बाळासाहेब तिरपुडे वादळी व्यक्तिमत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 08:34 PM2020-01-15T20:34:52+5:302020-01-15T20:40:53+5:30

पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत

Balasaheb Tirpude stormy personality | बाळासाहेब तिरपुडे वादळी व्यक्तिमत्व

बाळासाहेब तिरपुडे वादळी व्यक्तिमत्व

Next
ठळक मुद्देनाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी वर्षनिमित्त

अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. आयुष्यभर अनेक कष्ट सहन केले. पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही अतिशयोक्ती नव्हे तर वस्तुस्थिती आहे.
राजकीय जीवनात प्रामाणिक, स्पष्ट व निर्भिडपणे बोलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची आजच्या तथाकथित पुढाऱ्यांना जरी गरज वाटत नसली तरी त्या तथाकथित विचारांचा बुरुज चांगलाच ढासळून उकीरडा होण्यास सुरुवात झालेली आहे. पुढाऱ्यांनी परिधान केलेल्या ढोंगी विचाराचे बुरखे जनतेस कळून चुकले आहेत. म्हणूनच सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पुढाऱ्यास कार्यकर्त्यांची गरज असते हे जरी सत्य असले तरी आजच्या घटकेला कार्यकर्त्यांस खऱ्या नेतृत्वाची गरज निर्माण झालेली आहे. राजकीय परिस्थितीने जबरदस्त कलाटणी घेतल्याने निर्भिड व स्पष्ट व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वाच्या शोधात सामान्य कार्यकर्ते आहेत आणि आज ती वेळ येवून ठेपलेली असून बरबटलेल्या राजकीय जीवनातून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता बाळासाहेब तिरपुडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण भासत आहे.
पक्ष संघटना बांधण्यासाठी सामान्य कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असल्याने कधीही सामान्य कार्यकर्त्यास बाजूला सारण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केलेला नाही. आजचे पुढारी स्वत:साठी स्वत:चे अपत्य व नातेवाईकांना पक्षाची तिकिटे मिळवून देण्यासाठी मश्गुल आहेत. ज्याला त्याला स्वत:च्या स्वार्थाचे वेध लागलेले आहे. ज्यांची मानसिकताच संपली आहे, त्यांच्याकडून जनकल्याणाच्या बाबींची अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल. अशा नेत्यांकडून शिक्षणातील अधोगती, विकास, अन्याय, अत्याचार रोखणे यासंदर्भात अपेक्षा न केलेलीच बरी. या उलट बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा डोंगर अफाट पसरलेला असताना कोणत्याही जातीधर्माचा विचार न करता सामान्यजनांसाठी आवश्यक ते प्रयत्न करणारे व सामान्य कार्यकर्त्यास सत्तेत बसवून त्याचा योग्य सन्मान केल्याचे बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच राजकारणातील अहितकाऱ्यांनी महाराष्ट्रातील अनेक धुरंधर नेत्याचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु बाळासाहेबांचे विचार मात्र ते संपवू शकले नाहीत. हेच बाळसाहेबांचे खरे पाठबळ व भांडवल आहे.
भावी पिढीच्या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेस नावाची संघटना निर्माण करून विद्यार्थी नेतृत्वाची संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त फळी उभारण्याचे कार्य केले हे निर्विकार सत्य कोणीही टाळू शकत नाही.
बाळासाहेबांच्या सम्यक मार्गदर्शनाने अनेक युवक तयार झालेले असून निरनिराळ्या संघटनांद्वारे विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या चळवळीसाठी अनेक राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्ते बाळासाहबांच्या कुशल नेतृत्वाताखाली एकत्र झाले होते. आजही विदर्भ राज्य निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत.
महराष्ट्र शासनात बाळासाहेब तिरपुडे असतांना जनहिताच्या दृष्टीने गैर मागासवर्गीयांसाठी दूरदृष्टी ठेवून अनेक जनहिताच्या योजना राबविल्या असून सर्वधर्म समभाव साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शासकीय योजनांमध्ये जनहित साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला असून तळमळ, चिकाटी, व विद्वत्तेच्या आधारावर प्रशासकीय यंत्रणेत बाळासाहेबांना वर्चस्व निर्माण करता आले.

  • भाऊ भालेराव

८६६९३३१२३४

 

Web Title: Balasaheb Tirpude stormy personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर