संतोष देसाई

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने जो विजय मिळाला त्यामुळे राष्ट्रीय प्रश्न कोणते आणि स्थानिक गरजा काय, याचे मतदारांनी योग्य विश्लेषण केल्याचे दिसून आले. एका वर्षापूर्वी भाजपचा ज्या हिंदी भाषक राज्यात दारुण पराभव झाला, त्याच राज्यात त्या पक्षाने लोकसभेच्या सर्व जागा जिंकाव्यात याचा अर्थ तोच होतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत टीआरएसने जेथे नेत्रदीपक विजय मिळवला होता, तेथे त्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. फक्त नवीन पटनायक यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला काही जागा दिल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत आपली पकड कायम ठेवली.

राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींचे नेतृत्व सर्वांनी मान्य केल्याचे दिसून आले, असा युक्तिवाद मी गेल्या आठवड्यात माझ्या स्तंभातून केला होता. निवडणुकीच्या गणितावर आधारित काही स्थानिक आघाड्या झाल्या; पण त्या चूक ठरल्या. राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याचा काळ आता संपला आहे, असे दिसते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतरच्या काळात जातींचा आणि आणि प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढला होता व राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू लागले होते.
तसे पाहता ‘एक राष्ट्र’ ही कल्पना सर्वव्यापी आहे; पण ती प्रत्यक्षात अव्यवहार्य आहे. समाजातील काही घटक राष्ट्राचे भले करण्याची जबाबदारी स्वत:वर असल्याचा उद्धटपणा दाखवत असले तरी सर्वांना ती संधी मिळत नाही. राष्ट्राची संकल्पना समाजापासून दूर गेलेली असल्यानेच जात आणि प्रादेशिकता यांचा प्रभाव भारताच्या निवडणुकीत वाढला आहे. एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय नेता ठरविण्यासाठी राष्ट्राच्या संकल्पनेला अधिक अर्थपूर्ण बनवावे लागेल.

राष्ट्र या संकल्पनेला भक्कम स्वरूप देण्याची गरज मोदी आणि भाजप यांना वाटण्यामागे जी चलाखी आहे ती अन्य पक्षांजवळ नाही. राष्ट्रीयतेचा लोकांनी स्वीकार करावा यासाठी राष्ट्रीय चिन्हांचा वापर प्रामुख्याने करण्यात आला. त्यासाठी राष्ट्राची संकल्पना त्यांनी तयार केली आणि राष्ट्रीय ठरविण्याचे मानदंडदेखील त्यांनीच घालून दिले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचं गायन आणि भारतमाता की जयचा जयघोष या गोष्टी आक्रमकपणे पुरस्कृत केल्या. हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीयतेचा पुरस्कार करणे सुरू केले. राष्ट्राची ओळख निर्माण करून त्याद्वारे समाजात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्राची संकल्पना ही राष्ट्राच्या सीमा गृहित धरून लवकर समजून घेता येते, देशाचा नकाशा त्यासाठी उपयुक्त ठरतो. ‘राष्ट्रपुरुषाचा देह’ या स्वरूपात त्या नकाशाची कल्पना करण्यात येते. त्यामुळे सीमेवर होणारे हल्ले हे त्या देहाचे लचके तोडण्यासाठी करण्यात येत आहेत, असे भासवून लोकांच्या भावना उद्दिपित करण्यात येतात. त्यातून या देशावर कुणाचा अधिकार आहे आणि देशात राहण्याचा कुणाला हक्क आहे या भावना जागृत करण्यात येतात. त्यातून देशाचे शत्रू कोण, मित्र कोण, येथील रहिवासी कोण, बाहेरचे कोण हे भेद निर्माण केले जातात. राष्ट्रीयत्वाची भावना जागृत केल्याचे अनेक फायदे असतात. त्यातील मोठा फायदा हा की, राष्ट्र ही संकल्पना मजबूत होण्यास मदत होते. या राष्ट्राला सुरक्षित ठेवू शकेल असा नेता निवडून त्याला मतदान करण्यासाठी खेड्यापाड्यांतील लोकांना प्रेरित करता येते. त्यामुळे स्वत:पुढील संकटांना दूर सारून राष्ट्रासाठी मतदान करण्यासाठीसुद्धा लोकांना प्रेरित करणे शक्य झाले.

यात मीडियानेसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली; पण ती वॉचडॉगची नव्हती तर चिअर लीडरची होती. मीडियाने तथ्यांची चौकशी न करता ती तथ्ये राष्ट्रभक्ती जोपासणारी आहेत, या विचारांनी त्या तथ्यांना विस्तृत प्रमाणात लोकांसमोर सादर केले. एकेकाळी मीडियाकडून गैरसोयीचे वाटणारे प्रश्न विचारले जात होते; पण ती भूमिका सोडून देत लोकांनी गैरसोयीचे प्रश्न विचारू नये, या गोष्टीचा मीडियाने पुरस्कार केला. त्यात भर पडली ती देशभक्तीपर चित्रपटांची. ‘जोश’ महत्त्वाचा ठरला. देशभक्तीच्या भावनेने टॉनिकचे काम केले आणि लोकांना स्वत:विषयी विश्वास वाटू लागला. भाजपच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेने धर्म आणि राष्ट्र यातील सीमारेषा पुसून टाकण्याचे काम केले. तसेही पाहता हिंदुत्व ही जगण्याची शैली आहे. तिचे देशातील प्रभुत्व लक्षात घेऊन देशभक्तीची भावना हिंदुत्वाद्वारेच व्यक्त होऊ लागली. त्यामुळे वंदेमातरम्चा उच्चार करणे हे देशभक्तीचे द्योतक ठरले आणि भारतातील मुस्लीम समाज हा पाकिस्तानसोबत जुळवला गेला. या दोन्ही गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या होत्या.

काँग्रेस पक्ष हा अनेक वर्षे सत्तेत असल्याने चुकून राष्ट्रीय पक्ष समजला गेला. त्या पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वाला या पद्धतीने राष्ट्राची उभारणी करण्याचे महत्त्वच समजले नाही. ही राष्ट्रीयत्वाची भावना विखरून टाकणे आणि राष्ट्रीय निवडणुकांना स्थानिक निवडणुकीचे स्वरूप देणे ही विरोधकांसाठी मोठी संधी होती; पण ती संधी भाजपच्या अनेक वर्षांच्या कामामुळे साधता आली नाही. उलट भाजपने लोकांच्या भावना देशभक्तीशी जोडल्या. त्यामुळे राष्ट्रीय नेता म्हणून नरेंद्र मोदी समोर येऊ शकले. तसेच राष्ट्र म्हणजे काय, ही कल्पना ते लोकांच्या मनात रुजवू शकले!


( लेखक राजकीय विश्लेषक आहेत )


Web Title: BJP's success is the feeling of patriotism
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.