आयडिया ऑफ इंडिया टिकवण्याचं आव्हान; काँग्रेसनं बदल स्वीकारायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:52 AM2021-10-18T05:52:20+5:302021-10-18T05:52:48+5:30

आयडिया ऑफ इंडिया टिकली तरच देशाची एकात्मता आणि अखंडता टिकणार आहे. हे देशातील आम जनतेला पटवून देण्यासाठी काँग्रेसलाही तशी मोहीम राबवावी लागेल.

congress must have to take aggressive steps to save Idea of India | आयडिया ऑफ इंडिया टिकवण्याचं आव्हान; काँग्रेसनं बदल स्वीकारायला हवा

आयडिया ऑफ इंडिया टिकवण्याचं आव्हान; काँग्रेसनं बदल स्वीकारायला हवा

Next

राजकीय घराणेशाहीची टीका आता बोथट झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वपदी नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचे वर्चस्व राहिल्याने ही टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्या विरोधी पक्षांनाही सत्ता मिळताच त्यांचीही घराणेशाही सुरू झाली. मात्र काँग्रेसच्या घराणेशाहीला एक वलय आहे. शिवाय काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी घराण्याचे उदात्तीकरणदेखील करण्यात आले आहे. परिणामी या घराण्याशिवाय इतरांना नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही. पर्यायाने काँग्रेसमध्ये छोटी-मोठी बंडखोरी अनेकदा झाली आहे. आजही पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांत काँग्रेस विचारांचे बंडखोर पक्ष सत्तेत आहेत. तेथे नेहमीच नेतृत्वाच्या वादावरून सुमारे सत्तर वेळा छोटी छोटी बंडाळी झाली आहे. पण संपूर्ण देश पातळीवर काँग्रेसला पर्याय कोणी देऊ शकले नाही. भाजपची सत्ता आणि बहुमत हा काँग्रेसला पर्याय नाही. ती सत्तेला पर्याय आहे.



भारतीय राज्यघटनेला मानणाऱ्या अनेक पक्षांपैकी सर्वात जवळचा पर्यायी पक्ष काँग्रेसच आहे. या देशात धार्मिक विभाजनाच्या आधारे सत्तांतर कधी होणार नाही, या गृहीतकासच तडा गेला आहे. त्यामुळे नेतृत्वाने पक्ष संघटनांकडे अधिक गांभीर्याने बघण्याची मागणी अनेक काँग्रेसजन करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा त्याग करून पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून काँग्रेसचे अध्यक्षपद प्रभारी म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे आले आहे. पक्षाला अध्यक्षच नाही, पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी करतानाच सौम्य हिंदुत्वही स्वीकारले जावे, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. श्रीमती सोनिया गांधी यांना तो मान्य होणार नाही. आयडिया ऑफ इंडिया किंवा भारताची संकल्पना जी राज्यघटनेला अभिप्रेत आहे, त्या विचारावर काँग्रेस पक्ष उभा आहे. त्यासाठी अधिक आक्रमक काम करणे आवश्यक आहे. त्याला जनता प्रतिसाद देते. शिवाय प्रादेशिक पातळीवर नव्या दमदार नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. नव्या कल्पना घेऊन काम करणाऱ्या तरुणांना संधी दिली पाहिजे. अशा तरुणांना पुढे आणले पाहिजे, तरच काँग्रेस पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करू शकेल.



काँग्रेस पक्षानेच संगणकाचा स्वीकार केला, आर्थिक उदारीकरण आणून, जागतिकीकरणाला प्रोत्साहन दिले. परिणाम आज जो आधुनिक भारत दिसतो त्याचा पाया काँग्रेसने घातला आहे, हे सांगायचे कोणी? माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांनी १९९१ पासून भारतीय अर्थकारणाला नवे वळण दिले. म्हणून आज जगाच्या पाठीवर सर्वत्र तरुण वर्ग नेतृत्व करतो आहे, हे विसरून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर भारत या कल्पनेला पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आदींनी आकार दिला. तशी उत्क्रांती डाॅ. मनमोहन सिंग यांनी केली. हा विश्वास भारतीय जनतेला देण्यासाठी काँग्रेस पुन्हा लढण्यासाठी बदलणार आहे? श्रीमती सोनिया गांधी यांना आरोग्याच्या कारणांनी मर्यादा आल्या असल्याने राहुल गांधी यांनी नेतृत्व स्वीकारायला हवे. उद्या सरकार सत्तेवर आल्यावर पंतप्रधान म्हणून नेतृत्व कोणी सांभाळायचे हे ठरविता येऊ शकते. आपण अध्यक्षीय पद्धत अजून स्वीकारलेली नाही. आपली लोकशाही प्रातिनिधिकच आहे. ज्या पक्षाचे बहुमत त्यांनी नेता निवडून देश चालवायचा, असे अभिप्रेत आहे.

भाजपमध्ये प्रतिनिधी निवडण्याचा निर्णय सदस्यांमधून न होता  दुसराच कोणी नेता जाहीर केला जातो. ही प्रथा लोकशाहीला घातक आहे. यासाठी काँग्रेसने नेतृत्वापासून देशाला कोणत्या धोरणाने वाटचाल करावी याची भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे. यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांनी ‘मी आहेच, मला कधीही भेटा’, असे सांगून थांबु नये. जनता राजवटीचा खेळखंडोबा पावणेतीन वर्षातच झाल्याने श्रीमती इंदिरा गांधी यांनी आयडिया ऑफ इंडियाला तडा जातो आहे, हे भारतीयांना पटवून दिले होते. त्यासाठी देश पिंजून काढला होता. सध्याच्या भाजप सरकारची वाटचालही तशीच दिसते आहे. आयडिया ऑफ इंडिया टिकली तरच देशाची एकात्मता आणि अखंडता टिकणार आहे. हे देशातील आम जनतेला पटवून देण्यासाठी काँग्रेसलाही तशी मोहीम राबवावी लागेल. संपूर्ण देश पिंजून काढावा लागेल. हे करण्यासाठी पक्षाची भूमिका ठाम असावी लागेल. यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांनी पुढाकार घ्यावा. भाजपचा विजयापेक्षा पराभवच अनेकवेळा झाला होता. तरीही त्यांनी चिकाटी आणि जिद्द सोडली नव्हती. त्यांचा पराभव करणे अवघड नाही, त्यासाठी काँग्रेसने बदल स्वीकारला पाहिजे.

Web Title: congress must have to take aggressive steps to save Idea of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.