खाणे आणि खरकटे : ऐन सणासुदीच्या काळात सर्वपक्षीय तमाशा; आता खऱ्या अर्थानं वग सुरू झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 08:27 AM2021-09-22T08:27:44+5:302021-09-22T08:28:03+5:30

म्हटले तर महाराष्ट्रातील जनतेचे जोरदार मनोरंजन सुरू आहे, अन् झालेच तर एकमेकांचे कपडे फाडण्याच्या सर्वपक्षीय कार्यक्रमामुळे लोक खूषही आहेत.

All-Party's spectacle during the festival season; Now the real Vag has started | खाणे आणि खरकटे : ऐन सणासुदीच्या काळात सर्वपक्षीय तमाशा; आता खऱ्या अर्थानं वग सुरू झाला!

खाणे आणि खरकटे : ऐन सणासुदीच्या काळात सर्वपक्षीय तमाशा; आता खऱ्या अर्थानं वग सुरू झाला!

Next

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आधीचे आरोप-प्रत्यारोप गणगवळण वाटावी, आता खऱ्या अर्थाने वग सुरू झाला, अशा स्वरूपाचा सर्वपक्षीय राजकीय तमाशा ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रात सुरू आहे. अलिबाग ते वाशिम अन् नाशिक ते कोल्हापूर, मध्येच दिल्ली अशी पायपीट करणारे किरीट सोमय्या, त्यांना बळ देणारे चंद्रकांतदादा पाटील, दादांच्या भाषेत शंभर अजितदादा खिशात ठेवणारे दबंग नेते देवेंद्र फडणवीस, या सगळ्यांना उत्तरे देता देता ज्यांना सूर्य कधी मावळतो तो कळत नाही असे संजय राऊत, कोल्हापूरच्या तालमीत शड्डू ठोकणारे हसन मुश्रीफ अन् आतापर्यंत आपल्यापैकी एकावरही आरोप झाला नसल्याने बांधावर बसून मजा पाहणारे काँग्रेसचे मंत्री, हे सगळे मान्यवर या वगनाट्यात वेगवेगळ्या भूमिकेत आहेत. 

म्हटले तर महाराष्ट्रातील जनतेचे जोरदार मनोरंजन सुरू आहे, अन् झालेच तर एकमेकांचे कपडे फाडण्याच्या सर्वपक्षीय कार्यक्रमामुळे लोक खूषही आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर किरीट सोमय्या अधिक जोमाने पक्षकार्याला लागले. भ्रष्टाचारविरोधी लढाई त्यांनी तीव्र केली. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली अन् युती करून लढलेले भाजप, शिवसेना निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर एकमेकांच्या विरोधात गेले. शिवसेेनेने दोन्ही काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून सोमय्यांच्या तोफेतला दारूगोळा जरा अधिकच विध्वंसक बनला आहे. किंबहुना तसे चित्र ते उभे करीत आहेत. भाजपच्या तोफेला परमबीरसिंग, रश्मी शुक्ला वगैरे पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बत्ती लावली व त्यात अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रिपदाचा बळी गेला. दरम्यान, वेगळ्याच नाजूक प्रकरणात संजय राठोड यांची विकेट गेली. आता पुढचे कोण, या प्रश्नाचे उत्तर सोमय्या व त्यांचे झिलकरी रोज वेगवेगळे देत राहतात. (All-Party's spectacle during the festival season; Now the real Vag has started!)

प्रत्यक्ष अनिल देशमुखांच्या विरोधातील खटला अजून उभा राहिलेला नाही. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तूर्त त्यांचे नाव नाही. आधीच्या लोकशाही आघाडी सरकारच्या अंतिम टप्प्यात भ्रष्टाचाराचा आरोप झालेले छगन भुजबळ हे पुतणे समीर यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात दोन वर्षे तुरुंगात राहिले. नुकतेच न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांनी चिखलफेकीच्या स्वरूपात केलेल्या आरोपांचे पुढे काय होते, याचेही उत्तर जनतेला मिळाले आहे. सोमय्या म्हणतात तशी मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंब किंवा सहायकांची बेनामी मालमत्ता ऑक्टोबर २०१९ नंतर तयार झालेली नसेल. तेव्हा, भाजप-शिवसेना युतीच्या काळात त्यांनी ठाकरे कुटुंबावर किंवा त्यांच्या विश्वासातील मंत्र्यांवर आरोप का केले नाहीत? हसन मुश्रीफ यांच्या ज्या भानगडींची दवंडी आता मुंबईपासून कोल्हापूरपयर्यंत पिटली जातेय त्यादेखील काल-परवाच्या नक्की नाहीत. 

यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या पार्टिकल बोर्ड कारखान्याची नोंद दोन-अडीच दशकांपूर्वीची, त्यांच्या दिवंगत खासदार वडिलांच्या काळातील आहे. मग ही सगळी प्रकरणे आताच बाहेर येण्याचे कारण लहान पोरालाही समजण्यासारखे आहे. सोमय्या व भाजपचे नेते आदल्या दिवशी आरोप करतात व दुसऱ्या दिवशी ईडी व सीबीआयची पथके संबंधितांच्या कार्यालयावर धडकतात. जणू ती मुंबईच्या विमानतळावरच वाट पाहत बसलेली असावीत, हे तर्कट न समजायला लोक काही दुधखुळे नाहीत. स्वत: सोमय्या किंवा त्यांचे नेते आधी नारायण राणे प्रभृतींसारख्या ज्यांच्याविरोधात कडाडले होते, ते भले लोक भाजपमध्ये गेल्यानंतर कसे काय पवित्र होतात, हेदेखील लोकांना चांगले समजते. तरीदेखील केंद्रात सत्तेत असलेला पक्ष राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचे कपडे फाडत असेल व राज्यातली सत्ताधारी आघाडी आधीच्या सरकारच्या भानगडी खोदायचा इशारा देत असेल तर सामान्य माणसांना मनोरंजनापलीकडे एक वेगळेच समाधान लाभते. फाडा, फाडा, एकमेकांचे कपडे फाडा, असे ओरडून सांगावे असे सामान्यांना वाटते.  पैशासाठी सत्ता व सत्तेतून अधिक पैसा, त्या पैशाचा वापर करून पुन्हा सत्ता, त्यात कुणी आडवे आले तर मात्र लगेच राजा हरिश्चंद्राचा अवतार बनून एकमेकांचे खाणे चव्हाट्यावर आणायचे, हे अत्यंत किळसवाणे दुष्टचक्र सामान्य मतदारांच्या वाट्याला आले आहे. यातूनच मग जे अधिक काळ सत्तेवर असतील त्यांचे खाणेही अधिक अन् त्या खाण्यादरम्यान ताटाभोवती सांडणारे खरकटेही अधिक. ज्यांना सत्ताच अल्पकाळ लाभली त्यांचे खाणे कमी, त्यांच्या ताटाभोवती पडणारे खरकटेही चार शितांपुरते मर्यादित, हा या खाद्यसंस्कृतीचा उपभाग. तेव्हा पुन्हा पंगती बसविण्यासाठी जरी हे होत असले तरी या निमित्ताने निघणारे खाणे व खरकटे स्वच्छतेसाठी चांगलेच आहे.
 

Web Title: All-Party's spectacle during the festival season; Now the real Vag has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.