सुषमा स्वराज यांच्या निधनाने देश सुसंस्कृत, शालीन व कणखर नेतृत्वाला मुकला आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अजोड वक्तृत्वशैली, निर्भय वावर हे सुषमाजींचे वैशिष्ट्य. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास असे. बुद्धिमत्तेला मिळालेली अभ्यास व अनुभवाची जोड यातून तो आला होता. पण त्याला अहंकाराचा वास नसे. उच्चभ्रू वर्गाचा वावर असणाऱ्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले, तरी त्या वर्गाचा तोरा त्यांच्या वागण्या-बोलण्यात नव्हता. सर्वांना त्या आपल्याशा वाटत. परराष्ट्र खात्याला माणुसकीचा चेहरा देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. भारतीय दूतावास हा त्या देशातील रहिवासी व प्रवासी भारतीयांचे हक्काचे घर असल्याचा विश्वास त्यांनी कामातून दिला. ‘जनतेचे मंत्रालय’ अशी या खात्याच्या कारभाराला त्यांनी मिळवून दिलेली ओळख महत्त्वाची आहे.स्वभाव, विचारधारा आणि वास्तव यांच्यात उत्तम मेळ घालण्याचे कौशल्य स्वराज यांच्याकडे होते. ते त्यांनी देशातील राजकारण व परराष्ट्रीय कारभार या दोन्ही ठिकाणी चांगल्या रीतीने वापरले. तरुण वयात हरयाणासारख्या कर्मठ राज्यात मंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली. आणीबाणीत जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या सहवासात नेतृत्वगुण विकसित झाले. तरुणपणी त्यांच्यावर मार्क्सवाद व समाजवादाचा प्रभाव होता. पुढे भाजपच्या संपर्कात आल्यावर त्या पक्षाच्या विचारांची कास त्यांनी धरली, ती कायमचीच. पण कडव्या हिंदुत्ववादीही त्या झाल्या नाहीत. लालकृष्ण अडवाणींच्या शिष्या असूनही त्यांचे हिंदुत्व अडवाणी, मोदी यांच्यापेक्षा वाजपेयींच्या जास्त जवळ जाणारे होते.सोनिया गांधींच्या विरोधात कर्नाटकमधून निवडणूक लढवल्याने आणि त्या पंतप्रधान झाल्या तर केशवपन करीन या त्यांच्या मूळ स्वभावाशी न जुळणाऱ्या, आक्रस्ताळ्या भूमिकेने त्यांचे नाव देशात पोहोचले. संघ परिवाराला पसंत पडणाऱ्या या भूमिकेनंतर त्यांच्यातील गुणांना वाव मिळाला. अडवाणींच्या नेतृत्वाखालील मोठ्या पराभवानंतर संघाने नवे नेतृत्व घडविण्यास प्रारंभ केला; तेव्हा नितीन गडकरी, अरुण जेटलींसोबत सुषमा स्वराज शीर्षस्थानी होत्या. गांजलेल्या मनमोहन सिंग सरकारवर सुषमा स्वराज यांनी लोकसभेत तुफानी हल्ले चढविले. नरेंद्र मोदींच्या २०१४च्या विजयात सुषमा स्वराज यांच्या लोकसभेतील या कामगिरीचा मोठा वाटा होता. मात्र त्या मोदी गटातील नव्हत्या. त्यांच्यात वितुष्ट नसले तरी सख्यही नव्हते.पक्षातील त्यांचे वरिष्ठ स्थान लक्षात घेऊन त्यांना परराष्ट्रमंत्रिपद दिले गेले. नेहरूंपासून भारताच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधानांची छाप नेहमी असते. मोदी त्याला अपवाद नव्हते. सुषमा स्वराज यांचे वैशिष्ट्य असे की मोदींसारख्या लोकप्रिय व प्रचारतंत्रकुशल नेत्याबरोबर काम करतानाही त्यांनी आपला ठसा उमटविला. परराष्ट्र व्यवहारातील नाट्यमयता मोदींवर सोडून दिली व आपले लक्ष परराष्ट्र खात्याला जनतेशी जोडण्यावर केंद्रित केले. भाषेवर पकड, सौजन्यशील वागणूक, राष्ट्रहिताचा स्पष्ट दृष्टिकोन यामुळे कसोटीच्या प्रसंगी त्यांनी भारताचे नाव लख्खपणे जागतिक व्यासपीठावर नोंदवले.मोदींचे परराष्ट्र धोरण कठोर होते. हिंदू बहुसंख्याकांच्या सरकारचा ठपकाही होता. तरीही चीन, अमेरिकेपासून मुस्लीम राष्ट्रांत भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम सुषमा स्वराज यांनी केले. त्यांच्या युक्तिवादात चापल्य असले तरी ओरखडे नसत. प्रतिपक्षाशी मैत्रीचा अवकाश त्यात असे. दिव्यांग गीताला भारतात आणताना पाकिस्तानने केलेल्या मदतीचे त्यांनी जाहीर कौतुक केले; पण त्याच पाकिस्तानला दहशतवादावरून कडक शब्दांत सुनावण्यास कमी केले नाही. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकची कोंडी करण्याचे डावपेचही यशस्वीपणे टाकले. त्याचवेळी सामान्य देशवासीयांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. संकटाच्या वेळी तत्काळ उभी राहणारी व्यक्ती, असा नावलौकिक अनेक प्रसंगांतून मिळविला. वाजपेयी, अडवाणी, मोदी अशा लोकप्रिय नेत्यांच्या प्रभावळीत वावरूनही ‘प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधेन नाही’ हे स्थान त्यांनी कामातून मिळविले. त्यामुळेच स्वराज यांचे जाणे चटका लावणारे आहे.


Web Title: editorial on former external affairs minister and bjp leader sushma swaraj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.