ब्रिटिश महिला डॉक्टर म्हणतात, आता बास! तेथील महिलांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 06:42 AM2021-09-06T06:42:37+5:302021-09-06T06:43:33+5:30

डॉ. चेली डेविट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात एकूण जवळपास अडीच हजार डॉक्टरांची पाहणी करण्यात आली. त्यात ८४ टक्के महिला डॉक्टर होत्या, तर १६ टक्के पुरुष डॉक्टर.

British female doctor says, now bass! | ब्रिटिश महिला डॉक्टर म्हणतात, आता बास! तेथील महिलांची व्यथा

ब्रिटिश महिला डॉक्टर म्हणतात, आता बास! तेथील महिलांची व्यथा

Next
ठळक मुद्देनॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॅनी मॉटिर्मर म्हणतात, ही आकडेवारी बघून आम्हालाही धक्का बसला आहे.

प्रगत, विकसित राष्ट्रांत तरी महिलांवर कमी अत्याचार होत असतील, असं आपल्याला वाटतं, पण तो समजही अलीकडच्या काळांतील अनेक घटनांनी आणि अभ्यासांनी खोटा ठरविला आहे. महिलांवर अत्याचार होतच आहेत आणि त्यातून अगदी सुशिक्षित, डॉक्टर महिलाही सुटलेल्या नाहीत.
अलीकडेच ब्रिटिश मेडिकल असोसिएशनने ब्रिटनमध्ये महिला डॉक्टरांवर एक मोठं सर्वेक्षण केलं. ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’खाली केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात मोठे धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. या अभ्यासानुसार ब्रिटनमधल्या दहापैकी तब्बल नऊ महिला डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं. सहेतुक नकोशा स्पर्शांनी तर या महिला डॉक्टर अतिशय हैराण झाल्या आहेत आणि त्याबाबत त्यांना कोणाकडे तक्रारही करता येत नाही, अशी स्थिती आहे. पुरुषांच्या तुलनेत पगार कमी मिळणं, त्यांची संधी हिरावून घेतली जाणं, एवढंच काय मीटिंग्जमध्ये पुरुष सहकाऱ्यांचा मसाज करून द्याव्या लागण्याच्या अत्यंत मानहानीजनक प्रसंगांनाही या डॉक्टर महिलांना सामोरं जावं लागलंय. वरिष्ठांकडे तक्रार करूनही यात काहीही बदल झाला नाही, ना त्या पुरुषांवर कारवाई करण्यात आली,  काम करायचं असेल, तर ‘शिस्तीत’ राहा, नाही तर काम सोडा, असा अलिखित आदेशच त्यांना देण्यात आला.

डॉ. चेली डेविट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात एकूण जवळपास अडीच हजार डॉक्टरांची पाहणी करण्यात आली. त्यात ८४ टक्के महिला डॉक्टर होत्या, तर १६ टक्के पुरुष डॉक्टर. यातल्या ९१ टक्के महिला डॉक्टरांनी सांगितलं, कामाच्या ठिकाणी आम्हाला दररोज लैंगिक छळाला किंवा भेदभावाला सामोरं जावं लागतं. महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील भाषा आमच्या बाबतीत वापरली जाते, कुठल्या ना कुठल्या कारणानं आम्हाला धमकावलं जातं, आमच्या डॉक्टरी कौशल्यावरही शंका घेताना त्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. ‘डॉक्टर झालात, पण तुम्हाला तर काहीच येत नाही’ असं मुद्दाम घालूनपाडून बोललं जातं, खरं तर अनेक महिला डॉक्टरांचं काम अतिशय चोख आणि पुरुष सहकाऱ्यांपेक्षा ज्ञानही अधिक चांगलं आहे, पण या भेदभावाला आम्हाला कायम सामोरं जावं लागतं..

या अभ्यासात केवळ चार टक्के पुरुष डॉक्टरांनी सांगितलं की, आम्ही ‘पुरुष’ असल्यामुळे आमच्या क्षमतेवर शंका घेतली जाते आणि आमच्या कामाचं अवमूल्यन केलं जातं, पण सत्तर टक्क्यांपेक्षाही अधिक महिला डॉक्टरांचं म्हणणं होतं, केवळ ‘स्त्री’ असल्यामुळेच आम्हाला लैंगिक आणि आर्थिक भेदभावाला कायम सामोरं जावं लागतं. ब्रिटनमधल्या अनेक महिला डॉक्टरांनी भेदभावाचे विदारक अनुभव घेतले. ३१ टक्के महिला म्हणतात, कामाच्या ठिकाणी सहेतुक पुरुषी स्पर्शांचा तर आम्ही नेहमीच अनुभव घेतो. त्याबाबत आम्ही काहीच करू शकत नाही. ५६ टक्के महिलांचं म्हणणं होतं,  लैंगिक शेरेबाजी, अश्लील बोलणं या गोष्टींचा तर कामाच्या ठिकाणी इतका अतिरेक होतो की आम्ही आता त्याकडे दुर्लक्षच करतो. ऐकून न ऐकल्यासारखं करतो, रोज त्यासाठी झगडण्याइतकी शक्ती आणि वेळ आमच्याकडे नाही.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॅनी मॉटिर्मर म्हणतात, ही आकडेवारी बघून आम्हालाही धक्का बसला आहे. महिला डॉक्टरांवरील सर्व प्रकारचे भेदभाव कमी करण्यासाठी किंबहुना पुरुष आणि महिला डॉक्टरांमध्ये समानता आणण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करू!’
नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच अमांडा प्रिचर्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचंही म्हणणं आहे, आम्हाला खूप काम करावं लागणार आहे. आमच्यापुढचं आव्हान सोपं नाही. या अहवालानं आमचे डोळे खरोखर उघडले आहेत. महिला डॉक्टरांवर इतका अन्याय होत असेल आणि त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असेल, याची आम्हाला कल्पना नव्हती. एकूणच प्रगत राष्ट्रांतही महिलांवर किती अन्याय होतो, हे यातून स्ष्पष्ट झालं आहे. डॉक्टरी पेशातल्या इतक्या सुशिक्षित आणि कायद्याचं ज्ञान असणाऱ्या महिलांना इतक्या भेदभावाला सामोरं जावं लागत असेल, तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल, याचा विचार करा, असंही या महिला डॉक्टरांनी आपली आपबिती सांगताना खेदानं नमूद केलं आहे.

Web Title: British female doctor says, now bass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.