स्कूल चले हम! शाळा सुरू होणार, लाट ओसरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 05:49 AM2022-01-22T05:49:32+5:302022-01-22T05:51:40+5:30

कुठे ऑनलाइन तर कुठे गृहभेटी देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पुरेसा नाही. परिणामी, आता कोरोनाची लाट ओसरणार आणि शाळा कायम सुरू राहणार, हाच संदेश विद्यार्थ्यांत जावा.

editorial on state governments decision of reopening of schools | स्कूल चले हम! शाळा सुरू होणार, लाट ओसरणार

स्कूल चले हम! शाळा सुरू होणार, लाट ओसरणार

Next

शाळा सुरू करण्याचे शहाणपण पुन्हा सुचले, हे बरे झाले. गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नक्कीच कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. परंतु, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि एकूणच गंभीरता जिल्हानिहाय तपासणे आवश्यक आहे. सरकारने योग्य भूमिका घेतली आहे. स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी असणाऱ्या भागात शाळा पूर्ववत करता येतील. जिथे रुग्णसंख्या वाढली आहे, विशेषत: शालेय वयोगटातील मुले अधिक संख्येने बाधित आहेत, तिथे आणखी काहीकाळ वाट पहावी लागेल. परंतु, शाळा सुरू व्हाव्यात अशी सार्वत्रिक भावना आहे.



ऑनलाइन अथवा ग्रामीण भागात गृहभेटी करून दिले जाणारे तुटपुंजे शिक्षण किती काळ सुरू ठेवायचे? असा प्रश्न शिक्षकांनाही पडला आहे. सद्यस्थितीत रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने आणखी काहीकाळ कळ सोसावी, असा एक मतप्रवाह आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे आजवर झालेले नुकसान यापुढे परवडणारे नाही. सध्याच्या ओमायक्रॉनची व्याप्ती मोठी असली तरी घातक परिणाम तुलनेने कमी आहेत. जगभरातील अभ्यासाने हेच वास्तव समोर येत आहे. अमेरिका आणि इंग्लंडने निर्बंध कमी केले आहेत. ज्या गतीने ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले, त्याच गतीने ते कमी झाले असे अनेक देशांत दिसून आले आहे. आता यापुढे लॉकडाऊन अथवा कुठलेही निर्बंध नको, ही भूमिका जगभर स्वीकारली जात आहे. किंबहुना ओमायक्रॉन हे नैसर्गिक लसीकरण आहे, अशी मांडणी काही वैज्ञानिकांनी केली आहे. मात्र आपल्याकडे अजूनही डेल्टाचे रुग्ण आढळून येत आहेत, ही चिंतेची बाब आहे.

ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले, तर डेल्टा लुप्त होईल आणि ओमायक्रॉनच्या सार्वत्रिक प्रभावामुळे पुढील व्हेरियंट टिकाव धरणार नाहीत, अशी आशा वैज्ञानिकांना आहे. या सर्व कोरोना चिंतनाचा अर्थ इतकाच की, हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येईल. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णालयांतील दाखल रुग्णसंख्या अधिक राहील, तिथे शाळांच्या तारखा पुढे-मागे होऊ शकतील. परंतु, कोरोनामुक्त गावात अथवा नियंत्रणात रुग्णसंख्या असलेल्या लहान-मोठ्या शहरांमध्ये विनाविलंब शाळा सुरू करणे हाच व्यवहार्य निर्णय आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यासाठीच सरकारने यापूर्वी सुरू केलेल्या शाळा पुन्हा बंद केल्या होत्या. निश्चितच त्यामागे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी होती. आता त्यांच्या शिक्षणाची काळजी करण्याचे दिवस आहेत.



स्वयंप्रेरणेने शिकणारे विद्यार्थी मागे पडणार नाहीत, परंतु बहुतांश मुलांचे अभ्यासाचे गणित बिघडले आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येच नव्हे, तर शहरांमधल्या नामांकित मराठी, इंग्रजी शाळांमध्येही ऑनलाइन शिक्षण पूर्णक्षमतेने पोहोचलेले नाही. वाडी-तांड्यांवरील विद्यार्थ्यांचे प्रश्न तर अधिक गंभीर आहेत. अभ्यासाचा दोन वर्षांचा अनुशेष पुढे कसा भरून काढला जाईल, यावरच त्या मुलांचे भविष्य आहे. तूर्त नववी ते बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने लसवंत होत आहेत. परिणामी, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच इतर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था पूर्ववत करणे आवश्यक आहे. आता शाळांचा निर्णयही जिल्हा, महापालिका पातळीवर होणार आहे. त्यामुळे सोमवारपासून संबंध राज्यात सरसकट शाळा सुरू होणार नाहीत अथवा यापुढे त्या सरसकट बंदही होणार नाहीत. गाव, तालुका, शहर अर्थात जिल्हानिहाय शाळा सुरू करण्याचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.

एकूणच ओमायक्रॉनचा चढता आलेख तितक्याच गतीने खाली येईल आणि दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष होतील, असे चित्र आहे. गेल्यावर्षी विनापरीक्षा निकाल लागला होता. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: नीट, जेईई, मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षांचे गेल्या दोन वर्षांतील बिघडलेले वेळापत्रक यावेळी सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. सर्वच परीक्षांचा काळ जवळ आला आहे. आजवरच्या शाळा बंद व्यवस्थेने अनेकांचे शिक्षण कायमचे सुटले. कोरोनाकाळात शैक्षणिकच नव्हे तर गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून सावरायचे कसे? हा प्रश्न समोर आहे. त्यामुळे एकही दिवस शिक्षण बंद राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कुठे ऑनलाइन तर कुठे गृहभेटी देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पुरेसा नाही. परिणामी, आता कोरोनाची लाट ओसरणार आणि शाळा कायम सुरू राहणार, हाच संदेश विद्यार्थ्यांत जावा.

Web Title: editorial on state governments decision of reopening of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.