या कलावंतांचे ऋणानुबंध अवर्णनीय!

By विजय दर्डा | Published: May 4, 2020 01:18 AM2020-05-04T01:18:32+5:302020-05-04T01:18:57+5:30

जणू कुटुंबातीलच कोणीतरी गमावल्याचा मनाला लागतो चटका

Article on The indebtedness of Imran & Rishi Kapoor artists is indescribable! | या कलावंतांचे ऋणानुबंध अवर्णनीय!

या कलावंतांचे ऋणानुबंध अवर्णनीय!

Next

विजय दर्डा

गेल्या आठवड्यात आपण इरफान खान व ऋषी कपूर या दोन हरहुन्नरी कलाकारांना व मोठ्या मनाच्या माणसांना पारखे झालो. दोघांची अदाकारी भिन्न होती; पण दोघेही निराळे, लोभसवाणे व प्रेक्षकांचे लाडके होते! त्यांच्या जाण्याने जणू आपल्या कुटुंबातीलच कोणीतरी सोडून गेल्याच्या भावनेने प्रत्येकाच्या मनाला चटका लागला. याचे कारण असे की, धावपळीच्या व चिंता आणि काळजीच्या दैनंदिन विवंचनेतून अशा कलावंतांमुळे आपल्याला विरंगुळा मिळतो. जो आपल्या दुखऱ्या मनावर फुंकर घालतो त्याच्याविषयी स्वाभाविकच ममत्व वाटते. त्याच्याशी आपले घट्ट नाते जुळते. म्हणूनच कोणाही कलाकाराच्या जाण्याचे आपल्याला खूप दु:ख होते. केवळ कलावंतच नव्हेत तर राष्ट्रीय नेते किंवा विविध क्षेत्रांतील हिरोंबद्दल आपल्या मनात एक खास जागा निर्माण होते व ते जेव्हा इहलोक सोडून जातात, तेव्हा आपण दु:खात बुडून जातो.

अशीच आपल्याला खूप आवडणारी व्यक्ती लवकर निवर्तली तर अपार दु:ख होते. इरफान खान जेमतेम पन्नाशीतील होते व ऋषी कपूर यांचे वयही फार वृद्ध म्हणावे एवढे नव्हते. दोघांनाही कर्करोगाने आपल्यापासून हिरावून नेले. दोघांच्याही आयुष्याची पार्श्वभूमी व परिस्थिती सारखी नव्हती; पण दोघांनाही मोठेपणा देणारी एकच गोष्ट होती व ती म्हणजे माणुसकी. दोघेही माणूस म्हणून बावनकशी सोने होते. इरफान खान यांना आई-वडिलांची पुण्याई म्हणून काहीही मिळालेले नव्हते. ते दिसायला सुंदर नव्हते किंवा त्यांचे रूप ‘चॉकलेट बॉय’ म्हणावे असेही नव्हते; पण त्यांचा अभिनय अप्रतिम होता. त्यांचे डोळे खूप बोलके होते. पात्र जणू त्यांच्या अंगात भिनायचे व पडद्यावर मूर्तरूपाने साकार व्हायचे. कोणाचाही आधार व ओळख नसताना ते मुंबईत आले होते. त्यांनी आपले यशस्वी करिअर पूर्णपणे स्वबळावर व कष्टाने उभे केले होते. त्यांचे खासगी आयुष्य अगदी साधे-सरळ होते. त्यांचे वडील यासिन अली खान तर म्हणायचे की, इरफान म्हणजे पठाणाच्या घरी जन्मलेला ब्राह्मण आहे!

Irrfan Khan Death: Irrfan's Mother Passed Away Just Four Days Ago ...

त्यांचे वागणे-बोलणे किती सहज होते, याचे उदाहरण देईन. त्यांची व माझी एकदाच प्रत्यक्ष भेट झाली होती. त्या भेटीतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप माझ्यावर पडली. मी मुंबईहून दिल्लीला जात होतो. टर्मिनलपासून विमानापर्यंत जाण्यासाठी ज्या बसमध्ये बसलो त्यात इरफानही होते. विमानाला उशिर झाल्याने ते काहीसे चिंतेत दिसले. विमान चुकणार तर नाही ना, अशी शंका त्यांनी बोलून दाखविली. मी त्यांना म्हटले की, विमानापर्यंत जाण्यासाठी ही बस आहे, तेव्हा आपल्याला घेतल्याशिवाय विमान जाणार नाही! तेव्हा ते सहजतेने म्हणाले, कनेक्टिंग फ्लाईट चुकण्याबद्दल विचारत होतो. तर ते मनाने एवढे साधे-सरळ होते. एकदा राजेंद्र व आशू यांनी त्यांना औरंगाबाद लोकमत परिवारात नेले, तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता ते आले होते. त्यावेळी मस्त मैफिल जमली व त्यांनी मनमुराद हास्यविनोद केले.
ऋषी कपूर यांच्याविषयी सांगायचे तर त्यांना चित्रपट सृष्टीतील मुरब्बी, सुसंस्कृत कुटुंबाचा वारसा लाभला होता; पण आयुष्यात त्यांनाही संघर्ष चुकला नाही. कारण, प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी कलावंताला स्वत:चे कसब दाखवावे लागते. पृथ्वीराज कपूर, त्यांचे चिरंजीव राज कपूर, शम्मी कपूर व शशी कपूर तसेच नंतरच्या पिढीतील करिश्मा, करिना, संजना आणि रणबीर या कपूर कुटुंबीयांना प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळाले ते यापैकी प्रत्येकजण गुणवंत कलाकार होता म्हणूनच. या प्रत्येकाने अभिनयात पारंगत होण्यासाठी खूप कष्ट घेतले म्हणूनच त्यांना यश मिळाले.

Body trailer: Rishi Kapoor returns with a gripping murder mystery

ऋषी कपूर यांच्यात आजोबा व वडील दोघांचेही गुण उतरले होते. त्यांचा अभिनय सहजसुंदर असायचा. त्यांनी रोमान्सला नवी परिभाषा दिली असे म्हटल्यास वावगे होणार नाही. माझी ऋषी कपूर यांच्याशी भेट त्यांचे वडील राज कपूर यांनी करून दिली होती. त्यानंतर आमची ओळख वाढत गेली. ते एक सच्चे दोस्त होते; त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा मला अभिमान वाटायचा. मी बोलवावे व त्यांनी यावे यामुळे मी तर त्यांच्यावर पुरता फिदा झालो. त्यांनी कधी काम बुडेल याचा विचार केला नाही. बोलावले की ते चटकन् निघून यायचे. ‘बॉबी’ चित्रपट हिट झाल्यावर ते यशाच्या शिखरावर होते व त्यांचा प्रत्येक मिनिट मोलाचा होता. तेव्हाही माझ्या आग्रहाखातर ते यवतमाळला आले. विनम्रता व सहजता हे त्यांचे संस्कार होते. त्यांचे आजोबा पृथ्वीराज कपूरही माझ्या बाबूजींच्या निमंत्रणावरून दोन वेळा यवतमाळला आले होते. एकदा ते आपली नाटकमंडळी सोबत घेऊन आले होते, तर दुसºया वेळी बाबूजींनी त्यांना ध्वजवंदनासाठी बोलाविले होते. ऋषी कपूर यांची अंतिम इच्छा अपूर्ण राहिली याचेच वाईट वाटते. काही दिवसांपूर्वी फोनवर बोलताना ते म्हणाले होते, रणबीरचे लग्न झाले, सून आली की सर्व इच्छा पूर्ण होतील; पण सूनमुख पाहणे त्यांच्या नशिबात नव्हते. आणखी एक गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते. ऋषी कपूर खूप लिहिणारे-वाचणारे होते. त्यांनी ‘खुल्लमखुल्ला ऋषी कपूर अनसेंसॉर्ड’ हे त्यांचे पुस्तक स्वाक्षरीसह मला पाठविले. माझ्या संसद सदस्याच्या कारकिर्दीवर लिहिलेले माझे ‘पब्लिक इश्यूज बिफोर पार्लियमेंट’ हे पुस्तक त्यांना पाठविले. त्यांनी ते वाचून नंतर त्यावर माझ्याशी चर्चाही केली होती. इरफान, ऋषी कपूर आज आपल्यात नसले तरी कामाच्या रूपाने ते सदैव सोबतच असतील. त्यांचे विस्मरण होणे अशक्य आहे. ऋषी कपूर यांचे जाणे म्हणजे तर जणू खोली बंद व्हावी व चावी हरवून जावी, असेच वाटते आहे.

Veteran Bollywood actor Rishi Kapoor dies at 67 - 92 News HD Plus

(लेखक लोकमत समूह एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आहेत)

Web Title: Article on The indebtedness of Imran & Rishi Kapoor artists is indescribable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.