टाटा, रिलायन्स, अदानी या बड्या खेळाडूंमध्ये टक्कर; भारतीय बाजारपेठेसाठी निश्चितच फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:54 AM2021-07-27T05:54:07+5:302021-07-27T05:55:06+5:30

अपारंपरिक आणि हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये तीन आघाडीच्या कंपन्या उतरणे ही घटना भारतीय बाजारपेठेसाठी फायदेशीर ठरेल का?

Clash between big players like Tata, Reliance, Adani; Definitely beneficial for the Indian market | टाटा, रिलायन्स, अदानी या बड्या खेळाडूंमध्ये टक्कर; भारतीय बाजारपेठेसाठी निश्चितच फायदेशीर

टाटा, रिलायन्स, अदानी या बड्या खेळाडूंमध्ये टक्कर; भारतीय बाजारपेठेसाठी निश्चितच फायदेशीर

Next

राही भिडे, ज्येष्ठ पत्रकार

भांडवलनिर्मितीत आघाडीवर असलेल्या कंपन्यांमध्ये सध्या चांगलीच स्पर्धा रंगली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज  आणि देशातील एक विश्वासार्ह ब्रँड  टाटा या त्या दोन मोठ्या कंपन्या! टाटांच्या  वीज उत्पादन क्षेत्रात  आता रिलायन्सने प्रवेश केला आहे. गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात टाटा पूर्वीपासून आहे. गृहोपयोगी वस्तूंच्या वितरणात रिलायन्स हा बाजारातील मोठा खेळाडू असताना टाटाही किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात उतरत आहेत. या दोन मोठ्या घराण्यातील ही स्पर्धा ग्राहकांच्या हिताची ठरली, तर अधिक चांगले होईल.

गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक क्षेत्रे आता मागे पडली आहेत.  पूर्वी ज्या क्षेत्रात काम केले, त्याच क्षेत्रात आता परिस्थिती प्रतिकूल असेल, तर बड्या उद्योगांना नवनवी क्षेत्रे धुंडाळावी लागतात. टाटा पूर्वी कोळशापासून वीजनिर्मिती करायचे. आता कोळशापासून वीजनिर्मिती तोट्याची झाली असून, अपारंपरिक आणि हरित ऊर्जा क्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. गौतम अदानी यांनी फार अगोदरच हरित ऊर्जा क्षेत्रात शिरकाव केला आहे. अदानी आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा करीत असल्याचे दिसते. आता अंबानीही हरित ऊर्जा क्षेत्रात दमदार पावले टाकीत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी साठ हजार कोटी रुपये भागभांडवल गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. हरित आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात गौतम अदानी यांची अगोदरच मोठी गुंतवणूक आहे. रिलायन्सपाठोपाठ आता टाटा उद्योग समूहही या क्षेत्रात उतरतो आहे. त्यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा तीव्र होत असून, त्याचा फायदा ग्राहकांना होण्याची शक्यता आहे. 

रिलायन्स ऑनलाइन किरकोळ बाजारात ठाण मांडून असताना  टाटा ऑनलाइन रिटेलिंगसाठी आपले सुपर ॲप बाजारात आणण्याची तयारी करीत आहेत.  देशातील सर्वांत मोठा कॉर्पोरेट गट असलेल्या टाटांकडे सध्या नूतनीकरणयोग्य ऊर्जा क्षमता क्षेत्रातला पोर्टफोलिओ आहे. पवन व सौर ऊर्जेचे उत्पादन २.७ मेगावाॅट आहे. भविष्यात अधिक गुंतवणुकीला प्राधान्य देणारे हे क्षेत्र आहे.  रिलायन्सनेही २०३० पर्यंत कमीत कमी शंभर मेगावाॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. 

टाटा पॉवरने २०१६ मध्ये नूतनीकरणयोग्य ऊर्जा व्यवसायाचे अधिग्रहण करून या क्षेत्रात पाऊल टाकले. वेल्सपन ही कंपनी टेकओव्हर करताना टाटाने तिच्यात नऊ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आता २०३० पर्यंत स्वच्छ व हरित ऊर्जा क्षमता आठशे टक्क्यांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. टाटा पॉवरने सौर ऊर्जा निर्मितीसाठी ८७०० कोटी रुपयांची मशिनरी पुरविली. त्यातून २,८०० मेगावॉट वीजनिर्मिती होते. टाटा पॉवरची सध्याची उत्पादन क्षमता १२,८०८ मेगावॉट आहे. २०२५ पर्यंत ही क्षमता २५ हजार मेगावॉट करण्याची योजना टाटाने आखली आहे. येत्या तीन वर्षांत रिलायन्स आपला नूतनीकरणक्षम ऊर्जा व्यवसाय वाढवीत आहे. 

अदानी ग्रीन, रिलायन्स, एनटीपीसी आणि टाटा पॉवरसारख्या अव्वल खेळाडूंमध्ये होणारी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. त्याचे कारण सर्व कंपन्या हरित ऊर्जेमध्ये गुंतवणूक वाढवीत आहेत. या सर्व स्पर्धक कंपन्यांसाठी भारतात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएमने किरकोळ बाजारात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली असून, ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल व्यवसायात टाटा आणि रिलायन्सचा शिरकावही गृहीत धरावा लागेल. रिलायन्स रिटेलच्या तुलनेत अजून टाटा फारच मागे आहेत. टाटा आता सुपर ॲपवर हॉटेलच्या खोल्यांपासून ते कारपर्यंत सर्व काही विकू शकतील. टाटा विरुद्ध जिओ मार्ट ही पुढच्या काळात मोठी कॉर्पोरेट लढाई असेल. टाटाची गृहोपयोगी उत्पादने आणि ब्रँडमध्ये मक्तेदारी आहे. रिलायन्सला गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक उद्योग समूहाचा पाठिंबा आहे. २०२५ पर्यंत ऑनलाइन किराणा व्यापारात रिलायन्सचा वाटा पन्नास टक्के असेल.

एकूण ई-काॅमर्स व्यापारात रिलायन्सचा एकट्याचा सहभाग तीस टक्के असेल. त्यामुळे रिलायन्सचा या क्षेत्रातील दबदबा लक्षात येतो. जिओ मार्टने किराणा सामान आणि फॅशनमधील क्षमता विकसित करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे, तर टाटा सुपर ॲप किराणा सामान, फळे, फार्मसी, कार आणि शिक्षण यासह सेवांच्या विस्तृत वर्गीकरणावर लक्ष केंद्रित करीत आहे. दोन्ही कंपन्यांनी विविध प्रकारातील या क्षेत्रातील प्रस्थापित कंपन्यांच्या अधिग्रहणाचा सपाटा लावला आहे. जिओ मार्टने अर्बन लेडर, नेटमेड्स आणि झिवामे यांचे अधिग्रहण केले आहे, तर टाटा डिजिटलने बिग बास्केट आणि अन्य कंपन्या टेकओव्हर केल्या आहेत. दोन्ही कंपन्या ऑनलाइन सुपर स्टोअर स्थापित करण्याचा प्रयत्न करतील. या दोघांमधील स्पर्धा भारतीय बाजारपेठेसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

Web Title: Clash between big players like Tata, Reliance, Adani; Definitely beneficial for the Indian market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.