राजा, राणी आणि भातुकलीच्या गारुडाची पन्नास वर्षं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 03:37 AM2020-11-30T03:37:14+5:302020-11-30T03:37:55+5:30

मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांनी मांडलेला विलक्षण भातुकलीचा खेळ! या गाण्याला आज ५० वर्षे होत आहेत

Article on 50 Years completed for Yashwant Dev, Mangesh Padgoankar & Arun Date Song | राजा, राणी आणि भातुकलीच्या गारुडाची पन्नास वर्षं

राजा, राणी आणि भातुकलीच्या गारुडाची पन्नास वर्षं

googlenewsNext

भारतकुमार राऊत

कोणत्याही समाज व संस्कृतीत त्या त्या दशकाचे एक गाणे असते; एक चित्रपट व एक नाटकही असते. ती गाणी व ते नाटक-सिनेमे पुढे काळाच्या ओघात मागे पडतात, काही अदृश्यही होतात; पण काळाच्या प्रवाहाविरुद्ध पोहत ज्या कलाकृती जिवंत राहतात, त्याच श्रेष्ठ ठरतात. १९६०च्या दशकात कविवर्य ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी शब्दबद्ध व सूरबद्ध केलेली भावगीते मराठी मनात रुजू व ओठांवर घोळू लागली होती, त्याच काळात यशवंत देव, मंगेश पाडगावकर व अरुण दाते या त्रिकुटानेही मराठी भावविश्वात आपले साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केली. या भावमंदिरावर कळस चढवला याच त्रिकुटाने साकारलेल्या ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी..!’ या विराणीने. ही अजरामर कलाकृती निर्माण झाली त्या घटनेला आज तब्बल ५० वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी मनावरचे या ‘भातुकली’चे गारुड काही अद्याप उतरलेले नाही. त्यानंतर या पठडीतील अनेक गीते आली व गेली. दोन पिढ्या मोठ्या झाल्या. हिंदी व आता इंग्रजी गाण्यांचीही गोडी मराठी माणसांना लागली; पण पाडगावकर, देव व दाते यांनी मांडलेला हा विलक्षण भातुकलीचा खेळ मात्र तसाच चालू आहे व आणखी काही दशके तरी ही भातुकली कुणी मोडणार नाही वा सोडणारही नाही. दुर्दैव हेच की ही भातुकली साकारणारे तीनही कलाकार मंगेश पाडगावकर, यशवंत देव व अरुण दाते आज आपल्यात नाहीत. पण कलाकार गेले, तरी ज्या कलाकृती पुढच्या पिढ्या चालवत राहतात, त्याच अस्सल कला. ‘भातुकली’ हे त्याचे उत्तम उदाहरण ! 
मंगेश पाडगावकर यांनी अनेक लयबद्ध कविता लिहिल्या, त्याची सुमधुर गीते झाली. गीतकार व संगीतकार यशवंत देव यांनी तर वेगवेगळ्या धाटणीच्या गीतांना सूरबद्ध करून अजरामर केले. गायक अरुण दातेंच्या गायकीचा वेगळा बाज  तत्कालीन मराठी रसिकांना अपरिचित होता. त्यांनी गझलांच्या बाजाची मराठी गाणी गायला सुरुवात केली व त्यात लोकप्रियताही कमावली. पाडगावकर-यशवंत देव आणि अरुण दाते या तिघांनी एकत्र येऊन केलेली मराठी गीते अजरामर ठरली. ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’, ‘भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची’, ‘धुके दाटले हे उदास उदास’, ‘दिवस तुझे हे फुलायाचे’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, या गीतांनी करोडो मराठी मनावर कधी हलकेच फुंकर घातली.
‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ हे त्यातलेच एक गीत. जणू मराठी संस्कृतीतील एक दंतकथाच ! असे म्हणतात की,  पाडगावकरांनी रेकाॅर्डिंगच्या दोन महिने आधीच हे गीत लिहून संगीतकार देवांकडे पाठवले. नंतर एकदा ते दोघे व दाते भेटले असता देवांनी ते गाणे ऐकवले. ती चाल ना पाडगावकरांना पसंत पडली, ना दातेंना ! त्या दोघांच्याही मते ती विराणी असल्याने तिला  भावगीताची चाल योग्य नव्हती; पण देव त्यांच्या सूररचनेबद्दल कमालीचे आग्रही होते. ते म्हणाले, ही मुळात विराणी नाहीच. ते एक प्रेमभंगाचे दु:खद गीत आहे. त्याचा गायक प्रेमविरहात होरपळलेला प्रेमवीर नसून त्याची कथा तिसऱ्यानेच विशद केलेली आहे. त्यावर तिघांत बराच खल झाला. अखेर देवांच्या मनाप्रमाणेच करायचे ठरले. मग  देवांनी शब्द दिला की पाहा, हे गाणे अजरामर होईल व तसेच झाले.
हे गीत आकाशवाणीवर सादर होताच ते कमालीचे लोकप्रिय झाले. १९७८ मध्ये नानासाहेब गोरे ब्रिटनचे हायकमिशनर झाले, त्यावेळी इंडिया हाउसमध्ये दातेंच्या गाण्याचा कार्यक्रम झाला. स्वत: दाते तीन तास गायले. एक गायक व केवळ दोन वादक इतक्या श्रोत्यांना तीन तास खिळवून  ठेवतात, हे पाहून उपस्थित असलेले ब्रिटिश अधिकारी अवाक‌् झाले.. पुढे दोनच वर्षांनी बीबीसीने ‘भातुकलीच्या खेळामधली’चे रेकॉर्डिंग केले. बीबीसीने मराठी गाण्याचे रेकाॅर्डिंग करण्याची ती पहिलीच वेळ.
इतके मात्र खरे की, भातुकलीच्या खेळातले हे राजा आणि राणी मराठी संस्कृतीच्या वाटचालीचा मैलाचा महत्त्वाचा दगड बनून राहिले आहेत.

(लेखक लोकमतचे माजी संपादक, माजी खासदार आहेत)  

Web Title: Article on 50 Years completed for Yashwant Dev, Mangesh Padgoankar & Arun Date Song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :arun datearun date