कट्टर, आक्रस्ताळी भूमिका दलितांनी सोडावी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 09:15 AM2021-06-12T09:15:11+5:302021-06-12T09:15:48+5:30

अलीकडे यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा साहित्य पुरस्कार नाकारला, त्याचेही कारण सरस्वतीच होते.  आता ‘सरस्वती सन्माना’विषयी भूमिका घेण्याची वेळ माझ्यावर आली आहे आणि मी हा पुरस्कार स्वीकारला आहे.

Dalits should give up radical, aggressive role! | कट्टर, आक्रस्ताळी भूमिका दलितांनी सोडावी!

कट्टर, आक्रस्ताळी भूमिका दलितांनी सोडावी!

Next

 डॉ. शरणकुमार लिंबाळे
('सरस्वती सन्मान' विजेते साहित्यिक)

माझ्या ‘सनातन’ या कादंबरीला सरस्वती सन्मान मिळाला. मराठी भाषेचा राष्ट्रीय स्तरावर हा जो गाैरव झाला त्याचा वाटेकरी होण्याचा आनंद मला मिळाला आहे.  महाराष्ट्र साहित्य परिषदेचा साहित्य पुरस्कार सरस्वतीचे कारण देत नाकारणाऱ्या पहिल्या दलित लेखिका ऊर्मिला पवार. त्या वेळी ह्याची वर्तमानपत्रात चर्चा झाली होती. 

अलीकडे यशवंत मनोहरांनी विदर्भ साहित्य संघाचा साहित्य पुरस्कार नाकारला, त्याचेही कारण सरस्वतीच होते.  आता ‘सरस्वती सन्माना’विषयी भूमिका घेण्याची वेळ माझ्यावर आली आहे आणि मी हा पुरस्कार स्वीकारला आहे. मी दलित असण्याइतकेच मी मराठी असणे आणि भारतीय असणे हेदेखील महत्त्वाचे आहे. सरस्वती सन्मान मिळणारा पहिला दलित लेखक म्हणून ह्या घटनेची देशभरात चर्चा झाली.  मराठी माध्यमांनी, समाजानेही माझे खूप काैतुक केले. मराठी साहित्य विश्वात मात्र ह्याचे थंडपणाने स्वागत झाले. अनेक मराठी लेखक  अजूनही सावरलेले दिसत नाहीत. दलित लेखकांनी माैन पाळले. काही उत्साही लोकांनी मला मिळालेल्या सरस्वती सन्मानाविषयी निषेध केला. माैन पाळणाऱ्यांपेक्षा निषेध करणाऱ्यांमुळे माझी बरी वाईट चर्चा तरी झाली. 

दलितांमध्ये केवळ ‘सरस्वती’ला विरोध नाही. हा विरोध खूप व्यापक आहे. तो वेगवेगळ्या मुखवट्यांनी वावरत असतो.  रिपब्लिकन पक्षातील एका गटाने काँग्रेसबरोबर जुळवून घेतले, त्याला विरोध झाला.  नामदेव ढसाळाने दलित शब्दाची व्यापक व्याख्या केली म्हणून त्याला डावा ठरवून हेटाळण्यात आले.  बाबा आढाव दलित पँथर चळवळीत सक्रिय झाले, त्यालाही राजा ढालेनी विरोध केला. रावसाहेब कसबे आंबेडकरवादाचा मार्क्सवादाबरोबर समन्वय घालण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका करून त्यांना विरोध झाला.  काही दलित लेखक हिंदुत्ववादी व्यासपीठावर गेल्यामुळे या चर्चेने अधिक तीव्र स्वरूप धारण केले.

मायावती भाजपबरोबर युती करून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या, ह्यालाही विरोध झाला. ‘शिवसेना आणि भीमसेना एकत्र आली पाहिजे’ म्हणून रामदास आठवले ह्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. इथून रामदास आठवले गट शिवसेना आणि भाजपबरोबर गेला. पुढे रामदास आठवले भाजप सोबत गेले आणि अर्जुन डांगळे त्यांचे सहकारी दलित लेखक शिवसेनेबरोबर राहिले. - ह्या सगळ्या घटनाक्रमांमधून आंबेडकरी समाजात टोकाची आक्रमक, कट्टर स्वजातीय जाणीव निर्माण झाली आहे.  आंबेडकरी विचारांचे नेतृत्व आपणच करू शकतो आणि हे वर्चस्व आंबेडकरी समाजातील सर्वांनी निर्विवादपणे मान्य केलेच पाहिजे; अशी ही टोकदार भूमिका आहे. 

आत्मकथा शब्दामध्ये ‘आत्मा’ येतो म्हणून त्याला विरोध करा आणि त्याऐवजी ‘स्वकथन’ हा शब्द वापरा. व्यासपीठ शब्दामध्ये ‘व्यास’ येतो म्हणून त्याला विरोध करा आणि त्याऐवजी ‘विचारमंच’ हा शब्द वापरा असे इशारे दिले गेले. ‘हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावर जाणाऱ्यांना वेगळे पाडा. त्याला दलित समाजापासून तोडा,’ असे अलिखित फतवे निघाले. उर्मिला पवार आणि यशवंत मनोहर ह्यांनी ‘सरस्वती’ ह्या नावाला विरोध करून पुरस्कार नाकारण्यामागे हीच आक्रमकता आहे. “ह्या आक्रमकतेमुळे आपण एकाकी आणि वेगळे पडू, वेगळे पडणे परवडणारे नाही. आपण आपले मित्र वाढवले पाहिजेत,” अशी माझी भूमिका आहे. ‘भीमा कोरेगावची लढाई’ १८१८ मध्ये झाली. त्याला दोनशे वर्षे उलटली. १९२०च्या ‘मूकनायक’ साप्ताहिकाला शंभर वर्षे होऊन गेली.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे होताहेत. गेल्या शे-दोनशे वर्षांत दलितांनी आपल्या हक्क, अधिकारांसाठी नकार आणि विद्रोहाच्या भूमिका घेतल्या आहेत. ह्या भूमिकेमुळे त्यांनी स्वत:साठी एक स्पेस निर्माण केली आहे.  हजारो वर्षे ज्यांचे अस्तित्व आणि अस्मिता नाकारली गेली होती, त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. ह्या लढ्यात प्रगतिशील विचाराच्या लोकांनी सहकार्य केले असले तरी हा लढा दलितांनी एकाकीपणे अधिक लढवला आहे. त्यासाठी प्रचंड किंमत चुकवली आहे. दलित चळवळीमुळे आणि दलित साहित्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दलितांविषयी जागृती निर्माण झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर दलित समाजात प्रचंड बदल झाला आहे. संविधानामुळे, लोकशाहीमुळे, कायद्यामुळे, शिक्षणामुळे, चळवळीमुळे, साहित्यामुळे, विज्ञानामुळे हे बदल झाले आहेत. केवळ दलित समाज बदलला आहे असे नाही, तर सवर्ण समाजही बदलला आहे.  मग ह्या बदलांचा दलित चळवळीने कसा विचार करायचा? दलितांमध्ये निर्माण होणाऱ्या नव्या पिढीला केवळ नकार आणि विद्रोहच समजावून सांगायचा का? 

काँग्रेससारखा बलाढ्य पक्ष लयाला गेला. एनडीए अस्तित्वात आली.  जाॅर्ज फर्नांडिस, शरद यादव, नितीश कुमार, राम विलास पासवान, मायावती आणि रामदास आठवले अशी मंडळी हिंदुत्ववादी पक्षांबरोबर गेली हे वास्तव आहे. यूपीए अस्तित्वात आली. धर्मनिरपेक्ष पक्ष काँग्रेस सोबत गेले. ज्यांनी हिंदुत्ववादी शक्तींना कडाडून विरोध केला ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून सत्तेत आहेत. कुठल्या एका पक्षाची किंवा जातीची सत्ता येऊ शकत नाही तेव्हा सत्तेसाठी केलेले हे प्रयोग गंभीरपणे अभ्यासले पाहिजेत. मोक्याच्या जागा पटकावायच्या असतील तर आंबेडकरी समाजाने  आक्रमक कट्टर भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे. सहजीवनाची परिभाषा बदलली पाहिजे. आपल्या श्रद्धा जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितक्याच इतरांच्या श्रद्धाही महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेतले पाहिजे.

बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुराष्ट्रीय वातावरण वाढीस लागले आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष कसे करणार?- सरस्वती पुरस्कार स्वीकारण्यामागे कट्टरता नाकारणे, नव्या संवादाची सुरुवात करणे हा माझा विचार आहे. सरस्वतीला जाहीरपणे नाकारून वैयक्तिक जीवनात बाैद्धांनी गाैरी, गणपतीला पुजू नये हे खरे. पण, सार्वजनिक जीवनात नकाराचे हत्यार सावधपणे वापरले पाहिजे. कोणी सन्मान करणार असेल तर, कोठून मदतीच्या हाका येत असतील, कोणी मैत्रीचा हात पुढे करत असेल तर त्याविषयी शंका घेणे गैर आहे. समन्वय आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. दलितांनी आपला वेगळेपणा सोडला पाहिजे. मुख्य धारेने दलितांना वेगळे पाडणे सोडले पाहिजे. आता आपण एकत्र येण्याचा विचार करू या. मला वाटते, हीच समाज क्रांतीची पायवाट होईल.

(डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’ मिळाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा संपादित अंश)

Web Title: Dalits should give up radical, aggressive role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.