do not try to take credits of help in a critical situations | वडाचिया साली जो वृथा पिंपळा चिकटवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी
वडाचिया साली जो वृथा पिंपळा चिकटवि; जशी ज्याची खावी पोळी; त्याचिच वाजवी टाळी

- सुधीर महाजन

महिनाभरापासून अर्जुनाची चिडचिड वाढली होती. कारणही तसेच होते. त्याचा सखा कृष्ण जवळपास रोजच कर्णाची तारीफ करीत होता. त्याच्या दातृत्वाचे गोडवे गात होता. आज तर हद्द झाली. कृष्ण-अर्जुन वाटिकेत भुंग्याचा गुंजारव ऐकत बसले असताना कर्ण तेथे आला, तोच अर्जुनाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कृष्णाने आत्मीयतेने त्याचे स्वागत केले आणि त्याच्याशी गप्पा सुरू झाल्या. अर्जुन मात्र मुखस्तंभासारखा बसून होता. बोलता-बोलता कृष्णाने कर्णाच्या उदारतेची तारीफ सुरू केली. तो मात्र विनयाने अधोवदन झाला होता. ‘कृष्णा माझे कौतुक जरा जास्तच करतो हं’ असे बोलत त्याने निरोप घेतला. कृष्णाने सहेतुक अर्जुनाकडे कटाक्ष टाकला, तर अर्जुन रागाने धुमसत होता. तो उठला आणि तरातरा निघून गेला. कृष्णाच्या चेहऱ्यावर सहेतुक स्मित झळकले.

या घटनेला पंधरा दिवस उलटले असतील हो, दोघेही मित्र रथावर स्वार होऊन जरा प्रदेशाचे अवलोकन करायला निघाले. परत येताना दोन टेकड्यांकडे अंगुलीनिर्देश करीत कृष्ण म्हणाला, ‘अर्जुना, या दोन टेकड्या सोन्याच्या आहेत; हे सगळे सोने आसपासच्या गावकऱ्यांमध्ये वाटून टाक़ शेवटी ही आपल्या राज्याची म्हणजे पर्यायाने प्रजेचीच संपत्ती आहे.’ पंधरा दिवसांत कृष्णाच्या बोलण्यात कर्णाचा उल्लेख नसल्याने अर्जुनाचे मनही ताळ्यावर आले होते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अर्जुन उठला, त्याने आसपासच्या गावात डांगोरा पिटायला सेवकांना पाठवले. टेकडीवरील सोने अर्जुन प्रजेला देणार आहे, तरी प्रजेने तेथे येऊन रांगेत उभे राहून घेऊन जावे. दवंड्या पिटल्या, निरोप गेले आणि लोकांनी गर्दी केली. अर्जुन टेकडीवर कुदळ, फावडे, टोपले घेऊन गेला आणि गर्दीचा अंदाज घेऊन प्रत्येकी दोन टोपले सोने मिळेल अशी घोषणा करीत खोदायला सुरुवात केली आणि सोने वाटप सुरू झाले. या घटनेला दोन महिने उलटले तरी अर्जुनाचे काम संपत नव्हते. तो रोज खोदून आणि सोने वाटप करून थकून गेला होता.

दरम्यानच्या काळात कृष्ण कुंजवनात रुक्मिणीसह काही दिवस घालवायला गेला, कारण राजकारणाच्या धावपळीत तिच्याशी प्रेमालाप करण्याची सवडच त्याला मिळाली नव्हती. चांगला तीन आठवडे घालवून तो प्रफुल्लित मनाने परतला. दोन दिवस उलटले तरी अर्जुनाचा पत्ता नव्हता. त्याने चौकशी केली असता नकुल म्हणाला, देवा तू त्याला काम सांगितले ना तर तो अहोरात्र त्यात डुंबून गेला आहे. आपण सोने देऊन लोकांना उपकृत करतो आहोत, असे वाटत असल्याने तो कृतकृत्य झाला आहे. आपले दातृत्व कर्णापेक्षा मोठे, अशी त्याची मनोभावना झालेली दिसते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे कृष्ण कर्णासह अर्जुनाच्या महालात पोहोचला, तर तो सोन्याच्या टेकड्यांकडे जाण्याच्या तयारीत होता. चेहऱ्यावर थकवा दिसत असला तरी मन उत्साही होते. ‘अर्जुना, आज तुझे काम बंद ठेव, आपल्याला वनात जायचे आहे, थोडी जलक्रीडा करू,’ असे सांगून तिघेही वनात गेले. सायंकाळी परत येताना कृष्ण कर्णाला म्हणाला. ‘अंगराज, या समोरच्या चार टेकड्या सोन्याच्या आहेत. हे सोने तू प्रजेत वाटून टाक’ कर्णाने अधोवदन होऊन त्याला नमस्कार केला. आता ही गोष्टही अर्जुनाला खटकली; पण तो काही बोलला नाही.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्याने कर्ण आणि अर्जुनाला भोजनाचे निमंत्रण दिले. अर्जुन थकलेला होता. कर्ण मात्र नेहमीप्रमाणे प्रफुल्लित होता. त्याच्या कवचकुंडलांचे तेज आज जरा वेगळेच भासत होते. भोजन, तांबूल पान झाल्यानंतर कृष्णाने विचारले, ‘‘अर्जुना, तुझे काम कधी संपणार?’’ अर्जुन म्हणाला, ‘‘मित्रा आणखी महिनाभर तरी काम पुरणार आहे.’’ त्याने कर्णाकडे कटाक्ष टाकत ‘‘कौंतेया, काम सुरू केले की नाही?’’, ‘‘कृष्णा माझे काम संपले’’  असे उत्तर देताच अर्जुन चमकला. ‘‘अरे एका दिवसात’’ या कृष्णाच्या प्रश्नावर तो म्हणाला, ‘‘ते सोने प्रजेला देण्याचे काम तू सांगितले होते. शिवाय ते माझेही नव्हते. तू फक्त माझ्यावर ती जबाबदारी टाकली होती. आज सकाळी मी प्रजेला तेथे बोलावले आणि सांगितले की, हे चार टेकट्या सोने तुमचे आहे. यथाशक्ती घेऊन जा आणि मी माझ्या नित्यकर्माला लागलो.’’ कृष्णाने सहेतुक अर्जुनाकडे कटाक्ष टाकला.

टीप : या बोधकथेचा पूरग्रस्तांना राजकीय पक्ष, नेते यांच्याकडून देण्यात येत असलेल्या मदतीशी दुरान्वयेही संबंध नाही. कोणीही बोधकथेचा आधार घेऊन वडाची साल पिंपळाला लावण्याचा वृथा प्रयत्न करू नये. 
 

Web Title: do not try to take credits of help in a critical situations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.