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्याशी होत आहे. नवापूरमध्ये वारसदारांमधील लढाई रंगतदार झाली आहे. खासदारकीचा विक्रम करणारे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची लढत काँग्रेसचे माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र व आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक यांच्याशी होत आहे. याठिकाणी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे बंधू व सुरुपसिंग नाईक यांचा २००९ मध्ये पराभव करणारे शरद गावीत हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. नंदुरबारात भाजपचे डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासमोर काँग्रेसने अचानक आमदार उदेसिंग पाडवी यांना उभे केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपददेखील त्यांच्याकडे सोपविले.
धुळे जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. प्रत्येक ठिकाणी चुरस आणि रंगतदार लढती आहेत. धुळ्यात हिलाल माळी हे एकमेव राष्टÑीय पक्षाचे उमेदवार आहेत. दोन माजी आमदार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. २०१४ मध्ये हे दोघे आमने सामने होतेच, पण पुरस्कृत पक्षाची अदलाबदल झाली आहे. अनिल गोटे यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेस आघाडीचे समर्थन घेतले. राजवर्धन कदमबांडे हे राष्टÑवादीचे असले तरी अलिखित कराराप्रमाणे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते, महापालिकेतील पदाधिकारी उघडपणे त्यांचा प्रचार करीत आहेत. युती याठिकाणी संकटात आहे.
धुळे ग्रामीण मतदारसंघात दोन राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला आली आहे. रोहिदास पाटील यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या या मतदारसंघात कुणाल पाटील हे वारसा चालवत आहे. माजी आमदार द.वा.पाटील यांच्या स्रुषा ज्ञानज्योती भदाणे या भाजपच्या उमेदवार आहेत. नातेगोते, शिक्षणसंस्था हे मुद्देदेखील निवडणुकीवर प्रभाव टाकत आहे.
साक्री या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे विद्यमान आमदार डी.एस.अहिरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असताना ऐनवेळी माशी शिंकली. प्रवेशानंतरही उमेदवारीविषयी अनिश्चितीतता असल्याने अहिरे यांनी प्रवेश टाळल्याची चर्चा आहे. मात्र त्यांचे खंदे सहकारी जि.प.चे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते भाजपमध्ये गेले. भाजपने याठिकाणी भाकरी फिरवली. दोनदा पराभूत झालेल्या माजी महापौर मंजुळा गावीत यांच्याऐवजी मोहन सुर्यवंशी यांना उमेदवारी दिली. गावीत यांनी बंडाचे निशाण फडकवले. त्यांना अहिरे विरोधक असलेल्या काँग्रेसजनांनी मदत केली आहे.
शिरपुरातदेखील नेमके असेच घडले. काँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल भाजपमध्ये गेल्याने त्यांचे सहकारी व विद्यमान आमदार काशीराम पावरा यांना भाजपची उमेदवारी मिळाली. गेल्यावेळी भाजपकडून उमेदवारी केलेले डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी बंडाचा झेंडा फडकवला. काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार शोधला.
शिंदखेड्यात मंत्री जयकुमार रावळ आणि राष्टÑवादीचे संदीप बेडसे यांच्यात गेल्यावेळेसारखी लढत होत आहे. काँग्रेसचे श्यामकांत सनेर यांनी आघाडीधर्म पाळत उमेदवारी केलेली नाही. तर सेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.

Web Title: As the equations change, curiosity about the outcome persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.