बदनामी आणि विखाराला सुसंस्कृत, ठाम उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:33 AM2021-06-19T06:33:10+5:302021-06-19T06:35:23+5:30

राहुल गांधी यांच्या वाट्याला प्रचंड अवहेलना, कुचेष्टा, गलिच्छ ट्रोलिंग आले. तरीही सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची त्यांची धमक, क्षमता उणावलेली नाही!

a Cultured, firm answer to Defamation and disorder from Rahul gandhi | बदनामी आणि विखाराला सुसंस्कृत, ठाम उत्तर

बदनामी आणि विखाराला सुसंस्कृत, ठाम उत्तर

Next

- नाना पटोले, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील एक तेजस्वी व ओजस्वी नेतृत्व आहे. प्रत्यक्ष राजकारण प्रवेश करून त्यांना १७ वर्षे झाली आहेत. या १७ वर्षांच्या कालावधीत त्यांनी राजकारणात नवीन आयाम प्रस्थापित केले. केवळ गांधी कुटुंबाचा वारस या निकषावर त्यांच्याकडे पाहिले तर ते त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. राजकारणात तरुण पिढीने आले पाहिजे यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आणि त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. परखड मते व दूरदृष्टी असलेला हा नेता केवळ काँग्रेस पक्षाचा आहे म्हणून महत्त्वाचा असे नाही, तर भारताला जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा ताठ मानेने उभे करण्याची क्षमता असणारा नेता म्हणून समकालीन महत्त्वाचा आहे. 

आपल्याकडे लोकशाही शासन व्यवस्था आहे.  परंतु २०१४ पासून या देशात लोकशाही परंपरा, मूल्ये, संविधान तसेच स्वायत्त संस्था मोडीत काढून राजकारण करण्याचे काम सुरू असून, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचे असणारे स्थानही सत्ताधारी पक्षाने सातत्याने नाकारले आहे. विरोधकांची गळचेपी करणे, सरकारविरोधात बोलताच त्यांच्यावर कारवाया करून आवाज दाबणे असे अनेक प्रयत्न सुरू असतानाही या हुकूमशाही वृत्तीला न जुमानता सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत डोळे घालून भिडणारा एकमेव नेता म्हणजे राहुल गांधी. कारवाईच्या भीतीने अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरोधात बोलणेच बंद केले असताना राहुल गांधी हे सरकारला आव्हान देत आहेत, नुसतेच आव्हान देत नाहीत तर सरकारला सळो की पळो करून सोडतात. 

आपण मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करीत आहोत. या संकटाची चाहूल लागताच त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील आणि ते परिणाम त्सुनामीपेक्षा भयंकर असतील, असा इशारा देणारा देशातील एकमेव नेता होता तो म्हणजे राहुल गांधी. त्यांच्या बोलण्याकडे सत्ताधारी पक्षाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले; परंतु दीड वर्षानंतर राहुल गांधी यांचा इशारा तंतोतंत खरा ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. लसीकरणासंदर्भातही त्यांनी सरकारला जागे केले परंतु त्याकडेही सुरुवातीला दुर्लक्ष केले गेले, संकट वाढल्यानंतर सरकारला उशिराचे शहाणपण आले; आणि मग राहुल गांधींनी सुचविल्याप्रमाणे निर्णय घेणे भाग पडले. चीनने भारतीय सीमेवर आगळीक करून भारतीय भूभाग बळकावला तसेच २० भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी मारले. हे सर्व मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच झाल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदी चीनचे नाव का घेत नाहीत? ते चीनला घाबरतात, चीनसमोर मोदींनी गुडघे टेकले आहेत, असे परखडपणे सांगण्याचे धाडस फक्त राहुल गांधी यांनीच दाखवले. जमीन अधिग्रहण कायदा आणून शेतकऱ्यांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव होता, त्याविरोधात तीव्र आंदोलन करून राहुल गांधी यांनी मोदींचे मनसुबे उधळले. आताही तीन कृषी कायद्यांविरोधात देशभर आंदोलन करून मोदी सरकारला हे कायदे स्थगित करावयास भाग पाडले. सत्ताधारी पक्षाला थेट आव्हान देण्याची धमक असणारे राहुल गांधी हेच एकमेव नेते देशात आहेत. राहुल गांधी यांना आम्ही गंभीरपणे घेत नाही, असे म्हणत त्यांची खिल्ली उडविणारे लोकच राहुल गांधींच्या एका वक्तव्यानंतर खुलासा करण्यासाठी अर्धे मंत्रिमंडळ, डझनभर प्रवक्ते आणि शेकडो नेत्यांना मैदानात उतरवतात हाच त्यांचा वचक आहे.

कोणताही पक्ष अजिंक्य नाही, निवडणुकीत हार-जीत ही होतच असते; पण एखाद्या पराभवाने खचून जाणारे राहुल गांधी नाहीत. पराभव झाला तर त्याची जबाबदारी घेण्याची नैतिकताही त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी घेत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिला. २००४ साली राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाले. २००४ ते २०१४ या दहा वर्षांत काँग्रेस प्रणीत डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार होते. राहुल गांधी यांनी सरकारमध्ये मंत्री होण्याची किंवा पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली असती तर त्यांना ते सहज शक्य होते. त्यांनी सरकारमध्ये मंत्री व्हावे अशी काँग्रेस नेत्यांची इच्छाही होती; परंतु त्यांनी ते कटाक्षाने टाळले. पक्ष संघटन बळकट करण्याकडे त्यांनी लक्ष दिले. राहुल गांधींना अपयशी ठरविणारे लोक मात्र हे जाणीवपूर्वक विसरतात की त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या विरोधी पक्षांना घाम फोडून भ्रमात राहणाऱ्या नेत्यांना त्यांच्याच राज्यात तगडे आव्हान दिले. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येऊ शकले नाही; परंतु विरोधकांचा विजयही सुकर होऊ दिला नाही. त्यानंतर राजस्थान, पंजाब, छत्तिसगड, मध्य प्रदेशातही भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसचे सरकार आणले पण त्याचे श्रेय राहुल यांना देण्याचा मोठेपणा विरोधी पक्षांकडे नाही. राहुल गांधी यांच्या वाट्याला जेवढी अवहेलना, कुचेष्टा, गलिच्छ ट्रोलिंग, अपमान आला तेवढा इतर नेत्यांच्या वाटेला आलेला नाही. विरोधकांच्या बदनामी मोहिमेला न डगमगता त्यांची वाटचाल दिमाखात सुरूच आहे. “तुम्ही माझा कितीही द्वेष करा; पण मी तुमच्याशी प्रेमानेच वागेन,” असे ते नेहमी सांगतात, हे त्यांच्यातील सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.

भारतीय लोकशाही परंपरा जोपासत सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार घेऊनच राहुल गांधी यांचे मार्गक्रमण सुरू आहे. जातीच्या व धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखाराविरोधात मोठ्या धैर्याने तोंड देत राहुल गांधी यांचा संघर्ष सुरू आहे. या देशाला एक समृद्ध, आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून जगात उभे करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेल्या नेहरू-गांधी कुटुंबाचा वारसा लाभलेले राहुल गांधी हेच देशाला तारू शकतात आणि तेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. राहुल गांधी यांच्याशिवाय देशात दुसरा सक्षम पर्याय नाही. त्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर बसवण्यासाठी आम्ही सर्वशक्तिनिशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

Web Title: a Cultured, firm answer to Defamation and disorder from Rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.