सभोतीच्या गर्द ‘कोविड’ रानात हरवून गेलेली चाफेकळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 03:12 AM2020-09-23T03:12:54+5:302020-09-23T03:15:08+5:30

अभिनयाचा वसा आशातार्इंनी शेवटपर्यंत सांभाळला. यातच कोविडच्या संसर्गाने त्याना गाठले. ही घटना कुठेतरी ज्येष्ठ कलाकारांकडे होणाºया दुर्लक्षाकडेही निर्देश करते आहे. हे कलाकार म्हणजे आपल्या सांस्कृतिक संचिताचा मूर्ताविष्कार. त्यांना जपणे हे लोकनियुक्त शासनाचे कर्तव्य. त्याची चरचरती आठवण करून देण्यासाठी आशातार्इंसारखा कोहिनूर गमवावा लागला, हे आपले दुर्दैव नाही तर काय?

Chafekali Ashalata lost in the surrounding ‘covid’ forest | सभोतीच्या गर्द ‘कोविड’ रानात हरवून गेलेली चाफेकळी

सभोतीच्या गर्द ‘कोविड’ रानात हरवून गेलेली चाफेकळी

Next

- राजू नायक। संपादक, लोकमत, गोवा
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकरांचा बळी कोविडने घेतला. हे नाव नव्या पिढ्यांना कदाचित अपरिचित वाटेल. पण संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाच्या उत्तरार्धात रंगभूमीवर आलेल्या आशातार्इंचा अभिनय आणि गाण्याची समज यांचा आस्वाद झापांच्या मौसमी प्रेक्षागारात बसून घेतलेले नाट्यरसिक आजही हयात आहेत. आशातार्इंच्या जाण्याने त्यांच्या हृदयाचा ठोका निश्चितच चुकलेला असेल. संगीत ‘मत्स्यगंधा’मधली ‘तव भास अंतरा झाला’ किंवा ‘गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी’ ही गाणी अजरामर होण्यामागे पं. जितेंद्र अभिषेकींच्या संगीत निर्देशनाबरोबर आशातार्इंच्या अनाघ्रात, निर्मळ आवाजाचेही योगदान होते.


आशाताई गोव्याच्या दक्षिणेकडे असलेल्या काणकोण तालुक्यातील पाळोले या निसर्गरम्य गावच्या. पोर्तुगीज काळात सुदृढ झालेल्या जातीपातींच्या उतरंडीतून काही समाजांची बरीच पिळवणूक झाली. आशातार्इंच्या परिवाराच्या वाट्यालाही ते भोग आले. तिथल्या देसाई परिवाराने त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. ते ऋण आशातार्इंनी कायम वाहिले. मुंबईतल्या आपल्या कलासाधनेच्या व्यस्त व्यापातून त्या वर्षाकाठी दोनवेळा तरी आवर्जुन गोव्यात येत आणि या परिवाराच्या सान्निध्यात वेळ सारीत. कलेची उपजत समज असलेल्या असंख्य गोमंतकियांनी गोव्यात सडत राहण्यापेक्षा मुंबईची दिलेर खातीरदारी जवळ केली. त्यात आशातार्इंच्या मातोश्रीही होत्या. छोट्या आशाला त्यांनी गोव्यात मामाकडेच ठेवले होते. तेथेच तिचे तिसरीपर्यंतचे शिक्षण झाले व मग ती आईसोबत राहण्यासाठी मुंबईला गेली. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांनी या मायलेकींना साहाय्य करत त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आशातार्इंना अभिनयाची वाट दाखविण्याचे श्रेयही गोपीनाथरावांकडे जाते. १४ वर्षांच्या या मुलीला गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संशयकल्लोळ’ नाटकात भूमिका मिळाली ती त्यांच्याच प्रयत्नाने. याच दरम्यान आशातार्इंचे लक्ष अध्ययनावर स्थिरावले होते. इतिहास हा विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठातून बीए व नंतर एमएदेखील केले. याच दरम्यान त्यांचा परिचय माहिती खात्यात अधिकारीपदावर असलेल्या वाबगावकरांशी झाला व दोघे विवाहबद्ध झाले. मात्र कालांतराने आशातार्इंचे नाट्यप्रेम पतीराजांना खपेनासे झाल्यावर दोघांच्या वाटा विलग झाल्या. आशातार्इंनी पूर्णवेळ अभिनयकलेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. देखणे रूप, अभिनयाची उपजत जाण आणि सुरांशी असलेली सलगी या बळावर त्यांनी नाट्यसृष्टी तर काबीज केलीच, पण चित्रपटसृष्टीतही आपला दबदबा निर्माण केला. कालांतराने छोट्या पडद्यावरल्या वाहिन्यांना सुगीचे दिवस आले तेव्हाही अनेक निर्मात्यांनी आशातार्इंच्या सोज्वळ चेहऱ्याला आणि निर्व्याज अभिनयाला पसंती दिली. अखेरच्या दिवसांपर्यंत त्या कामात व्यग्र राहिल्या.


गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेचा आशातार्इंच्या जडण घडणीत सिंहाचा वाटा होता. ‘मत्स्यगंधा’मधील अजरामर गाण्यांचा उल्लेख वर आलेला आहेच. अभिषेकीबुवांच्या चोख तालमीत आशाबार्इंनी ही गीते गायली. चूक झाल्यास बुवा प्रसंगी हातही उचलायचे, अशी आठवण आशातार्इंनी हल्लीच एका मुलाखतीत सांगितली होती. गोव्यात कलागुणांची कदर होत नसल्याने अनेकांनी मुंबई गाठली आणि त्यातले बरेच गोव्यातील असहिष्णुतेचा आजन्म तिरस्कार करत जगले. आशातार्इंनी मात्र तसे केले नाही. गोवा सतत त्यांच्या मर्मबंधात राहिला. घरात असताना त्या कोकणी बोलत. ती कोकणीही शुद्ध, परभाषेचा संस्कार न झालेली असायची. गीतकार उदय भेंब्रे यांनी एचएमव्हीच्या आग्रहावरून पाच गाणी लिहिली आणि ती सर्व आशातार्इंचा आवाजात रेकॉर्ड करण्यात आली. ‘रात सोपूं वात आसा’,‘काजाराचें उतोर तुका दितां’, मोगान पिशें जालां खोशी’, ‘बाजाराचो दीस’ आणि ‘नाका ओशे मारूंक दोळे’ ही ती पाच गीते. भेंब्रे सांगतात, आशातार्इंचे कोंकणी उच्चार इतके अस्सल होते की त्यात दुरुस्ती करायची वेळ कधीच आली नाही. गोवा, कोंकणी यांच्याप्रतीचा निर्व्याज स्नेह आशातार्इंनी सतत जपला. ऋजू स्वभावामुळेच आशाताई आपल्या सहकलाकारांत नेहमीच प्रिय झाल्या.


अभिनयाचा वसा आशातार्इंनी शेवटपर्यंत सांभाळला. यातच कोविडच्या संसर्गाने त्याना गाठले. ही घटना कुठेतरी ज्येष्ठ कलाकारांकडे होणाºया दुर्लक्षाकडेही निर्देश करते आहे. हे कलाकार म्हणजे आपल्या सांस्कृतिक संचिताचा मूर्ताविष्कार. त्यांना जपणे हे लोकनियुक्त शासनाचे कर्तव्य. त्याची चरचरती आठवण करून देण्यासाठी आशातार्इंसारखा कोहिनूर गमवावा लागला, हे आपले दुर्दैव नाही तर काय?

Web Title: Chafekali Ashalata lost in the surrounding ‘covid’ forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.