दृष्टिकोन: कोसळणारा शेअर बाजार फायदेशीर ठरणारा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:51 AM2019-07-26T02:51:33+5:302019-07-26T10:32:37+5:30

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात.

Approach: Is the falling stock market worthwhile? | दृष्टिकोन: कोसळणारा शेअर बाजार फायदेशीर ठरणारा?

दृष्टिकोन: कोसळणारा शेअर बाजार फायदेशीर ठरणारा?

Next

प्रसाद गो. जोशी

केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर झाल्यापासून देशातील शेअर बाजार हा सातत्याने खाली येत आहे. बाजार खाली येण्याला काही तत्कालिक कारणे आहेत, हे खरे असले तरी परकीय वित्तसंस्थांनी पुकारलेला (अघोषित) असहकार हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावलेली आहे. वस्तूंची मागणी कमी होत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी बाजार कोसळला म्हणजे आपली अर्थव्यवस्था खरोखरच धोक्यात आहे, असे समजण्याचे कारण नाही. कोसळणारा शेअर बाजार ही गुंतवणूकदारांनी एक संधी समजली तर बाजारातील घबराट कमी होऊन या घसरणीला काही प्रमाणामध्ये पायबंद बसू शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे ती गुंतवणूकदारांच्या शिक्षणाची आणि संयम बाळगून व्यवहार करण्याची.

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात. तरीही बाजाराची वाटचाल ही आपण अर्थव्यवस्थेच्या वाढीशी निगडित असल्याचे मानत असतो. जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या जोडीलाच अर्थसंकल्पामध्ये अतिश्रीमंतांवर वाढविण्यात आलेला करांचा बोजा हा परकीय वित्तसंस्था तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्रासदायक ठरणारा आहे. या संस्थांनी यामधून सूट मिळण्याची केलेली मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावल्याने या संस्था चालू महिन्यामध्ये सातत्याने विक्री करीत आहेत. बाजार वर-खाली करण्याचे सामर्थ्य परकीय वित्तसंस्थांच्या हाती असल्याने त्यांच्या विक्रीमुळे बाजार खाली येत आहे.

भारत तसेच दक्षिण आशियाई देशांमधून मिळणारा परतावा जास्त असल्याने परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये आपली गुंतवणूक वाढविली. मात्र अमेरिकेने आपल्या व्याजदरामध्ये वाढ करण्यास सुरुवात करताच या संस्थांनी आशियामधील आपली गुंतवणूक काढण्यास प्रारंभ केला. या तिमाहीमध्ये अमेरिकेतील व्याजदर न वाढण्याची शक्यता असल्याने काही काळामध्ये परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक पुन्हा सुरू होणे शक्य आहे.

कोसळणाऱ्या शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार धास्तावलेला दिसतो आहे. मात्र झालेले हे नुकसान आभासी असते. ज्या वेळी खरोखर विक्री होते, त्याचवेळी गुंतविलेल्या रकमेतील फायदा-तोटा किती याचा हिशोब मांडता येतो. आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य हा त्यासाठीचा मानदंड असू शकत नाही. गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या रकमेपेक्षा त्याला विक्रीनंतर रक्कम कमी मिळाली तर तो तोटा मान्य आहे. पण आज बाजारामध्ये विक्री करणाºया परकीय वित्तसंस्था तोट्यामध्ये व्यवहार करण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे या आभासाने घाबरून जाण्याची गरज नाही. देशांतर्गत वित्तीय संस्था आणि परस्पर निधी आजही कोसळणारा शेअर बाजार सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र बाजारामधून सर्वसामान्य गुंतवणूकदार बाहेर गेलेला दिसतो आहे. त्याने परत येणे महत्त्वाचे आहे.

भारतीय शेअर बाजारामध्ये असलेले दोन प्रमुख निर्देशांक म्हणजे संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टी. संवेदनशील निर्देशांकामध्ये मोठ्या ३० आस्थापनांचा समावेश आहे तर निफ्टीमध्ये केवळ ५०. त्यामुळे या निर्देशांकांच्या वाढ अथवा घटीमुळे संपूर्ण बाजार तसाच आहे, असे मानणे चुकीचे आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ वेगवेगळा असतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करूनच आपल्या फायद्या-तोट्याची गणिते मांडता येत असतात. हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे.

गेल्या महिनाभराच्या घसरणीमुळे बाजारामध्ये अनेक समभागांच्या किमती कमी झाल्या असून त्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात आल्या आहेत. दीर्घकालीन विचार करून अशा समभागांंमध्ये आज गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे, असा विचार करून गुंतवणूक केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारामध्येही तेजी-मंदीचे चक्र सुरूच असते. आजच्या मंदीनंतर येणाºया तेजीचा फायदा घ्यायचा असेल तर आजच थोडा धोका पत्करत गुंतवणूक करणे हिताचे ठरणारे आहे. मात्र त्यासाठी हवी काही प्रमाणामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता आणि धीर बाळगण्याची तयारी.

(लेखक वरिष्ठ उपसंपादक आहेत)

Web Title: Approach: Is the falling stock market worthwhile?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.