काळ्या पैशाचा सभ्य धंदा !

By सचिन जवळकोटे | Published: August 30, 2020 08:22 AM2020-08-30T08:22:09+5:302020-08-30T18:37:58+5:30

लगाव बत्ती...

Decent business of black money! | काळ्या पैशाचा सभ्य धंदा !

काळ्या पैशाचा सभ्य धंदा !

Next

- सचिन जवळकोटे

मंदिरातल्या देवांचं दर्शन व्हावं म्हणून ‘कमळ’वाल्या मंडळींनी तळमळून आंदोलन केलं. मात्र, त्याचवेळी याच सभ्य अन् सुसंस्कृत पक्षातील ‘कामाठी मेंबर’चं दर्शन घडावं म्हणून ‘डिपार्टमेंट’ धाडी टाकत निघालेलं. याबद्दल बोलायला कुणीच तयार नसावं, हा लोकशाहीतील किती मोठा विनोद ?... कारण बोलणार तरी कोण अन् कसं ? साºयांचीच घरं काचेची. सारेच एका माळेचे मणी. यातल्या अनेकांचे हातही बरबटलेले. कुणी मटक्यातला किंग, तर कुणी बाटलीतला बादशहा, कुणी वाळूतला माफिया तर कुणी उसातला दरोडेखोर. लगाव बत्ती...

‘कामाठी’ हा मूळचा मटकाबहाद्दर, हे त्याला ‘कमळ’वाल्यांनी ‘मेंबर’चं तिकीट देण्यापूर्वीही जगाला माहीत होतं. लोकांनी त्याला निवडून दिल्यानंतरही ‘डिपार्टमेंट’ला ठाऊक होतं. तरीही आत्ताच अशी अकस्मात धाड का, अशी कुजबुज सोलापुरात सुरू झाली. कुणी म्हणालं, ‘सरकार बदललं म्हणून.’ कुणी सांगितलं, ‘आतला व्यवहार तुटला म्हणून.’ खरं-खोटं ‘कामाठी’ अन् ‘काठी’ हे दोघंच जाणोत. मात्र, एक ‘कामाठी’ सापडला म्हणून बाकीचे थोडेच ‘साव’ आहेत ?

मटका हा तसा पूर्वीचा बदनाम धंदा. मात्र, वाजत-गाजत ‘झटपट लॉटरी’ आली अन् या ‘मटक्या’नंही लचकत-मुरडत ‘खादी’ला आपलीशी केली. ‘उदगिरी अन् मलंग’सारखी पक्की धंदेवाईक मंडळी या धंद्यातून बाहेर फेकली गेली अन् ‘सुनीलभाऊ, रियाजभाई, सुरेशअण्णा, तौफिकभाई, संजयअण्णा’ अशी पॉलिटिकल सेलिब्रिटी नावं या धंद्यात चर्चिली जाऊ लागली. ‘इंद्रभवन’च्या सभागृहात दिवसा नैतिकतेवर तावातावानं गप्पा मारणारी ही मंडळी रात्रीच्या अंधारात हातात हात घालून आपापली ‘हद्द’ सांभाळू लागली. विशेष म्हणजे यांच्यातली भांडणं मिटविण्याची दुर्दैवी वेळ ‘वाड्यावरच्या नेत्यां’वरही आलेली. साधनशुचितेच्या गप्पा मारणाºया राजकीय पक्षांनी केवळ ‘पालिकेतली डोकी’ मोजण्यासाठी पोसलेली मंडळीच आता भस्मासुर बनून सोलापूरकरांच्या डोक्यावर थयाथया नाचू लागली.

‘ओपन-क्लोज’ धंद्यापेक्षाही जास्त नोटांचे गठ्ठे इथल्या ‘लँडमाफियां’नी हाताळलेले. जुनाट भाडेकरू हाकलून लावण्याच्या नावाखाली अख्खी जागाच स्वत:च्या नावावर करून घेणारी टगे मंडळी चक्क ‘खादी’त दिसू लागली. ‘अतिक्रमणं टाकणं अन् अतिक्रमणं काढणं’ या दोन्हीतही मिळालेला रग्गड पैसा नंतर खासगी सावकारीत फिरविला गेला. डान्सबार मालकाच्या आत्महत्येनंतर या सावकारांचं बिंग फुटलं असलं तरी हे सारं हिमनगाचं वरचं टोक. ‘खºया फायनान्सर’ला वाचविण्यासाठी तथाकथित समाजसेवकांनी किती प्रयत्न केले, हे एकदा कधीतरी आपल्या ‘चेतनभाऊं’ना विचारायला हरकत नाही.

फायनान्सवरून आठवलं. गेल्या काही वर्षांत फायनान्स कंपन्यांच्या वसुलीसाठी नेमलेली काही मंडळी एवढी मोठी झाली की, तीच पुन्हा सावकारकी करू लागली. ‘खादी’च्या वेशातले त्यांचे कैक फूट कटआऊट अन् फ्लेक्स पाहून बिच्चारे सोलापूरकर धन्य-धन्य जाहले. पूर्वीच्या काळी संस्थांच्या नावावर महापालिकेच्या जागा फुकटात लाटून तरी एवढा कधी फायदा झाला होता का, हे वाटल्यास ‘बेरिया वकील’ अन् ‘महेशअण्णां’ना विचारा. त्या काळातल्या अनेक भानगडींची लिस्टच या दोघांकडे नां.

सेटलमेंट परिसरात ‘नागेशअण्णा अन् किसन मास्तरां’चं साम्राज्य आजही अबाधित. नाही म्हणायला ‘तालीम’ परिसरातली तरुण पिढी सध्या आपली ‘इमेज’ बदलण्याच्या प्रयत्नात. मात्र, जोपर्यंत ‘अमोलबापूं’सारख्या मेंबरांना झटपट पैशांचा ‘आॅनलाईन’ मोह सुटत नाही, तोपर्यंत ‘जामीन पे जामीन’साठी वकिलांचा ताफा लढणार. या साºया ‘खादी’वाल्यांना जोपर्यंत आतून ‘खाकी’चा सपोर्ट, तोपर्यंत हे असंच चालणार. गायकवाडांचा ‘बाळू’ डिपार्टमेंटच्या नावावर ‘बाळासाहेब’ बनून प्लॉटिंग अन् मोठ्या इस्टेट डेव्हलपिंग प्रोजेक्टमध्ये भागीदारी करणार. बिच्चारे मोठे अधिकारी येत राहणार. जात राहणार. ‘बाळू अन् वाळू’चा धंदा मात्र अस्साऽऽच जोरात चालत राहणार. लगाव बत्ती..

गावोगावीही असाच राडा..

शहरात ही परिस्थिती तर ग्रामीण भागात वेगळंच त्रांगडं. तिथं झटपट पैसा कमविण्याची कैक साधनं. नेहमी ‘पिस्तूल अन् गोळ्यां’ची भाषा करणाºया अक्कलकोटच्या ‘सिद्रामप्पां’नी ‘कुमठा’ भागात ‘वाळूसम्राटां’चा दबदबा निर्माण केलेला, तर दुधनीच्या ‘शंकरअण्णां’नी ‘पोरी नाचवून अन् बाटल्या पोहोचवून’ नवा इतिहास घडविलेला. कर्नाटकातल्या मटक्याची राजधानी तर म्हणे कैकदा ‘खैराट’नं दुधनीतच हलविलेली. नाही म्हणायला ‘सिद्धूअण्णां’ची पुढची पिढी उसाच्या फडात शिरलेली.

मात्र उसाच्या धंद्यातही किती झटपट मोठं होता येतं, हे लगतच्या ‘दक्षिण’मध्ये ‘सुभाषबापूं’नी दाखविलेलं. दहा हजाराच्या कर्जासाठी शेतकरी बँकांकडे शेकडो हेलपाटे घालतात; परंतु न मागताही लाखोंचं कर्ज परस्पर शेतकºयांच्या नावावर टाकता येतं, हा चमत्कारही याच तालुक्यातून लोकांना समजलेला. खरंतर ही जादू बहुतांश ‘साखरसम्राट’ करतात. केवळ ‘बापूं’ची उघडकीस आलेली, हेच त्यातलं वेगळेपण.

‘मोहोळ’मध्ये उसापेक्षा त्याच्या ‘मळी’ प्रक्रियेवर अधिक प्रामाणिक कष्ट ‘अनगरकर अन् क्षीरसागर’ घेतात. खरंतर, त्यांचा हा व्यवसाय नैतिकतेला धरून नसला तरी शासनाच्या तिजोरीत भर टाकणारा कायदेशीरच. फक्त कर भरला जात नाही, हा भाग वेगळा. 

मंगळवेढा-पंढरीत ‘सॅन्ड गँग’च अधिक जोरात. ‘नागणें’नी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ‘खोकी’ उघडल्या म्हणूनच ‘भारतनाना’ तिसºयांदा आमदारकीचं ‘वैभव’ पाहू शकलेले. ‘सुतावरून स्वर्ग’ गाठण्यात अपयशी ठरलेले ‘लक्ष्मणराव’ आता ‘बाराखडी’च्या क्षेत्रात ‘शिक्षणसम्राट’ बनलेले. लगतच्या सांगोल्यात कुणी ‘माने या ना माने’ परंतु एका ‘चिठ्ठीसम्राटा’नं मोठ्या ‘आनंदा’नं पूर्वीचं ‘घड्याळ’ सोडून एकाचवेळी ‘धनुष्य’ अन् ‘कमळ’ जवळ केलेलं. मात्र ‘वाळूमाफियां’ना सांभाळून घेण्याच्या नादात ‘दीपकआबां’नी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं.

माढ्यात कार्यकर्ते जपण्याच्या नावाखाली ‘संजयमामां’नी किती वाळू ठेकेदार पोसलेत हे त्यांनाही आठवत नसावं. आता तर करमाळ्याची ‘सॅन्डलॉबी’ही त्यांनी हळूहळू आपल्या कब्जात आणलेली. म्हणूनच ‘नारायणआबां’ची मक्तेदारी कमी होत चाललेली. ‘मैनोद्दीन’नंतर दोन नंबर धंद्यातल्या लोकांशी ‘जगताप’ घराण्याचा नक्कीच संबंध आलेला नसावा. ‘बागल’ कधी असल्या मार्गाला लागले नसले तरी ‘लोकांच्या भुरट्या चोºया परवडल्या. मात्र शेतकºयांच्या पैशांवरच दरोडा टाकला जातोय, त्याचं काय?’ असा कडवट सवाल विरोधकांकडून होताच ‘आदिनाथ’च्या टापूत सन्नाटा  पसरतो.

माळशिरसचा ‘सलीम’ अकलूजमध्ये बिनधास्तपणे येऊन ‘ओपन क्लोज’ करत बसतो, तेव्हा ते ‘दादां’ना माहीत नाही, असं नसतं. पॉर्इंट नसतानाही वाळू उपसणारे टगे ‘धैर्यशीलदादां’ना ठाऊक नसतात, असं नाही. मात्र केवळ कार्यकर्ते सांभाळण्यासाठी अशा नेत्यांनाही जेव्हा दुर्लक्ष करावं लागतं, तेव्हा बदलत्या राजकारणातला फंडा आपणच ओळखून घ्यायचा असतो.
 
राहता राहिला विषय बार्शीचा. त्यावर लिहायचं म्हटलं तर अख्खा पिक्चरच तयार होऊ शकतो. तिथली गुंडगिरी जेवढी सुसाट, तेवढेच दोन नंबर धंदेवालेही मोकाट. हे कमी पडलं की काय म्हणून रेशनिंग काळाबाजार प्रकरणात उलट आंदोलनाची धमकी देण्याचं धाडसही दाखविलं जाऊ शकतं, ते केवळ इथंच. आता या मंडळींकडं एवढी डेअरिंग आलीच कुठून, याचं उत्तर जेव्हा ‘पिसें’च्या सोबतीनं ‘राजाभाऊ’ देऊ शकतील, तेव्हा ‘दिलीपराव’ही तयार करतील ‘रसाळ’सारखी आणखी कैक नवी माणसं. तोपर्यंत लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Decent business of black money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.