Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये भाजपची धडधड वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 03:59 AM2020-10-29T03:59:25+5:302020-10-29T03:59:59+5:30

Bihar Assembly Election 2020 News : आधीच नितीश यांच्या संगतीच्या परिणामाची धास्ती; त्यात बडे नेते कोरोनाग्रस्त

Bihar Assembly Election 2020: BJP thrives in Bihar! | Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये भाजपची धडधड वाढली!

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये भाजपची धडधड वाढली!

Next

-  हरीश गुप्ता
(नॅशनल एडिटर लोकमत, नवी दिल्ली)
मोदींचे महिमामंडीत व्यक्तिमत्त्व, त्यांची जबरदस्त लोकप्रियता याला   जराही धक्का लागलेला नसताना भारतीय जनता पक्षासाठी मात्र बिहारमध्ये अत्यंत चिंतेची स्थिती आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीची कडवी, ध्रुवीकरण झालेली झुंज दुसऱ्या चरणात प्रवेश करत आहे.  महत्त्वाचा भागीदार असलेल्या नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरणीला लागल्याने भाजपचे धुरीण गडबडून गेलेले आहेत. कोरोनाच्या महामारीचा संसर्ग आणि त्यापायी निर्माण झालेला राज्यात परतलेल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश नितीश यांना महागात पडेल असे दिसते आहे. 

बिहारमध्ये एनडीएला हार पत्करावी लागली तर  आगामी काळात भाजपसाठी तो मोठा धक्का असेल.  नितीश यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरतो आहे, हे भाजपला माहिती नव्हते, असे नव्हे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुरेशी स्पष्ट झालीच होती. मोदी  लाटेवर स्वार होऊन विजयाची शक्यता दिसताच  भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली होती. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष नड्डा  आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात जून-जुलैत खलबतांच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. नितीश यांना बाजूला करून निवडणुकीत उतरणे हानिकारक ठरेल, तसे झाल्यास नितीश कुमार राजद, कॉंग्रेसबरोबर जातील हे ओळखून अखेरीस संयुक्त जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश याना  ‘अ‍ँटी इनकम्बन्सी’ त्रासाची होईल हे ओळखून लोजपाच्या  चिराग पासवान यांचा बफर झोन तयार करण्यात आला. जी एरवी कॉंग्रेस-डाव्या आघाडीला गेली असती अशी  नितीशविरोधी मते लोजपा खाईल  असा हिशेब त्यामागे होता. पण प्रचारात रंग भरू लागल्यावर जदयु मागे पडते आहे हे प्रकर्षाने लक्षात आले.

दुसरे म्हणजे कोरोनाने भाजपच्या बड्या नेत्यांना नामोहरम केले आहे. देवेंद्र फडणवीस, सुशील मोदी, मंगल पांडे, राजीव प्रताप रुडी,  शहानवाझ हुसेन इतक्या आघाडीच्या नेत्यांना ऐन कसोटीच्या काळात कोरोनाने गाठले. अमित शहाही  सध्या पडद्याआडच आहेत. 

भाजपाची अडचण
मे २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्याने भाजपला स्वर्ग ठेंगणा झाला होता. पण एकामागून एक राज्यांमध्ये दणका मिळाल्यावर मात्र पक्षाचे ग्रह फिरत गेले. महाराष्ट्रात पक्षाने सरकार गमावले, हरियाणात दुष्यंत चौताला यांची मदत घ्यावी लागली. झारखंड आणि दिल्लीत मार खावा लागला. त्यामुळे आता काहीही करून बिहार जिंकणे पक्षासाठी मोलाचे आहे. बिहारमध्ये हरल्यास त्याचा थेट परिणाम पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि आसामात होईल. बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलो तरी पुष्कळ होईल असे अनेकांना वाटते. म्हणून भाजपने मध्येच पवित्रा बदलला. भाजप उमेदवार लढतीत असलेल्या मतदारसंघात नितीशकुमार यांना बरोबर न घेता मोदींच्या सभा घेण्याचे ठरले. 
नितीश यांना वगळून काही पोस्टर्सही झळकली आहेत. येत्या काही दिवसात मोदी आपल्या भाषणात अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

प्रियांका ल्युटन्स दिल्लीत परत
हरियाणातील गुरगावमध्ये काही दिवस राहून प्रियांका गांधी ल्युटन्स दिल्लीत परतल्या आहेत. मोदी सरकारातल्या बाबूंनी त्यांना काही महिन्यांपूर्वी सरकारी बंगला खाली करायला सांगितले होते. थोड्या दिवसांसाठी त्या गुरगावमध्ये गेल्या आणि आता खान मार्केटजवळ सुजनसिंग पार्कमध्ये वास्तव्यास आल्या. जागा कमी असल्याने त्या घरी कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांचे हे घर खूपच लहान असल्याने सुरक्षा रक्षकांची मात्र पंचाईत होते आहे. 

राम माधव यांचे काय होणार?
भाजपातले उगवते तारे राम माधव यांचे ग्रह फिरलेले दिसतात. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारताचा कारभार त्यांच्याकडे होता. काश्मीरमधले भाजपचे धोरण तयार करण्यात आणि ईशान्येकडील काही राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीपासून अमेरिका आणि इतर देशात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या इंडिया फाउण्डेशनचे काम राम माधव करतात. त्यांना सरचिटणीस पदावरून दूर केले गेले तेव्हा असे वाटत होते की, राज्यसभेवर घेऊन मंत्रिमंडळ खान्देपालटात त्यांना मंत्रिपद दिले जाईल.  उत्तर प्रदेशात भाजप राज्यसभेच्या १० पैकी ८ जागा जिंकेल तेथून त्यांना राज्यसभेवर घेतले जाईल असा होरा होता. पण यादीत त्यांचे नावच आले नाही. सरचिटणीस म्हणून मिळालेली साउथ  अव्हेन्यूमधली सरकारी सदनिका ते खाली करत आहेत असे आता कानावर आले आहे. त्यांचे काय होणार हे अजून गुलदस्त्यात आहे. सध्या मात्र ते पूर्ण वेळ संघ प्रचारक असल्याने ते संघात परत जातील, असेही बोलले जात आहे.

Web Title: Bihar Assembly Election 2020: BJP thrives in Bihar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.