भुकेकंगाल देशाला अन्न देताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:22 AM2022-01-21T05:22:42+5:302022-01-21T05:26:06+5:30

केंद्रीय कृषी राज्यमंत्री म्हणून दीर्घकाळ काम पाहणारे अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता. त्यानिमित्त..

annasaheb shindes contribution in indias agricultural revolution | भुकेकंगाल देशाला अन्न देताना...

भुकेकंगाल देशाला अन्न देताना...

googlenewsNext

- डॉ. एम. एस. स्वामीनाथन, ख्यातनाम कृषी शास्त्रज्ञ

अण्णासाहेब शिंदे मंत्री असतानाच्या काळात भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात मला त्यांच्यासोबत काम करता आले. १९६२ मध्ये त्यांच्याशी माझी पहिली भेट झाली. कृषी  विज्ञानासाठी अण्णासाहेबांनी केलेल्या काही महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद ठेवणे उपयुक्त ठरेल. अण्णासाहेबांच्या कृषी मंत्रालयाच्या कार्यकाळात त्यांनी सी. सुब्रमण्यम, जगजीवन राम आणि फखरुद्दीन अली अहमद यांच्यासारख्या अनेक  कॅबिनेट मंत्र्यांसमवेत काम केले. सर्व मंत्र्यांचा अण्णासाहेबांबद्दल मोठा विश्वास आणि आदर होता. 

१९६०च्या दशकात अण्णासाहेब आठवड्यातून एकदा तरी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरआय) शेतात भेट देत असत. मी डॉ. नॉर्मन ई बोरलॉग यांच्याकडून मिळालेल्या गव्हाच्या वाणांवर काम करत होतो. १९६४मध्ये भारतात अन्नधान्याची परिस्थिती गंभीर झाली. अमेरिकेकडून  पीएल-४८० (public law 480) कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात गहू आयात करावा लागला. परराष्ट्र तज्ज्ञांनी भारताच्या दुर्दशेचे वर्णन ‘हाता तोंडाशी गाठ’ असे केले. मेक्सिकोहून मिळालेल्या गव्हाच्या वाणाची लागवड केली तर परस्थिती बदलू शकते हे मी मांडले, त्याला अण्णासाहेबांनी त्वरित पाठिंबा दिला. गव्हाच्या वाणाचे दोन प्रकार, लेर्मा रोजो - 64A आणि सोनोरा - 64 भारतात  चांगले काम करत होते. म्हणून मी शेतकऱ्यांच्या शेतात राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रस्तावित केला. अण्णासाहेब राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उत्साही समर्थक होते. 

सी. सुब्रमण्यम यांनी गहू, तांदूळ, संकरित मका, संकरित ज्वारी आणि संकरित बाजरीचे  राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या माझ्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला.  १९६५मध्ये मेक्सिकोमधून २५० टन बियाणे आयात करण्यास मान्यता मिळाली. १९६५मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अण्णासाहेब  आमच्या गव्हाच्या शेतात घेऊन आले. ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देणारे शास्त्री शेती आणि शेतकरी समर्थक होते. त्यांनी मेक्सिकोमधून लेर्मा रोजो - 64A १८ हजार टन बियाणे आयात करण्यास मान्यता दिली.  १९६८मध्ये हरितक्रांती घडविण्यास आम्हाला मदत केली.  १९७२मध्ये अण्णासाहेबांनी  मला सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाचे व्यावसायिकरण करण्यासाठी नेमलेल्या  समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले.  पाणी आणि पिके कुशलतेने हाताळण्यासाठी लहान शेतकरी एकत्र आले, तरच कृषी क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल असेल, असा अण्णासाहेबांचा विश्वास होता. दुग्ध उत्पादनात हे घडले, पण कृषी क्षेत्रात घडू शकले नाही, हे भारताचे दुर्दैव !

अण्णासाहेब कोरडवाहू शेतीवरील संशोधन अधिक वाढविण्याच्या गरजेवर भर देत असत आणि हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (आयसीआरआयएसएटी) स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डाळी आणि तेलबियांशी संबंधित लक्ष देणे गरजेचे आहे, यावर जोर दिला. आपल्या तेलबियांच्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्याची गरज त्यांना जाणवली होती. सूर्यफूल व सोयाबीनच्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आज ही दोन्ही पिके आपल्या तेलबियांच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची आहेत.

शाश्वत पाणी सुरक्षा या प्रांतातल्या अण्णासाहेबांच्या ज्ञानामुळे त्यांना  महाराष्ट्र सरकारने  सिंचन कमिशनचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले. पावसाच्या  पाण्याचा प्रत्येक थेंब सांभाळून / वाचवून भूजलाचे  पुनर्भरण केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.   १९७२ ते १९७८पर्यंत आयसीएआरचा महासंचालक असताना अण्णासाहेबांनी मला अनमोल अशी मदत केली. नवीन कल्पनांना सतत पाठिंबा दिला. १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बऱ्याच अज्ञात शक्तींनी भारताच्या कृषी कार्यक्रमाच्या विकासात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, कारण एखादा देश अन्नाबाबत स्वावलंबी होणे हे परदेशी राजकारणात फार महत्त्वाचे असते. 

या काळात भारताच्या कृषी शास्त्रज्ञांना मदत करण्यात अण्णासाहेबांच्या वाटा होता. आमचे नाते परस्पर प्रेम आणि विश्वास यावर आधारित होते. भारतीय कृषी उत्क्रांतीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमागे अण्णासाहेब पहाडासारखे उभे होते.  कृषी व ग्रामीण विकासाचा मार्ग उजळविणारा दीपस्तंभ म्हणजे अण्णासाहेब शिंदे!

Web Title: annasaheb shindes contribution in indias agricultural revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.