मृत्यूच्या भयाने रोज रोज कशाला मरावे?

By विजय दर्डा | Published: May 10, 2021 06:00 AM2021-05-10T06:00:00+5:302021-05-10T06:00:07+5:30

मी काय म्हणतो, सोडा सगळ्या चिंता! जिवंत राहायचे तर सगळे बळ एकवटावे लागेल. मन, बुद्धी शांत ठेवावी लागेल. सुखाचे क्षण शोधावे लागतील. 

CoronaVirus Why die every day for fear of death | मृत्यूच्या भयाने रोज रोज कशाला मरावे?

मृत्यूच्या भयाने रोज रोज कशाला मरावे?

Next

 विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह -

‘कोरोना कोरोना कोरोना... सारखे तेच तेच शब्द कानावर पडून माझे डोके जड पडायला लागते.. भीतीने माझा थरकाप उडतो,  एकाएकी मला मृत्यू समोर दिसू लागतो आणि मग मी थेट पीएम, सीएम, डीएम यांच्या नावाने खडे फोडणे सुरू करतो... मला लस मिळत नाही.. पुरेशी औषधे नाहीत.. माझ्या नातेवाइकाला ऑक्सिजन बेड मिळत नाहीये.. बायकोला अतिदक्षता विभागात जागा  मिळत नाहीये.. माझा भाऊ तिकडे तडफडतोय.. माझा जिवलग मित्र मला सोडून गेला.. या महामारीत माझा धंदा चौपट झाला... हे सरकार निर्दयी, निरुपयोगी आहे... सरकारला कुणाची पर्वा उरलेली नाही!!’
- बरं मग, पुढे काय?
असे पाहा, हे सरकार आपले आहे. थोडा विश्वास ठेवा व्यवस्थेवर! आणि समजा, नाही ठेवलात तुम्ही विश्वास, तर काय होईल? - आधीच कलकललेल्या तुमच्याच डोक्यात नकारात्मक रसायने भरतील आणि तुमचीच भीती वाढत जाईल! जे काही बरे घडते आहे, होते आहे तेही धड होणार नाही... नाही का?
हे खरे की सध्या प्रत्येक जण आपला जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्यावर संकट येऊ नये म्हणून मनोमन लढतो आहे. मी काय म्हणतो, सोडा सगळ्या चिंता! प्राप्त परिस्थितीत शक्य आहे,  ते सर्व सरकार करीलच, पण आपल्यापैकी प्रत्येकालाही काहीतरी करावे लागेलच ना? तगून राहायचे असेल, जिवंत राहायचे असेल, तर आपल्यात असेल नसेल ते सारे बळ एकवटावे लागेल.  मन आणि बुद्धी शांत ठेवावी लागेल. सुखाचे क्षण शोधावे लागतील. मन, बुद्धी शांत राहिली तर शरीर स्वस्थ राहील. 

वैज्ञानिक सांगतात, तुम्ही तणावग्रस्त असाल, डोके शांत नसेल, तर त्याचा थेट परिणाम शरीराच्या काम करण्यावर होतो. हे लक्षात घेता सध्या सर्वाधिक गरज आहे ती छोटे-छोटे आनंद शोधण्याची... ज्यातून आपल्याला दिलासा लाभेल, शरीर आपणहून अँटिबॉडीज तयार करील. त्यासाठी अनुकूलता निर्माण करील. सध्या मला सारखी ‘आनंद’ चित्रपटाची आठवण येते आहे. राजेश  खन्नाला माहिती असते तो फार दिवसाचा सोबती नाही; पण तोच डॉक्टरांना म्हणतो, ‘‘जिंदगी बडी होनी चाहिये, बाबुमोशाय... लम्बी नही! जबतक जिंदा हूँ, मरा नही!...’’

हाच राजेश खन्ना  ‘बावर्ची’ या चित्रपटात म्हणतो, ‘‘किसी बडी खुशी के इंतजार में हम छोटी-छोटी खुशियों के मौके खो देते हैं!’’  सांगण्याचा मुद्दा, मृत्यूच्या भयाने रोज काय मरायचे? बिकट परिस्थितीत छोटे-छोटे आनंद दिलासा देतात हेच खरे.

दोन दिवसांपूर्वी मी गुजरातमधल्या एका मित्राला फोन केला. पहिल्यांदा त्याने खास देशी भाषेतले काही अस्सल  शब्द ऐकविले. या ‘अशा’ गप्पा मित्रच करू शकतात. दुसऱ्या कुणाशी तसे बोलणे शक्य नसते.  त्यानंतर आम्ही इतके हसलो, खिदळलो की सगळे शरीर मोहरून उठले. मनावरची काजळी कधी पुसली गेली कळलेही नाही! मान्य की  आज आपण घरात बंद होऊन पडलो आहोत, पण फोन उचलून जिवलगांशी भरपेट गप्पा मारायला, हसायला-खिदळायला कुठे कुणी बंदी घातलीय? 

चला एक उदाहरण देतो... तणावग्रस्त होऊन, तोंड पाडून तुम्ही घरी येता तेव्हा बायको विचारते, काय झाले?.. तुम्ही  कारण सांगता.  मग ती म्हणते, ‘कशाला एवढी काळजी करता?- मी आहे ना!’... आणि तुम्ही एकदम चिंतामुक्त होता. एकदम मुलं  येऊन बिलगतात आणि तुम्ही जगातल्या सगळ्या चिंता विसरता... गाण्याचे शब्द माहीत नसतानाही गुणगुणू लागता, नकळत तुमची पावले ताल धरतात... आपल्या मेंदूला तरतरी देणारा हाच तो प्रसन्न, दिलकश माहोल!... त्यातूनच शरीर स्वस्थ होते.

आणि हो, तुम्ही तुमच्या जीवनशैलीकडे जरूर लक्ष द्या. मला तर हल्ली वाटते,  विज्ञानाच्या विकासाबरोबर माणूस अनेक जटिल समस्यांत अडकत जाईल आणि दुनियेवर हुकूमत गाजविण्याच्या नादात न जाणो आणखी  काय काय खेळ करील!!!! पर्यावरणाच्या असंतुलनाची समस्या सर्वांत मोठी असेल. त्या असंतुलनाबरोबर जीवनही असंतुलित होईल. विज्ञानाने निर्माण केलेला कचरा, त्यातून होणारे उत्सर्जन, वनांचा विनाश, प्राणिमात्रांच्या प्रति टोकाची अनास्था आणि क्रोर्य, प्रदूषित पाणी आणि विषारी हवा हे सारे घटक आपले जीवन, परिवार मुले, या सगळ्यांवर  परिणाम करतील. ज्यांची मानसिक, शारीरिक स्थिती चांगली असेल तेच या समस्यांना तोंड देऊ शकतील. तन, मन तंदुरुस्त ठेवण्यात प्राणायाम, अध्यात्म, प्रसन्नता, मित्र आणि घरातले वातावरण महत्त्वाची भूमिका बजावतील! आपल्याला ताज्या विषमुक्त भाज्या, धान्य, फळे  मिळतील हे विसरून जा. माणसाच्या हव्यासापोटी त्याचा इतरांशी होणारा व्यवहार विनाशाकडे नेणाराच होत चाललाय. भेसळ कोण करते? माणूसच ना!! नकली औषधेही तोच तर तयार करतो!

तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल आणि दुसऱ्याच्या  मजबुरीचा फायदा उठवून नोटा कमावत असाल तर हे लक्षात ठेवा त्या नोटातून मिळणारी खुशी साजरी करायला कदाचित तुम्ही शिल्लकच उरणार नाही!  पैसा काय जाळायचाय? वास्तवात आज सारे वातावरण माणुसकीचे शत्रू झाले आहे. एकही घर असे नाही जे औषधमुक्त आहे. औषधे म्हणजे रसायनेच तर असतात.

तर आता तरी स्वत:ला सावरा. कुठून निराशा येत असेल तर झटका ती.  अंधारानंतर प्रकाश दारावर टकटक करीतच असतो. काही अंधार आपण सर्वांनी पाहिले, काही आपल्या पूर्वजांनी... त्यावेळी समाज आजच्या इतका विज्ञानसंपन्न नव्हता, तरीही तो अंधार परतविण्यात आपले पूर्वज सफल झाले. आज आपल्याला विज्ञानाचा मोठा आधार आहे. हा अंधार आपण नक्की ओलांडू. अलीकडे माझ्या मनाशी काही शब्द, काही ओळी रुंजी घालत  असतात...
क्यों कोसे अंधेरे को 
कुछ फायदा तो नहीं! 
चलो ढुंढते हैं मिलकर 
सूरज की मुठ्ठीभर रोशनी!!
 

Web Title: CoronaVirus Why die every day for fear of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.