जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 08:38 AM2021-07-13T08:38:42+5:302021-07-13T08:46:11+5:30

जोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. दमदार, अनुभवी पुरुषांनी ताकदवान आणि वेगवान पोरांचा सपशेल पराभव केला.

editorial on sports england football team loosing match and tennis player novak djokovic winning | जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

Next
ठळक मुद्देजोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. दमदार, अनुभवी पुरुषांनी ताकदवान आणि वेगवान पोरांचा सपशेल पराभव केला.

सुकृत करंदीकर, सहसंपादक, लोकमत, पुणे

कालच्या रविवारी कोपा अमेरिकाच्या स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना परस्परांविरुद्ध लढले. विम्बल्डनमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचसमोर इटलीच्या मटेरो बेरेटिनीचे आव्हान होते. त्यानंतर युरो २०२० फुटबॉलच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच पोहोचलेला साहेबांचा संघ इटलीचा मुकाबला करणार होता. कोरोनाच्या गेल्या सुमारे दीड वर्षांच्या मळभानंतर या तिन्ही अंतिम सामन्यांचा थरार रविवारी अख्ख्या जगाने लुटला. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी जगभरच्या फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत; पण त्याच्या जादुई कारकिर्दीला शाप होता, तो म्हणजे स्वत:च्या देशासाठी तो एकही स्पर्धा जिंकून देऊ शकलेला नव्हता. या एकाच कारणामुळे पेले, मॅराडोना, रोनाल्डो या दिग्गजांच्या मांदियाळीत त्याला स्थान मिळत नव्हते. ‘कोपा अमेरिका’ची अंतिम फेरी जिंकून मेस्सीने हा काळा डाग कायमचा पुसला. वर्षावर येऊन ठेपलेल्या फुटबॉल विश्वचषकात काळजावरचा अपयशाचा दगड कायमचा दूर केलेल्या मेस्सीचे ताजेतवाने, आत्मविश्वासाने भरलेले रूप आता दिसेल अशी खात्री त्याच्या चाहत्यांना आहे.  

विम्बल्डनमध्ये जोकोविच विरुद्ध बेरेटिनीचा सामना सुरू झाला तेव्हा जोकोविचच्या एकतर्फी विजयाची अपेक्षा होती. साडेसहा फूट उंचीचा बेरेटिनी अवघ्या २५ वर्षांचा. जोकोविच त्याच्यापेक्षा तीन इंचाने बुटका शिवाय वयाने नऊ वर्षांनी मोठा. बघता बघता बेरेटिनीच्या उसळत्या तारुण्याने आणि दमदार ताकदीने जोकोविचपुढे आव्हान निर्माण केले. इतके तीव्र की मागे पडल्यानंतरही जोकोविचला वारंवार गाठणाऱ्या बेरेटिनीने जोकोविचची एरवीची बर्फासारखी थंड शांतताही भंग केली. पण अखेरीस योगसाधनेतून कमावलेला मनोनिग्रह, जोश आणि अनुभव जोकोविचच्या कामी आला. बेरेटिनीची जबरदस्त झुंज त्याने संपवली. पहिल्यांदाच विम्बल्डन जिंकण्याचे इटलीचे स्वप्न भंगले. जोकोविचने स्वत:च्या एकूण ग्रँडस्लॅमची संख्या वीसवर नेली. राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच या तीन टेनिसपटूंच्या ग्रँडस्लॅमची प्रत्येकी संख्या वीस आहे.

एकाच कालखंडातल्या या तीन सार्वकालिक महान टेनिसपटूंनी एकत्रितपणे साठ ग्रँडस्लॅम जिंकल्या यावरून त्यांची मातब्बरी आणि एकमेकांसमोर उभे केलेले कडवे आव्हान लक्षात यावे. या यशोशिखराची उंची जोकोविच आणखी वाढवणार. तो थांबणारा नाही. कोण्या एकेकाळी सर्बियातला एक सात वर्षांचा सामान्य मुलगा घरात विम्बल्डन चषकाची प्रतिकृती ठेवून या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पाहात होता. तोच मुलगा ही स्पर्धा केवळ खेळला नाही तर जिंकला. एकदा नव्हे तर सहादा. हा मुलगा म्हणजेच आजचा ‘सुपरनोव्हा’... नोवाक जोकोविच. कणखर मानसिकता, धुरंदर रणनीतिज्ञ आणि प्रचंड क्षमतेचं न थकणारं शरीर हे सगळं जोकोविचने प्रचंड मेहनतीने कमावलं आहे.

वयाची तिशी ओलांडली की टेनिस, फुटबॉल या दोन्ही खेळांमधली घसरगुंडी सुरू होते. पण ३४ वर्षांचा जोकोविच त्याच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षांनी तरुण खेळाडूंना ज्या चपळाईने आणि कणखरपणे नमवतो ते अनुभवणे प्रेरणादायी ठरते. इटली विरुद्ध इंग्लंड या ‘युरो फुटबॉल फायनल’मध्येही हेच दिसले. अवघ्या दुसऱ्या मिनिटाला इंग्लंडने इटलीची भक्कम बचाव फळी भेदत गोल केला तेव्हा ‘कमिंग होम’चे स्वप्न सत्यात उतरणार अशीच लहर संपूर्ण इंग्लंडमध्ये पसरली. पण या गोलनंतर इटलीच्या कथित ‘म्हाताऱ्या’ संघाने ज्या वेगवान चढाया करून इंग्लंडची दमछाक केली, तो थरार अफलातून होता. इटलीच्या जोरदार मुसंड्यांनी इंग्लंडची तरुण फळी हतबल झाली. घरच्या प्रेक्षकांपुढे खेळण्याचा तणाव इंग्लिश खेळाडूंच्या देहबोलीत दिसत होता. त्या उलट इटलीचे तिशी ओलांडलेले खेळाडू सातत्याने धडका देत राहिले. ‘पेनल्टी शूटआउट’मध्ये तणावाने जेव्हा परिसीमा गाठली तिथे इंग्लिश खेळाडू पुरते ढासळले. जोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा दारुण स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. यात दमदार, अनुभवी आणि संयमी पुरुषांनी त्यांना आव्हान देणाऱ्या ताकदवान, वेगवान आणि कौशल्यपूर्ण पोरांचा सपशेल पराभव केला.

Web Title: editorial on sports england football team loosing match and tennis player novak djokovic winning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.