जगातलं सर्वोत्तम हॉटेल बनलं शाकाहारी! २५ हजार रुपयांची ‘स्वस्त’ थाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:11:44+5:30

जगभरात अनेक नामांकित हॉटेल्सच्या साखळ्या खूपच प्रसिद्ध आहेत. देशोदेशी त्यांच्या शाखा आहेत आणि जगभरातले खाद्यप्रेमी आपल्या जिभेची आस पुरविण्यासाठी तितक्याच उत्सुकतेने तिथे गर्दी करीत असतात. त्यातलंच एक नाव आहे, ‘इलेवन मेडिसन पार्क रेस्टॉरण्ट’!

the best hotel in the world became Vegetarian plate of Rs 25,000 | जगातलं सर्वोत्तम हॉटेल बनलं शाकाहारी! २५ हजार रुपयांची ‘स्वस्त’ थाळी!

जगातलं सर्वोत्तम हॉटेल बनलं शाकाहारी! २५ हजार रुपयांची ‘स्वस्त’ थाळी!

Next

शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ, यावरून जगभरात वाद होत असतात, दोन्ही बाजूंनी परस्परविरुद्ध दावे केले जातात, पण मांसाहारापेक्षा शाकाहार केव्हाही श्रेष्ठ हे आजपर्यंत झालेल्या अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. केवळ शाकाहारच करणाऱ्यांना प्रथिनं, शक्ती कमी पडते, खेळाडूंसाठी तर केवळ शाकाहार पुरेसा नाही, असा दावा नेहमीच केला जातो, पण त्यातही काही तथ्य नाही. आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक शाकाहारातून मिळू शकतात. किंबहुना, शाकाहार करणाऱ्यांची प्रकृती मांसाहार करणाऱ्यांपेक्षा अधिक उत्तम असते, असंही संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. कारण मुळात मांस  पचविण्यासाठी खूप मोठी ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे माणसाच्या पचनशक्तीवर प्रचंड ताण येतो. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका संशोधनानं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, परंतु खाद्यरसिकांसाठी त्याहीपेक्षा एक मोठी घटना अमेरिकेत घडली आहे. त्यामुळे शाकाहार की मांसाहार, या चर्चेला जगभरात पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. काेरोनाच्या काळानंतर जगभरात अनेक बदल झाले, त्याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. अनेक उद्योगधंदे बुडाले, तर अनेकांना नवे पर्याय शोधावे लागले.

जगभरात अनेक नामांकित हॉटेल्सच्या साखळ्या खूपच प्रसिद्ध आहेत. देशोदेशी त्यांच्या शाखा आहेत आणि जगभरातले खाद्यप्रेमी आपल्या जिभेची आस पुरविण्यासाठी तितक्याच उत्सुकतेने तिथे गर्दी करीत असतात. त्यातलंच एक नाव आहे, ‘इलेवन मेडिसन पार्क रेस्टॉरण्ट’! मॅनहॅटन (न्यू यॉर्क) येथे या हॉटेल्सच्या साखळीचं मुख्यालय आहे आणि जगभरात अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत. मुख्यत: मांसाहारासाठी हे रेस्टॉरण्ट जगात प्रसिद्ध आहे. मांसाहारींच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नवनवीन पदार्थ तिथे सातत्यानं तयार केले जातात, पण या हॉटेलचे मुख्य शेफ आणि मालक डॅनियल हॅम यांनी सगळ्यांना बुचकळ्यात पाडणारी एक घोषणा नुकतीच केली आहे. डॅनियल हॅम म्हणतात, काेरोनानं जगभरातील लोकांना ग्रासलं, त्याला आता दीड वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. नागरिक अजूनही त्यातून सावरलेले नाहीत. कोरोनाचं एक अदृष्य भूत अजूनही प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेलं आहे. या काळात आपण सर्वांनीच खूप काही पाहिलं, ऐकलं आणि जाणून घेतलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळानंतर जगभरातील ठिकठिकाणची आमची हॉटेल्स जेव्हा सुरू होतील, तेव्हा तिथे आता कोणताही मांसाहार किंवा सी फूड दिलं जाणार नाही! 
‘काेविडसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, जागतिक अन्न प्रणालीतील कमकुवतपणाकडे आणि विशेषत: मांसाहारी खाद्यपदार्थांच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करणे’, असं जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी म्हटलं आहे. मांस आणि सी-फूड याबद्दलही शास्त्रज्ञांनी वेळोवेळी सूचित केलं आहे, पण खाद्यप्रेमींनी बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्षच केलं आहे. कोरोनासारखी महामारी वाढण्याचं एक कारण मांसाहार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ‘इलेवन मेडिसन पार्क रेस्टॉरण्ट’नं आपल्या सगळ्या शाखांतील मांसाहार बंद केला आहे, पण दूध, अंडी आणि मध असलेला चहा मात्र पूर्वीप्रमाणेच तिथे मिळेल.
खाद्य क्षेत्रातील एखाद्या आंतरराष्ट्रीय हॉटेल्सच्या साखळीनं घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे.  मांसाहाराकडून शाकाहाराकडे जाण्याचा त्यांचा निर्णय ‘गेम चेंजर’ आणि लोकांची मानसिकता बदलविण्यात महत्त्वाची भूमिका वठवेल, असं अनेक जणांना वाटत आहे.
डॅनियल हॅम म्हणतात, आता आमच्या हॉटेलच्या मेन्यूकार्डवरून सर्व मांसाहारी पदार्थ गायब होतील. आमचा फोकस आता हिरव्या भाज्या आणि नैसर्गिक, प्राकृतिक उत्पादनांवरच अधिक असेल. ही काळाची गरज आहे आणि आमच्या या बदलाला ग्राहकही पसंतीची दाद देतील..  डॅनियल यांच्या घोषणेचा परिणाम लगेचच दिसू लागला आहे. इतर मोठी रेस्टॉरण्टस आणि ‘फूड स्टेशन’च्या मालकांनाही ही आयडिया पसंत पडली आहे. न्यू यॉर्क सिटीमधील शाकाहारी रेस्टॉरण्ट ‘डर्टी कॅण्डी’च्या मालक अमांडा काेहेन म्हणतात, डॅनियल हॅम यांनी उचललेलं हे पाऊल खाद्यक्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी उपयोगी ठरेल.

२५ हजार रुपयांची ‘स्वस्त’ थाळी!
‘इलेवन मेडिसन पार्क रेस्टॉरण्ट’ हे जगातल्या सर्वोत्तम ५० हाॅटेल्सपैकी एक मानलं जातं. त्याच्या मल्टिकोर्स मेन्यूची सुरुवातच २५ हजार रुपयांपासून होते. उत्कृष्ट चवीच्या खाद्यपदार्थांबरोबरच तिथली स्वच्छता, वातावरण आणि प्रत्येक ग्राहकाकडे दिलेलं वैयक्तिक लक्ष यामुळे हे हॉटेल जगप्रसिद्ध आहे. अमेरिका आणि इतर देशांत त्यांची ४० पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. १० जूनपासून ही हॉटेल्स पुन्हा उघडण्याचे नियोजन आहे. ‘इलेवन मेडिसन’नं आपल्या मेन्यूकार्डवरील मांसाहारी पदार्थ बंद केल्यानंतर, तसाच निर्णय ‘ब्रेड‌्स ऑन ओक’, ‘सिक्रेट क्रिक कॅफे ॲण्ड रेस्टॉरण्ट‌्स’ आणि ‘बार व्हेलो’ यासारख्या जगप्रसिद्ध हॉटेल्सनीही घेतला आहे.
 

Web Title: the best hotel in the world became Vegetarian plate of Rs 25,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.