...शाप की वरदान ते आपणच ठरवायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:18 PM2020-02-08T18:18:28+5:302020-02-08T18:19:53+5:30

शालेय जीवनात बहुतेक प्रत्येकाने या विषयावर निबंध लिहिला असेल, त्याविषयी त्याची वैयक्तिक मते मनमोकळेपणाने मांडली असली तरी थेट निष्कर्षाला कोणीही पोहोचले नसेल

... a curse or a blessing | ...शाप की वरदान ते आपणच ठरवायचे

...शाप की वरदान ते आपणच ठरवायचे

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
शालेय जीवनात बहुतेक प्रत्येकाने या विषयावर निबंध लिहिला असेल, त्याविषयी त्याची वैयक्तिक मते मनमोकळेपणाने मांडली असली तरी थेट निष्कर्षाला कोणीही पोहोचले नसेल. मध्यममार्ग साधावा, असेच त्याने सुचविलेले असेल. तो विषय आहे, ‘विज्ञान : शाप की वरदान’. खरंय की, नाही. एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तसेच या विषयाचे आहे. विज्ञानाला तुम्ही एकदम शाप म्हणू शकत नाही. वरदान निश्चित आहे, पण काही वैज्ञानिक शोधानंतर झालेल्या यांत्रिक क्रांतीने रोजगार कमी झाले. सुविधा वाढल्या; पण माणूस आळशी बनला. त्याच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. हे वरदान म्हणावे काय? त्यामुळे शेवटी हेच म्हणावे लागते, की विज्ञानाचा उपयोग हा तारतम्याने करायला हवा. माणसाने यंत्र बनविले आहे, यंत्राने माणसाला बनविलेले नाही. त्यामुळे यंत्राने माणसाच्या बुध्दी आणि शरीराचा कब्जा घ्यायला नको. यंत्राचे गुलाम होता कामा नये.
विज्ञानाविषयी जे आपण म्हणतो, तेच तंत्रज्ञानालाही लागू आहे. मोबाईल हे तंत्रज्ञानाने घडविलेले अद्भूत उपकरण आहे. संचारक्रांतीचा परमोच्च बिंदू असे त्याला म्हणावे लागेल. जे आता ५०-६० या वयाचे असतील आणि ज्यांचे बालपण ग्रामीण भागात गेले असेल, त्यांना दूरध्वनी सेवेचे महत्त्व लक्षात येईल. पूर्वी मोठ्या गावांमध्येदेखील ५-१० लोकांकडेदेखील दूरध्वनी संच नसायचे. फोन बूक करावे लागायचे. एक्स्चेंजमधून फोन येण्याची वाट पहात बसावे लागायचे. तुमच्यासाठी फोन आला आहे असे म्हटले म्हणजे, दु:खद बातमी असेल, असेच संकेत होते. तार आली तर ती हमखास ‘कुणी तरी गेले’ असेच समजले जाई. पुढे पीसीओ आले. रात्री ९ व ११ नंतर सवलतीच्या दरात एसटीडी कॉल लावण्यासाठी अक्षरश: रांगा लागायच्या. मोबाईल आला आणि सगळेच बदलले. पूर्वी घरातील दूरध्वनी संचावर हळू आवाजात गुजगोष्टी चालायच्या, आता रेंज नसल्याने कौटुंबिक गप्पाही अंगणात येऊन केल्या जातात. पेजरचा एक टप्पा मध्ये येऊन गेला. संदेशाचे चलनवलन त्याद्वारे होत असे. आता मोबाईलमुळे दूरध्वनी संच आणि पेजर या दोघांचे काम एकत्रितपणे होऊ लागले आहे. इंटरनेटमुळे वेगवेगळ्या सुविधांची बिले घरबसल्या भरु शकतो. फेसबूकद्वारे जगभर संपर्क व संवाद करु शकतो. व्हीडिओ कॉलींगद्वारे प्रत्यक्ष बोलू, पाहू शकतो. अशा एक ना अनेक भन्नाट सुविधा मोबाईलमुळे हाती आल्या आहेत.
विज्ञानाच्या शोधाप्रमाणेच तंत्रज्ञानातील क्रांती असलेल्या मोबाईलचा वापर आम्ही कसा करतो, हेदेखीलं आता महत्त्वाचे ठरले आहे. सारे जग मुठीत आले असले तरी आम्ही सुशिक्षित असूनही अंगठेबहाद्दर झालो आहोत. ताठ कणा आणि मान ठेवून आयुष्यभर जगणारी माणसे मात्र मोबाईलमुळे सतत वाकलेली दिसतात. ही मोबाईलशरणता पाहून व्यसनमुक्तीसारखे मोबाईलच्या व्यसनापासून सोडविण्याचे अभियान चालविले जाऊ लागले आहे. अनेक गुन्ह्यांना मोबाईल कारणीभूत होऊ लागला आहे. पोर्नोग्राफी हा विषय गंभीर आहे. त्यासोबतच अश्लील चित्रण करुन शाळकरी मुली, महिलांना ब्लॅकमेल केल्याचे प्रकार वाढले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करुन आर्थिक फसवणुकीचे प्रकार सर्रास होत आहेत. पारंपरिक पोलीस स्टेशन या बदलत्या तंत्रज्ञानाने होणाऱ्या गुन्हेगारी कृत्याचा तपास करण्यात कमी पडत असल्याने अखेर प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन तयार करण्यात आले. समाजात शांतता आणि सौहार्द्र टिकून रहावे, यासाठी शांतता समिती, मोहल्ला कमिटी गठीत केल्या जातात. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बैठका होतात. आता मोबाईलमुक्तीसाठी पोलीस दल बैठका घेऊ लागले आहे. मोबाईलचे दुष्परिणाम सामाजिक कार्यकर्ते शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन सांगू लागले आहेत.
बोगस, बनावट माहितीचा सुळसुळाट व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून प्रचंड वाढला असून त्याला रोखण्याचे उपाय तोकडे पडू लागले आहेत. खोटे नाटे व्हीडिओ, आॅडिओ तयार केले जातात आणि सर्रास व्हायरल केले जातात. आम्ही भारतीयदेखील कोणतीही खातरजमा न करता त्यावर विश्वास ठेवतो आणि लगेच ते पुढे ढकलतो. अशा खोट्या संदेशांमुळे, व्हीडिओंमुळे दंगली घडल्या आहेत. काही दूरचित्रवाहिन्यांनी खोट्या माहितीचा पर्दाफाश करणारे कार्यक्रम सुरु केले आहेत. व्हायरल सच सारख्या कार्यक्रमातून ‘दूध का दूध और पानी का पानी ’ होते. पण हे किती लोकांपर्यंत पोहोचेल, हा प्रश्न आहेच.
विज्ञान आणि तंत्रज्ञान वरदान असले तरी त्याचा सुयोग्य, सुजाणपणे वापर न केल्यास तो शाप ठरतो, हा अनुभव आपण सगळे घेत आहोत.

Web Title: ... a curse or a blessing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.