...पण, कागदांना मोड आले नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 07:52 AM2021-07-24T07:52:15+5:302021-07-24T07:52:42+5:30

शेतकर्‍याच्या कणगीत उरलं धान्य असेल, तो मोड आणेल, थापेल, वेळ भागवेल ! शहरामध्ये हातावर पोट असणार्‍यांनी काय करावं?

ashok naigaonkar analysis about corona impact on country | ...पण, कागदांना मोड आले नाहीत!

...पण, कागदांना मोड आले नाहीत!

Next

- अशोक नायगावकर

व्यंग आणि उपरोध ही तुमची शस्त्रं. त्यांच्या चष्म्यातून हा अस्वस्थ काळ कसा दिसत राहिला?

२०२० मार्चच्या पहिल्या आठवड्यात चंद्रपूरला मोठं साहित्य संमेलन होतं. पुढे फुटाणेंच्या कवीसंमेलनाला आता दोन दिवसांत निघायचं अशी तयारी झाली असताना ते रद्द झालं. कोविडमुळे रद्द झालेला माझा तो पहिला कार्यक्रम. निर्बंध शिथिल झाले तेव्हा श्रीरामपूरला एक कार्यक्रम झाला तो अपवाद वगळता सध्या घरामध्येच आहे. माझ्यासारखा माणूस...आठवड्यातून तीनदा तरी कार्यक्रमानिमित्त परगावी असणारा, पायाला सतत चक्रं लागलेला; अशा माणसाला घरातच बसून राहावं लागतं तेव्हा विलक्षण मानसिक कोंडी होते. वाचून वाचून वाचणार किती?  हा अभूतपूर्व  काळ अनेक शतकांनी आला आहे. आम्ही नवराबायको पेन्शनर,  औषधपाणी भागवू शकतो, त्यामुळं उगीच तक्रार करण्यात अर्थ नाही, पण जी माणसं रोजंदारीवर आहेत त्यांचं अवघड झालं. विनोद नंतर सुचतो, आपदा भोगून झाल्यावर. एरवी सगळी अस्वस्थता दिसत राहते. मुंबईत रेल्वेचा सेकंड क्लासचा पास काढून धुमश्‍चक्रीत कामावर जाणारी अशी माणसं मला दिसायची जी जेवणाचा डबा कुठं हातातून नेणार, स्वत:ला रेल्वेत कोंबता आलं तरी जिंकलं असं म्हणत खिशात चपात्यांच्या गुंडाळ्या घेऊन कामावर पोहोचायची. तिकडं वडासांबार नि लोणचं घेऊन खायची. रेल्वे बंद झाल्यावर तुटपुंज्या पगारात बस नि टॅक्स्या करून कामावर जाणं त्यांना कसं परवडणार होतं?  किती रोजगार गेले याची गणती कशी करावी... एकटे लोक हॉटेलात खायचे, तीच बंद म्हटल्यावर काहींनी त्यांची डबे देऊन व्यवस्था केली.   उद्याचं काय होईल याचा अंदाज नसल्यानं माणसं अधिक दैववादी होताना मला दिसली.  मग जवळच्यांच्या, परिचितांच्या आकस्मिक निधनाच्या बातम्या येत राहिल्या. माणसं ढासळताना, त्यांचं अस्तित्व असं पुसलं जातानाचा जीवघेणा अनुभव उलथवून टाकणारा होता.  सत्य आणि अफवांचं बेमालूम मिश्रण या संपूर्ण काळात झालं. वाईट जास्त लहान मुलामुलींचं वाटलं. या काळात. बागडणारी, ढोपरंकोपरं फोडून घेणारी सगळी मुलं नि त्यांची उसळणारी ऊर्जा दडपून राहते. त्याचं ‘अंडरस्टँडिंग’ मला येऊ शकत नाही.

स्पर्श नावाची गोष्ट हरवत गेली या काळात... आणि बरंच काही हरवलं...

स्पर्श जाणं मानवी आयुष्यातली केवढी हानी आहे. तो जाण्यानं गुदमरायला होतं. किती सहजगत्या आपण हस्तांदोलन करतो. ते करायचं नाही हे अंगवळणी पडलेलं नव्हतं. प्रत्यक्ष आजार झाला नसला तरी माणूस वाहक असू शकतो, अशी माहिती कळल्यामुळे सॅनिटायझेशनच्या धाकात असायला लागायचं.  लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व अशा सगळ्यांची टेप आपण वाजवतो, गोडवे गातो, पण एका क्षणात सगळं बदलू शकतं मूलभूत गरज भागली नाही तर ! संपूर्ण जगाचं सगळं अर्थचक्र बदललं आहे. अंगावरचा कपडा जुना, फाटका असेल तर चालेल एकवेळ, पण दर आठ तासांनी जागृत होणारा जठराग्नी शांत होण्याची व्यवस्था नसेल तर माणसं हिंसक होतील अशी भीती सतत माझ्या मनात आहे. मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतल्या जोहानसबर्गमधल्या रस्त्यांवर असणार्‍या मॉल्सचे फोटो बघायला मिळाले. हजारो लोक मॉल्स लुटून नेत होते. आपल्या उद्याचं जाऊ दे मात्र ‘आज’बद्दलही असुरक्षितता मनात असणारे बेरोजगार लोक कशाच्या भरवशावर नैतिकता टिकवणार? असे हजारो लोक ज्यांनी आपली भाकरी गमावली,  त्यांनी काय स्वप्न बाळगून धीर टिकवावा? रिकाम्या हातांची तरुण मुलंमुली लुटालूट करायला उद्युक्त होतील तर काय असं भय मला वाटतं. लहानमोठ्या शेतकर्‍याच्या कणगीत काहीतरी धान्य असेल तर तो मोड आणेल, उकळेल, थापेल, वेळ भागवेल. शहरामध्ये हातावर पोट असणार्‍यांनी काय करावं, याची उत्तरं कोण देणार? ‘एकेदिवशी खूप मोठा पाऊस आला, सगळे कागद ओले झाले, पण कागदांना मोड आले नाहीत...’ ही माझी ओळ माझ्याच अंगावर येतेय.

 व्यक्तिगत पातळीवर भीतीची व्यवस्था कशी लावता आली मग?


कोरोनातून बाहेर पडण्याची खात्री वाढतेय, पण अनिश्‍चितता कायम असल्यामुळे तूर्त प्रार्थनेचं बोट धरून टिकून आहे.  एक तर्‍हेचं अनिर्बंध जगणं असायचं. सतत प्रवास, जागरणं, भेटीगाठी, अन्नाची अवेळ ही नियमितता होती. आता मात्र काय करावं नि काय टाळावं याची पथ्यं पाळायची सवय लावून घेतली. अमुक इतका व्यायाम, तमूक प्रकारचा आहार असा जय्यत दिवस बांधला. आपल्या अनिर्बंधतेचा प्रत्येक पावलावर आपल्यालाच त्रास होणार नाही तर आपल्या सभोवती असणार्‍या माणसांना ते पोळणार ही भीती सतत राहायची. त्यावर काळजी घेण्याचा व पथ्यं पाळण्याचा उपाय असणार होता.  मदत म्हणूनही कुणाला दारापाशी ताट सरकवून देण्याचं दडपण घेण्याऐवजी आपण एकमेकांना बरं वाटण्यासाठी मदत करू व घेऊ ही भावना प्रबळ करत नेली.

अशा ताणात विनोदाची परीक्षा आहे एकूण...

विनोद घडतंच राहतात. कोपर्‍यापर्यंत बाहेर पडायचं तरी मास्क लावायचा हा संस्कार मुरला नव्हता तेव्हा घरातून बाहेर पडताना अनेकदा तसाच गेलो, कुणीतरी आठवण केल्यावर जीभ चावून परतलो आहे.  तसा मी संयमी, मी उपरोधात्मक काहीतरी म्हणत असतो तेव्हा हशा पिकण्यातून माझ्या संयमाची परीक्षा झालीच आहे वेळोवेळी. 

पण सभागृहात लोक हसले तरी घरी जाताना गाल हुळहुळतोय याची जाणीव त्यांना झालेली असते असाही अनुभव आहे. कणा मोडलेल्या, निराश झालेल्या माणसांना त्या मनोवृत्तीतून बाहेर यायला विनोदाचाच काठ जवळचा वाटणार आहे. टीव्हीवरच्या कार्यक्रमात हास्याचे कार्यक्रम जास्त लोकप्रियता मिळवून आहेत. विरंगुळ्यासाठी लोकांची पसंती विनोद ही आहे. लोकांच्या जीवनात उजेड निर्माण करण्याची प्रेरणा माणसांमध्ये असते... तिचा प्रयत्न हरतर्‍हेनं होणार, विनोदातून प्रभावी राहाणार!

मुलाखत : सोनाली नवांगूळ
 

Web Title: ashok naigaonkar analysis about corona impact on country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.