‘राऊतवाडी’तील ‘संजयबाबां’च्या आश्रमात...

By सचिन जवळकोटे | Published: December 25, 2020 06:01 AM2020-12-25T06:01:51+5:302020-12-25T06:11:09+5:30

Sanjay Raut : हातातली पत्रिका न्याहाळत ‘बाबा’  गंभीरपणे उत्तरले, ‘या कुंडलीत घबाडयोग मोठा; परंतु राजयोग अल्पायुषी दिसतोय.

In the ashram of 'Sanjay Baba' in 'Rautwadi' ... |  ‘राऊतवाडी’तील ‘संजयबाबां’च्या आश्रमात...

 ‘राऊतवाडी’तील ‘संजयबाबां’च्या आश्रमात...

Next

- सचिन जवळकोटे
(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)

‘उद्धो एक दिवस पंतप्रधान होणार’, ही भविष्यवाणी करताच ‘राऊतवाडी’तील ‘संजयबाबां’च्या आश्रमाकडं अनेक नेत्यांची रांग लागली. कुणाच्या हातात कुंडली होती, तर कुणाकडं पत्रिका. याची कुणकुण लागताच नारदमुनीही आश्रमात पोहोचले. आतमध्ये संजयबाबांसमोर पंकजाताई बसल्या होत्या. शेजारी नाथाभाऊ होतेच. हातातली पत्रिका न्याहाळत ‘बाबा’  गंभीरपणे उत्तरले, ‘या कुंडलीत घबाडयोग मोठा; परंतु राजयोग अल्पायुषी दिसतोय. त्यामुळं लाल दिव्याची गाडी मिळवण्याच्या भानगडीत सध्यातरी पडू नका ताई.’ तेव्हा गोंधळलेल्या ताईंनी शांतपणे बॉम्ब टाकला, ‘तुमच्या हातातली पत्रिका माझी नाही, शेजारच्या नाथाभाऊंची आहे...’ हे ऐकून ‘बाबा’ जेवढे दचकले, त्याहीपेक्षा जास्त नाथाभाऊ गडबडले.

‘छे! छे! मला माझ्या पत्रिकेत इंटरेस्ट नाही. या बघा या दोन नव्या कुंडल्या. मी जर बाहेर काढली सीडी तर पडेल काय या दोघांना बेडी, एवढंच सांगा’- हातातल्या पत्रिका ‘बाबां’ना देत नाथाभाऊ रागारागानं बोलले. तेव्हा या दोन कुंडल्या नक्कीच देवेंद्रपंत अन् गिरीशभाऊ यांच्या असणार, याची नारदमुनींना खात्री पटली.

एवढ्यात एक कोवळा तरुण नेता आतमध्ये आला. ‘सर्वांत तरुण खासदार होण्याचा विक्रम मला मावळमध्ये करता आला नाही. किमान आता आमदारकीचा तरी मान मिळेल की नाही यंदा?’- त्यानं विचारताच बाबा गंभीरपणे त्याचा हात न्याहाळू लागले, तेव्हा नारदमुनी हळूच म्हणाले, ‘बारामतीच्या नीरेचं पाणी शेवटी चंद्रभागेलाच मिळतं, याच्या आमदारकीचा शोध मग चंद्रभागा काठावरच्या पंढरीत घ्यायला काय हरकत आहे. ऐवीतेवी आता पोटनिवडणूक आहेच. ?’ 

‘असं कसं होईल? तासगावचीच परंपरा पंढरपुरात चालविण्याची कल्पना आमच्या थोरल्या काकांच्या मनात आहे ना. भारत नानांच्या सुपुत्रानं कितीही ‘भगीरथ’ प्रयत्न केले तरीही ‘वहिनीं’नाच तिकीट मिळणार, हे निश्चित.’ - मात्र बोलताना ‘बाबा’ ठाम दिसत नव्हते. मग मुनींनी अजून एक टीप दिली, ‘तसं असतं तर सरकोलीच्या जाहीर सभेतच काकांनी उमेदवार जाहीर केला असता की... अन् संधी मिळाली तर पार्थनं पंढरीची वारी करावी, अशी सुप्त इच्छा खुद्द ‘दादां’चीच असेल तर? तिकडं त्यांची टीम चाचपणीच्या कामालाही लागली की जोरात. नाहीतरी सर्वांना मॅनेज करण्यात तसे ते माहिरच.’ 

अजितदादांचं नाव ऐकताच ‘बाबां’च्या उजव्या डोळ्याची भुवई वक्री झाली, तर डाव्या कपाळावर बारीकशा आठ्या रेंगाळल्या, ‘एवढा मोठा निर्णय आम्हाला कसा काय माहीत नाही ? असं शिष्याच्या कानात ते कुजबुजले, तेव्हा नारद खुसखुसले, ‘बारामतीकर समजायला तुम्हाला खासदारकीच्या अजून तीन-चार तरी टर्म घालवाव्या लागतील,

बाबा !  लगेच ‘बाबां’नी विषय बदलला; ‘पण पार्थचा अन् पंढरीचा काय संबंध? उत्तर आलं, ‘बारामतीचे काका माढ्यात खासदार होऊ शकतात, मग धाकटा नातू पंढरपुरात आमदार का होऊ शकत नाही ? ’ लगेच पुढचा प्रश्न. ‘पण त्यानं आमदार झालंच पाहिजे, असा हट्ट का ? वडील आहेतच की ‘आमदार’ ? यालाही मुनींकडं उत्तर होतं, ‘खासदारांची मुलगी खासदार होऊ शकत असेल, तर आमदारांचा मुलगा आमदार का नको ? ’ आता मात्र ‘बाबां’ना ठाम विश्वास वाटू लागला की, मुनींना ‘दादां’कडूनच पढवून पाठवलं गेलंय. ही जुगलबंदी सुरू असताना शेजारचा तरुण मात्र मोठ्या आपुलकीनं नारदांकडं पाहत होता. त्यांच्यात जणू आपली ‘माय माऊली’च त्याला दिसत असावी. ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत तो खुशीत बाहेर पडला.

निघता-निघता नारदांनी शेवटचा प्रश्न विचारला, ‘साऱ्या जगाची भविष्यवाणी जाहीर करताहात, मग तुमच्या नितीनबंधूंना लाल दिवा कधी मिळणार, तेवढं सांगून टाका की.’  आता मात्र ‘बाबां’नी खाडकन्‌ डोळे उघडले. ‘चला मला आर्टिकल लिहायचंय. राजकारणातल्या गप्पांनी पोट भरत नसतं. गड्या आपला जॉब बरा.’ 

जाता-जाता : वरील सर्व प्रसंग-संवाद काल्पिनक असून, भविष्यात सत्य निघाले तर योगायोग समजू नये.

Web Title: In the ashram of 'Sanjay Baba' in 'Rautwadi' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.