'इलेक्टिव मेरिट' आवडे सर्वांना; त्यामुळे जोरात चालते नाईक गुरुजींची ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 07:26 AM2021-02-13T07:26:57+5:302021-02-13T07:31:37+5:30

नाईक गुरुजी ज्या शाळेचे हेडमास्तर आहेत तिच्या प्रसाराकरिता प्रचाराची गरज नाही. हेडमास्तरांनी मळवलेल्या वाटेवरून वाटचाल करण्याकरिता विद्यार्थीच सक्षम आहेत.

editorial on ganesh naik and other leaders who take gangsters helps in politics | 'इलेक्टिव मेरिट' आवडे सर्वांना; त्यामुळे जोरात चालते नाईक गुरुजींची ‘शाळा’

'इलेक्टिव मेरिट' आवडे सर्वांना; त्यामुळे जोरात चालते नाईक गुरुजींची ‘शाळा’

Next

नवी मुंबईचे अनभिषिक्त ‘सम्राट’ गणेश नाईक यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. नाईक हे मुरब्बी राजकारणी आहेतच; पण त्याचबरोबर मोठे उद्योजक आहेत. देशविदेशात त्यांची कार्यालये आहेत. त्यांच्या उंचीचा राजकीय नेता गुंडागर्दीला घाबरू नका, असे आपल्या समर्थकांना बजावताना इंटरनॅशनल डॉननासुद्धा गणेश नाईक माहीत आहे, अशी प्रांजळ कबुली देणार नाही. मात्र नाईकांनी ती बिनधास्त दिली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आपल्या समर्थकांसोबत धाकदपटशा करणाऱ्या सुरेश कुलकर्णी (आडनावामुळे गैरसमजुतीतून अभिजन वर्गाने आपली कॉलर टाइट करून घेण्याची गरज नाही. ते भटक्या विमुक्त समाजाचे आहेत) या साथ सोडून शिवसेनेत गेलेल्या व्यक्तीस इशारा देतात की, ‘तुम जिस स्कूल के विद्यार्थी हो उसके हम हेडमास्तर है’.



काश मेहरा यांचा `हाथ की सफाई` रिलीज झाला तेव्हा नाईक यांनी बहुदा तो ब्लॅकने तिकीट खरेदी करुन पाहिला असणार. कारण सलीम-जावेद यांनी विनोद खन्ना यांच्या मुखातून सर्वप्रथम हा इशारा दिला. आता नाईक यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे. नाईक हे एकेकाळी शिवसेनेत होते. कोचिंग क्लासचे मालक असलेले नेते जेव्हा सेनेत लाखभर रुपये काढताना खळखळ करीत तेव्हा नाईक यांनी एक कोटींची देणगी देऊन आपण दिलदारी, दुनियादारीच्या स्कूलचे `प्रिन्सिपॉल` असल्याचे दाखवून ठाकरे यांच्यासह अनेकांना थक्क केले होते. शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावरही नाईक यांच्या औदार्याची कोटी कोटी उड्डाणे थांबली नाहीत.



नाईक ज्या नवी मुंबईचे नेतृत्व वर्षानुवर्षे करीत आहेत तेथील बांधकाम उद्योग, खाण व्यवसाय, एमआयडीसीतील कंत्राटे यावरील वरचष्म्यातून तेथे गेल्या २५ वर्षांत किमान डझनभर लोकांचे राजकीय खून झाले आहेत. केवळ नवी मुंबईच नव्हे तर जवळपासच्या सर्व शहरांमधील ऐंशी, नव्वदच्या दशकातील राजकारण पाहिले तर ते गुन्हेगारी, खूनबाजी, रक्तपात, खंडणीखोरी यांच्या कथांनी भरलेले आहे. उल्हासनगरातील पप्पू कलानी, वसई-विरारचा भाई ठाकूर, मीरा-भाईंदरमधील गिल्बर्ट मेंडोन्सा अशा अनेकांनी एकेकाळी आपापल्या शहरांत कमालीची दहशत पसरवली होती. रेती व्यवसायापासून एमआयडीसीतील कंत्राटे मिळवण्यापर्यंत आणि ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंत सर्वत्र आपली सत्ता प्रस्थापित करण्याकरिता गुंडगिरीचाच आश्रय या नेत्यांनी घेतला.



नव्वदच्या दशकात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एक वावटळ उठली. त्या आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबा होता ते गो. रा. खैरनार यांच्या सभांना मिळालेल्या उदंड प्रतिसादातून नक्कीच दिसले. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील या गुंडांचे राजकारणातील ‘कुलगुरु’ हेच लक्ष्य केले गेले. अनेक शहरांमधील कंपन्या बंद पडून सेवा क्षेत्र उदयाला आले. बांधकाम क्षेत्राला बरकत आल्याने स्मगलिंग, दारू, मटका यासारख्या अवैध धंद्यांवर आपले साम्राज्य पोसलेल्या गुंडांनी बांधकाम क्षेत्र, हॉटेल, डान्स बार या व्यवसायात जम बसवला. अनेक शहरांत अवैध बांधकामे उभी राहिली. अनेकांनी महापालिका सदस्य होण्याचा मार्ग स्वीकारला. राजकीय व्यवस्था व आर्थिक सत्ता ताब्यात आल्याने आता पूर्वीसारखी चॉपर किंवा घोडा हातात घेऊन स्वत: दहशत माजवण्याची गरज नाही, याची जाणीव त्यांना झाली. अनेक नेत्यांची मुले कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकली, त्यांनी विदेशात जाऊन पदव्या प्राप्त केल्या. त्यामुळे व्यवसायातून, राजकारणातून मिळालेला पैसा कुठे व कसा गुंतवायचा याचे नवनवे मार्ग या मंडळींना उमजले. त्यामुळे अनेक गुंडांचे रुपांतर गेल्या दोन-तीन दशकांत ‘कॉर्पोरेट माफियां’मध्ये झाले आहे.

महाराष्ट्रातील ज्या छोट्या शहरांमध्ये नागरीकरणाचा वेग वाढत आहे तेथे आता अशाच पद्धतीचे संक्रमण सुरू आहे. राजकारणात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ला प्रचंड महत्त्व आहे. अनेक शहरांमधील हे असे नेते स्वत:बरोबर आपले भाऊबंद, पत्नी, सुना-मुले व दोन-चार समर्थक यांना हमखास विजयी करतात. शिवाय पक्षाला त्यांना रसद पुरवावी लागत नाही. त्यामुळे हे नेते आपली राजकीय सोय पाहून वेगवेगळ्या पक्षात उड्या मारतात व स्थायी समित्यांसारख्या समित्या पदरात पाडून घेऊन धनदौलत गोळा करतात. पाच वर्षानंतर तत्कालीन राजकीय समीकरणे पाहून पुन्हा कोलांटउडी मारतात. सध्या अशा नेत्यांमुळे येणारी सूज यालाच पक्षीय ताकद म्हणण्याची पद्धत आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक डिसले गुरुजींची शाळा आता राज्यभर सुरू करण्याच्या दिशेने सरकारला हेतूत: पावले टाकावी लागत आहेत. नाईक गुरुजी ज्या शाळेचे हेडमास्तर आहेत तिच्या प्रसाराकरिता प्रचाराची गरज नाही. हेडमास्तरांनी मळवलेल्या वाटेवरून वाटचाल करण्याकरिता विद्यार्थीच सक्षम आहेत.

Web Title: editorial on ganesh naik and other leaders who take gangsters helps in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.