Howdy Modi: एका दगडात दोन पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 05:00 AM2019-09-24T05:00:54+5:302019-09-24T05:47:39+5:30

अमेरिकेतील लष्करी, मुलकी अधिकारी तसेच राजकीय नेते यांना वश करून घेण्याची जोरदार मोहीम इम्रान खान यांनी राबविली आहे. अमेरिकेतील भारतीयांची राजकीय व आर्थिक ताकद दाखवून या मोहिमेला प्रत्युत्तर दिले गेले.

editorial on howdy modi india shows its power in us and gives strong message to pakistan | Howdy Modi: एका दगडात दोन पक्षी

Howdy Modi: एका दगडात दोन पक्षी

Next

पंतप्रधान मोदींचा ह्युस्टनमधील कार्यक्रम हे भारताचे अमेरिकेतील शक्तिप्रदर्शन होते. सर्वसामान्य जनतेच्या मनावर छाप पाडणारे चमकदार कार्यक्रम करण्याची हौस पंतप्रधान मोदींना आहे. गर्दी आणि श्रीमंती आयोजन यातून ताकद दाखविण्याची संधी ते सोडत नाहीत. ह्युस्टनमधील कार्यक्रम हा त्याच पठडीतील होता. वरकरणी सांस्कृतिक भासणारा हा मेळावा वस्तुत: राजकीय होता. अमेरिकेतील रहिवासी भारतीयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुद्धिमत्ता व मेहनत यांच्या जोरावर भारतीयांनी तेथे स्वत:ची अर्थसत्ता निर्माण केली आहे. या भारतीयांना एकाच छताखाली एकत्र आणून त्यांची ताकद अमेरिकेतील राजकीय वर्तुळ तसेच भारताविरोधी लिखाण करणारे डावे उदारमतवादी यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे होते. या मेळाव्यातून ते साधले.



पंचवीस वर्षांपूर्वी नरसिंह राव यांच्या अमेरिका भेटीची साधी दखलही घेतली गेली नव्हती. इंदिरा गांधींचा निक्सन भेटीचा अनुभवही क्लेशकारक होता. आताचा भारत वेगळा असून ती दखल घेण्याजोगी शक्ती झाली आहे, याचे प्रत्यंतर ह्युस्टनच्या मेळाव्यात आले. पन्नास हजार लोक बॉलिवूड स्टारसाठी नव्हे, तर राजकीय नेत्यासाठी जमावेत, हे अमेरिकनांना थक्क करणारे होते. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत अमेरिकेतील भारतीयांची मते हवी असल्याने मेळाव्याला हजर राहून प्रचाराची संधी ट्रम्प यांनी साधली. सामान्य अमेरिकनांसाठी केलेल्या कामांची जंत्री त्यांनी दिली. तथापि, ट्रम्प यांच्या भाषणातील दोन मुद्दे महत्त्वाचे होते.



पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी दहशतवादावर परखड भूमिका मांडली व ती भारताला बळ देणारी होती. दुसरा अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अमेरिकेतील भारतीयांकडे ट्रम्प निर्वासित म्हणून पाहत नाहीत, तर अमेरिकेच्या उभारणीतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहतात, हे त्यांच्या भाषणात दिसून आले. अमेरिकेतील परदेशी लोकांबद्दल ट्रम्प यांचे धोरण अनुदार आहे; पण भारतीयांबद्दल तसे नाही, हे ट्रम्प यांनी बोलून दाखविले. ‘व्हाइट हाउसमध्ये तुमचा सच्चा मित्र बसलेला आहे,’ हे ट्रम्प यांचे विधान दिलासा देणारे आहे. अर्थात, ट्रम्प हा अत्यंत बेभरवशाचा नेता आहे, याचेही स्मरण असावे.



मोदी यांनीही ट्रम्प यांच्या स्तुतीत मागेपुढे पाहिले नाही. पुढील निवडणुकीसाठी ट्रम्प यांना जाहीर पाठिंबाही देऊन टाकला आणि ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या भूमिकेचे अफाट कौतुक करीत तोच आपला अजेंडा असल्याचेही सूचित केले. भारतीय पंतप्रधानाने अमेरिकेच्या अध्यक्षाला निवडणुकीत जाहीर पाठिंबा देणे, हा भारताच्या भूमिकेतील मोठा बदल आहे. कारण गेल्या सत्तर वर्षांतील बराच काळ भारतातील बौद्धिक विश्व आणि परराष्ट्र खात्यातील लोक हे नेहमी अमेरिकाविरोधी राहिलेले आहेत. राजीव गांधी, नरसिंह राव आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांनी हा कल बदलण्याचा प्रयत्न केला असला तरी अमेरिकेतील घडामोडींमध्ये इतका उघड सहभाग यापूर्वी घेतला गेला नव्हता. ते धाडस मोदींनी केले; त्याचबरोबर या मेळाव्याचा उपयोग पाकिस्तानला चार कडक शब्द सुनावण्यासाठी केला.



अमेरिकेतील लष्करी, मुलकी अधिकारी, नेते आणि माध्यमे यांना वश करून घेण्याची जोरदार मोहीम इम्रान खान यांनी राबविली आहे. अमेरिकेतील भारतीयांची राजकीय व आर्थिक ताकद दाखवून या मोहिमेला प्रत्युत्तर दिले गेले. संसदेत कित्येक तास चर्चा करून सर्व पक्षांच्या सहमतीने, म्हणजेच लोकशाही मार्गाने, काश्मीरचा निर्णय घेतला गेला, हे मोदींनी लक्षात आणून दिले. राजकीय शक्तिप्रदर्शन म्हणून हा मेळावा यशस्वी झाला असला तरी आर्थिक आघाडीवर अद्याप भारताच्या हातात काही पडलेले नाही. देशात शौचालये किती बांधली, गॅस कनेक्शन किती दिली याच्या मोदींनी दिलेल्या यादीत अमेरिकेला रस नाही. अमेरिकेला रोकडा आर्थिक व्यवहार हवा असतो आणि ट्रम्प पक्के बिझनेसमन आहेत. थंडा अर्थप्रतिसाद आणि नेहरूंच्या मनातील धर्मनिरपेक्ष भारताचा अमेरिकी नेत्यांकडून गौरवाने झालेला उल्लेख हे मोदींना खटकणारे असेल. मात्र, भारताचा अमेरिकेतील प्रभाव दाखवून देणारा हा मेळावा होता.

Web Title: editorial on howdy modi india shows its power in us and gives strong message to pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.