Rajeev Satav : महाराष्ट्र काँग्रेसच्या तरुण स्वप्नांचा अंत..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:03 AM2021-05-16T11:03:41+5:302021-05-16T11:07:26+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी ते एकदा माझ्या घरी आले होते. तीन-चार तास वेगवेगळ्या विषयावर गप्पा झाल्या. त्या वेळी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील होते

End of young dreams of Maharashtra Congress ... article on rajeev satav by atul kulkarni lokmat | Rajeev Satav : महाराष्ट्र काँग्रेसच्या तरुण स्वप्नांचा अंत..!

Rajeev Satav : महाराष्ट्र काँग्रेसच्या तरुण स्वप्नांचा अंत..!

Next

अतुल कुलकर्णी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी लायक असणारे, आणि संधी मिळाली असती तर त्याचे सोने करू शकणारे नेतृत्व, म्हणजे राजीव सातव. आज ते आपल्यात नाहीत. कोरोनाने एका अत्यंत उमद्या तरुण नेतृत्वाचा बळी घेतला आहे. कुठलाही गर्व नसणारा आणि मनमोकळा असा हा नेता होता. लोकसभेच्या काँग्रेसमध्ये ज्यावेळी दोनच जागा निवडून आल्या, त्यात एक राजीव सातव होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे तसे फारसे राजकीय सूर जुळले नाहीत. मात्र जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या विकासासाठी दोघे एकत्र असायचे. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी ज्या ज्या वेळी नावे चर्चेत आली, त्या वेळी राजीव सातव हे प्रमुख नाव होते. 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी ते एकदा माझ्या घरी आले होते. तीन-चार तास वेगवेगळ्या विषयावर गप्पा झाल्या. त्या वेळी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील होते. गुजरात मध्ये आपण कशा पद्धतीने यश मिळवू शकतो, हे पटवून देणारा त्यांचा दुर्दम्य आशावाद त्या पोलिस अधिकाऱ्याला ही आश्चर्य चकित करणारा होता. गुजरात मध्ये तुम्ही यश कसे मिळवाल? असा प्रश्न विचारल्यावर राजीव सातव म्हणाले होते, आम्ही खूप मनापासून मेहनत करत आहोत. या निवडणुकीत नाही तर पुढच्या निवडणुकीत आम्ही नक्की यश मिळवू. ते सांगताना गुजरात मधल्या प्रत्येक मतदार संघाची माहिती त्यांना मुखोद्गत होती. आकडेवारी माहिती होती. जातीय, पक्षीय समीकरणे माहिती होती, आणि ते खाडखाड सगळी माहिती देत होते.

तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे असे ते सतत बोलून दाखवायचे. तुम्ही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद का घेत नाही? असे सतत त्यांना आम्ही बोलायचो. त्या त्या वेळी ते, मी गुजरातमध्येच बरा आहे, असे म्हणायचे. महाराष्ट्रातील काँग्रेसने त्यांच्यापासून का अंतर ठेवले होते. जर ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, आणि यदाकदाचित महाराष्ट्रात काँग्रेसला संधी मिळाली असती, तर ते महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार झाले असते. इतके नेतृत्वगुण राजीव सातव यांच्यात होते. महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वाविषयी ते खुलेपणाने बोलायचे. आपल्याला संधी मिळाली तर आपण महाराष्ट्रात काय करू शकतो हे देखील ते खाजगीत मोकळेपणाने सांगायचे. राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासातले, मात्र आपण त्यांच्या जवळ आहोत, याचा कोणताही अहंपणा न बाळगणारा असा हा नेता होता. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात अनेकदा राजीव सातव यांच्याशी बोलणे झाले. त्यानंतरही अनेकदा या सरकारच्या भवितव्याविषयी चर्चा व्हायची. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय कसा घेतला? असा प्रश्न विचारला की राजीव सातव म्हणायचे, आम्ही जर हा निर्णय घेतला नसता तर महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था काय झाली असती..? आज आम्ही संख्येने कमी आहोत. आम्हाला काँग्रेस वाढवायची आहे. त्यासाठी आम्ही सत्तेत असणं आवश्यक आहे, आणि या सगळ्या पलीकडे भाजपला दूर ठेवण्यात आम्ही यशस्वी होत असू तर का सत्तेत जायचे नाही? अशी स्वच्छ, स्पष्ट भूमिका ते बोलून दाखवायचे.

राजीव सातव यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, प्रसंगी केंद्रातही यावे, या दृष्टीने त्यांचे नेतृत्व घडवण्याचे काम दिल्लीतूनही होत होते. त्यांना तशी ताकद दिली जात होती. पण नियतीला ते मान्य नव्हते. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या पहिल्या फळीच्या नेत्यानंतर तरुण पिढीचा नेता म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते. महाराष्ट्रात काँग्रेसचा तरुण नेता कोण? या प्रश्नाचे पहिले उत्तर राजीव सातव होते. ज्या ज्या वेळी आम्ही भेटलो त्या त्या वेळी मला एक गुण त्यांचा आवडला, तो म्हणजे निगर्वीपणा. राजीव सातव मध्ये कधीही गर्व नव्हता. अहंपणा नव्हता. पाय जमिनीवर होते. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कार ज्यावेळी राजीव सातव यांना मिळाला, त्यावेळी "मी या पुरस्काराएवढे काम केले आहे का?" असा सहज सुलभ प्रश्न त्यांनी मला केला होता. काँग्रेस पक्षाच्या राजकारणात राहूनही इतका नम्रपणा खचितच पाहायला मिळतो, जो राजीव सातव यांचा खूप मोठा गुण होता. राजीव सातव युवा नेते होते, त्यांचे निधनामुळे कधीही भरून न येणारे नुकसान झाले, या पद्धतीच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. पण खर्‍या अर्थाने काँग्रेसचे पुढच्या वीस वर्षाचे नुकसान राजीव सातव यांच्या जाण्याने झाले आहे. नेतृत्व एका रात्रीतून तयार होत नाही. राजीव सातव यांनी कष्टाने हे नेतृत्व उभे केले होते. लोकांना जोडत जोडत त्यांनी दिल्लीपर्यंत मजल मारली होती. कोरोनाने हे नेतृत्व संपवले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे पुढच्या वीस वर्षाचे नुकसान झाले आहे. त्या सोबतच तरुणांनी राजकारणात येण्याच्या इच्छा आकांक्षांचेही मोठे नुकसान त्यांच्या जाण्याने झाले आहे. या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली...

Web Title: End of young dreams of Maharashtra Congress ... article on rajeev satav by atul kulkarni lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.