अखेर का झाली काँग्रेसची अशी दुर्दशा?

By विजय दर्डा | Published: June 3, 2019 04:05 AM2019-06-03T04:05:30+5:302019-06-03T04:06:23+5:30

यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पाच वर्षे सुरळीत पार पडली. नंतरचा पाच वर्षांचा काळ हातून गेला. राहुल गांधी पंतप्रधान बनण्यास तयार नव्हते

Editorial Why was it such a plight of the Congress? | अखेर का झाली काँग्रेसची अशी दुर्दशा?

अखेर का झाली काँग्रेसची अशी दुर्दशा?

googlenewsNext

विजय दर्डा

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कठोर परिश्रम घेतले यात शंका नाही. मात्र, निकाल काय लागला? काँग्रेस अतिशय वाईट पद्धतीने का पराभूत झाली? राहुल गांधी यांनी अमेठीत पराभूत होणे ही काय एखादी लहान घटना आहे? या निवडणुकीत मोदींची लहर नव्हे त्सुनामी होती. या त्सुनामीचाही अखेरपर्यंत पत्ता लागला नाही, हे सांगत हात झटकता येणार नाहीत. पराभवाचे एक कारण मोदींची त्सुनामी हे असू शकते. मात्र, असा दारुण पराभव ही संघटनात्मक विफलता नाही काय?
मला जेव्हापासून समजू लागले, तेव्हापासून मी काँग्रेसला अगदी जवळून बघत आलो आहे. त्यानंतर, संसदीय राजकारणात १८ वर्षे राहण्याची संधीही मिळाली. काँग्रेसची मुळे गावागावात असतानाचा काळ मी चांगल्या रीतीने जाणून आहे. जिल्ह्याचा काँग्रेस अध्यक्ष काही सांगत असेल, तर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात होते. त्यांनी कुणाला तिकीट देऊ नये असे सुचविले, तर ते मान्य केले जात होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय यासारखे महत्त्वपूर्ण अंग होते. संघटनेत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, बी. पी. सीतारमैया, वीर वामनदादा जोशी, तुकडोजी महाराज, मोरारजी देसाई यांच्यासारखे लोक होते.

जे वेळप्रसंगी सतरंजीही अंथरत होते. सरोजिनी नायडू, कमला नेहरू, अरुणा असफअली आणि इंदिरा गांधी महिला काँग्रेसमध्ये अत्यंत सक्रिय होत्या. निवडणूक काळात लोक स्वत:च्या गाड्या घेऊन, स्वत:चे पेट्रोल खर्चून प्रचार करत. समर्पित कार्यकर्ते असत. १९६६ पर्यंत संघटनेत कार्यकर्त्याला महत्त्व होते. नंतर त्यांची जागा कॉन्ट्रॅक्टरनी घेतली. सभेच्या गर्दीचे काम कॉन्ट्रॅक्टरकडे दिले गेले. १९८५ ते १९९० या काळात बॅग संस्कृतीने जन्म घेतला. काँग्रेस बदलू लागली. आधी कोणताही नेता कुठेही गेला की, तेथील काँग्रेसच्या कार्यालयात जायचा. कारण त्यावेळी नेते कार्यालयाला मंदिर मानत होते. हळूहळू सर्व संपत गेले. इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी आणि राहुलजी यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेत्यांची अशी फौज जमा झाली, ज्यांची प्राथमिकता पक्ष नव्हता, तर त्यांना स्वत:चे लाभ महत्त्वपूर्ण वाटत होते.

यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पाच वर्षे सुरळीत पार पडली. नंतरचा पाच वर्षांचा काळ हातून गेला. राहुल गांधी पंतप्रधान बनण्यास तयार नव्हते. पक्षातील काही लोकांनी त्यांच्या नावाला विरोध केला. एक दुसऱ्याला खाली खेचण्याचे असे काही डावपेच आखले गेले की पक्ष दुबळा होत गेला. केवळ पक्षाच्याच भल्यासाठी झटणारे अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्यांना वर्तुळाबाहेर ढकलले. संघटनेऐवजी संगीतात तल्लीन असणाऱ्यांचा बोलबाला झाला. त्यात डॉ. मनमोहन सिंग भरडले जाऊ लागले. त्यांचे कार्यालय ठप्प पडले. एकापाठोपाठ एक घोटाळ्यांचे आरोप होऊ लागले. काँग्रेसने अनेक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले, पण प्रतिमा डागाळली. सरकार निकामी आणि भ्रष्ट आहे, असे वातावरण तयार करण्यात आले. बेरोजगार त्रस्त होते. शेतकरी नैराश्यात बुडाला होता. अशा वेळी नरेंद्र मोदींचा उदय झाला. त्यांनी सुशासनाची ग्वाही दिली. मग लोकांनी त्यांना संधी दिली. मात्र, गेल्या पाच वर्षांत काँग्रेससह विरोधी पक्ष सार्थ भूमिका बजावू शकला नाही. सत्तारूढ पक्षाचे चरित्र आणि चेहरा या दोहोंचा पर्दाफाश केला जाऊ शकला असता, हे मी स्वत: संसदेत अनुभवले, परंतु विरोधकांनी आपल्याच लोकांची वाट लावली.

आता २०१९ वर दृष्टिक्षेप टाकू या! मोदींच्या २०१४ ते २०१९ या कारकिर्दीत सर्वकाही आलबेल नव्हतेच! आश्वासने पाळली गेली नाहीत. काँग्रेस आणि यूपीएमध्ये सामील असलेल्या पक्षांसाठी ही सुवर्णसंधी होती, परंतु ती त्यांनी गमावली. राहुल गांधी यांनी प्रचंड श्रम घेतले, परंतु संघटनेतील दिग्गज हातात हात घालून चालत होते का? तिकीट वाटपात ‘आपला आणि परका’ असा खेळही रंगला. अशा स्थितीत नरेंद्र मोदी हे देशभक्तीचा ‘हुकमी एक्का’ घेऊन आले आहेत, हे काँग्रेसला कळलेच नाही. पश्चिम बंगालपासून तर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत काँग्रेस विस्कळीत झाली. असे असले, तरी काँग्रेस संपणार नाही, असे माझे ठाम मत आहे. काँग्रेस एक विचार आहे, आत्मा आहे. आत्मा आणि विचार कधी मरत नसतात. मात्र, वाईट दिवस येऊ शकतात.

या काळात संघटनस्तरावर भाजपा स्वत:ला बळकट बनवत गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपाच्या मातृ संघटनेने शेतकºयांपासून युवक आणि बुद्धिवाद्यांना जोडून देश-विदेशात संघटना उभारल्या. जनाधार मजबूत केला. ‘आम्ही दोनाचे तीनशे होऊ’ असे कधी काळी अटलजींनी म्हटले होते. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीने खरे करून दाखविले. मोदी जगभर ओळखले जाणारे नेते आहेत. ज्यांची संघटनक्षमता अद्वितीय आहे, असे अमित शहांसारखे रणनीतीकार त्यांच्यासोबत आहेत. अशा वेळी मुकाबला कसा करायचा, गमावलेला जनाधार परत कसा मिळवायचा, याचा विचार काँग्रेसला करावा लागेल. आणि हो, आपल्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण, परराष्ट्र यासारखे विभाग महिलांच्या हाती दिल्याबद्दल आणि आता वित्त मंत्रालयासारखे महत्त्वाचे खातेही एका महिलेकडे सोपविल्याबद्दल मी मोदीजींचे अभिनंदन करू इच्छितो.

(लेखक लोकमत समूहाचे चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड आहेत)

Web Title: Editorial Why was it such a plight of the Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.