'या' लेखकांची जातकुळी कंची?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:10 AM2020-06-26T03:10:56+5:302020-06-26T03:11:08+5:30

‘हॅरी पॉटर’ची जगप्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यांच्यासाठी ही संस्था काम करते.

The caste of 'Ya' writers? | 'या' लेखकांची जातकुळी कंची?

'या' लेखकांची जातकुळी कंची?

googlenewsNext

- नंदकिशोर पाटील
संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात आहे. या साथीच्या आजारामुळे अनेकांचे वर्तमान व भविष्यही अंधकारमय झालेले असताना मानवी मूल्यांसाठी आपल्या चरितार्थाच्या साधनांवर पाणी सोडण्याचा वेडेपणा कोण करेल? पण ब्रिटनमधल्या चार लेखकांनी तो केला आहे. फॉक्स फिशर, ड्र्यू डेव्हिस आणि उगला स्टेफानिया जेंस्टीटीर हे ते ब्रिटिश वेडेपीर. चौथा लेखक अनामिक आहे. या चौघांनी लिंग परिवर्तित (ट्रान्सजेंडर) लोकांच्या हक्कांसाठी एका नामांकित प्रकाशनविषयक संस्थेचा राजीनामा दिला आहे. ‘हॅरी पॉटर’ची जगप्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यांच्यासाठी ही संस्था काम करते.
रोलिंग यांच्यामुळे सध्या ब्रिटनमध्ये मोठे वैचारिक आणि सामाजिक वादळ उठले आहे. समलैंगिकता आणि लिंग परिवर्तित लोकांच्या लैंगिक संबंधांना काही अपवाद वगळता जगभर मान्यता मिळालेली असताना या रोलिंगबार्इंनी ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या विरोधात सोशल मीडियात पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. रोलिंग यांच्या मते, ‘जर ३० वर्षांनंतर माझा जन्म झाला असता तर मी कदाचित लिंग परिवर्तनाबद्दल विचार केला असता. स्त्रीत्व टाळण्याचे वा ते मिळविण्याचे आकर्षण मोठे असते; पण अशा प्रकारच्या शारीरिक बदलातून काही साध्य होईल असे मला वाटत नाही.’ लहानपणी आपण घरगुती हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. रोलिंग सध्या लहान मुलांसाठी ‘द इकाबॉग’ नावाची कादंबरी लिहिण्यात व्यस्त आहेत. या कादंबरीचा पहिला अध्याय त्यांनी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. एकीकडे या कादंबरीला बच्चे कंपनीकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे ट्रान्सजेंडरविरोधी मतामुळे त्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत. अनेकांनी त्यांना ‘ट्रोल’ केले आहे. ‘रोलिंग यांनी ‘हॅरी पॉटर’च्या काल्पनिक विश्वातून जरा बाहेर डोकावून पाहिले तर त्यांना आधुनिक जगाच्या वास्तवाची जाणीव होईल,’ अशी टीका होत आहे. रोलिंगबाई आपल्या ट्रान्सजेंडरविरोधी मतांसाठी यापूर्वीही टीकेच्या लक्ष्य ठरल्या आहेत. नव्या वादाला ठिणगी पडली ती एका वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या ‘कोविड-१९ नंतर अशा जगाची निर्मिती होईल की, ज्यात मासिक पाळी येणाऱ्या लोकांना समानता मिळेल’ अशा शीर्षकाच्या एका लेखामुळे! या लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रोलिंगबार्इंनी ‘ज्यांना मासिक पाळी येते, त्यांना स्त्री म्हणतात, लोक नव्हे!’ अशी काहीशी व्यंगात्मक टिप्पणी केली आणि वादाला तोंड फुटले.


रोलिंग यांच्यासाठी काम करणाºया प्रकाशन संस्थेने ट्रान्सजेंडरच्या हक्कांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, असा आग्रह फिशर, डेव्हिस, आदी चार लेखकांनी धरला होता. परंतु ‘एखाद्या लेखकाच्या विचारस्वातंत्र्याशी आणि त्याने बाळगलेल्या श्रद्धेशी तडजोड करता येणार नाही,’ असे कारण देत प्रकाशकांनी निवेदन प्रसिद्धीस नकार दिला. प्रकाशन संस्थेच्या या प्रतिसादानंतर फिशर, आदींनी लाखो पौंडच्या कमाईवर पाणी सोडत तडकाफडकी राजीनामाच देऊन टाकला! आपण राजीनामा देण्याच्या निर्णयाप्रत का आलो, याची कारणमीमांसा करताना ते म्हणतात, ‘जी संस्था मानवी मूल्यांचे रक्षण करण्याची हमी देत नाही, अशा संस्थेसाठी काम करत राहणे ही वैचारिक प्रतारणा ठरेल. ट्रान्सजेंडरसारख्या अल्पसंख्याक समूहांचे हक्क, समानता आणि समान संधीच्या मार्गातील अडथळे जोवर दूर करता येत नाहीत, तोवर स्वत:ला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणवून घेण्यात काही अर्थ नसतो.’ या लेखक चौकडीच्या भूमिकेला समाजमाध्यमातून मोठे समर्थन मिळताना दिसते. या विषयावरून ब्रिटनमध्ये सनातनी विरुद्ध पुरोगामी असे द्वंद्वही रंगले आहे.

‘एलजीबीटी’ समूहाबद्दल विरोधी मत व्यक्त करणाºया अथवा त्यांच्या लैंगिकतेबद्दल प्रश्न उपस्थित करणाºया रोलिंगबाई एकमेव नव्हेत. मानवी पातळीवरील लैंगिक संबंध ही वैयक्तिक आणि तितकीच खासगी बाब असताना ते ‘खासगीपण’ जपण्याच्या अधिकारावरच गदा आणू पाहणारे आणि जन्मत: लाभलेले पुरुष/स्त्री लिंग बदलण्याचा अधिकार कोणालाच नसून, जे कोणी तसा प्रयत्न करतात, ते निसर्ग आणि सृष्टीच्या विधात्याविरोधात आहेत, अशी अंधश्रद्धा बाळगणारे जगाच्या पाठीवर अनेक आहेत. अशांचे प्रबोधन करण्याच्या भानगडीत न पडता त्यांच्याविषयी कृतिशील प्रतिक्रिया नोंदवून फिशर, डेव्हिस, आदी लेखकांनी प्रकाशन संस्था सोडली असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. इतरांचे हक्क आणि अधिकारांबाबत असे कृतिशील पाऊल उचलण्यासाठी मुळात सामाजिक जाणीव आणि सहवेदना असावी लागते. ब्रिटनमधल्या चार लेखकांनी ती दाखवून दिली आहे. आपल्याकडचे लेखक असे कधी जागे होणार?
(कार्यकारी संपादक, लोकमत)

Web Title: The caste of 'Ya' writers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.