The air of herpes ... lotus water! | दादांची हवा... कमळाचं पाणी !
दादांची हवा... कमळाचं पाणी !

- सचिन जवळकोटे

गेल्या महिन्यात एकमेकांना रात्री गुपचूप भेटणारे ‘अजितदादा’ अन् ‘देवेंद्रपंत’ नुकतंच माढ्यातील निमगावच्या विवाह सोहळ्यात सर्वांसमक्ष गप्पा मारत बसले. तेही एक नव्हे.. दोन नव्हे.. तब्बल अर्धातास. ‘त्यावेळी आमच्यात केवळ हवापाण्याच्या गप्पा झाल्या,’ असं भलंही ‘दादां’नी दुसºया दिवशी बारामतीत सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात काय संवाद झाला असावा, त्याचा हा खास ‘सोलापुरी स्टाईल’नं बांधलेला अंदाज...

दादा :  गेल्या अर्ध्या तासापासून मी तुमची मंडपात वाट पाहतोय.
पंत :: अहो दादाऽऽ मी तर गेल्या एक महिन्यापासून अजूनही तुमची वाट पाहतोय. काय म्हणतेय तुमची बारामती ?
दादा : ‘भांड्याला भांडं’ लागलं म्हटल्यावर ‘पेल्यातलं वादळ’ शमायला थोडासा वेळ लागणारच नां ! आमचं जाऊ द्या सोडाऽऽ तुम्ही मात्र इकडं याल असं वाटलं नव्हतं.
पंत : असं कसं ? कितीही नाही म्हटलं तरी शेवटी ‘संजयमामा’ हे माझ्या खास गोटातले आमदार. त्यांना निवडून आणण्यात माझा मोठ्ठा वाटा आहे म्हटलं. विसरलात की काय ?
दादा : (दचकून) काय म्हणता ? मी तर आत्तापर्यंत समजत होतो की, ते माझेच विश्वासू सहकारी असावेत.
पंत : (आश्चर्यानं) म्हणजे तुम्हीही ‘शिंदें’कडूनच लग्नाला आलात की काय ? मला वाटलं, ‘साताºयाच्या भोसलें’कडून आलात.
दादा : (‘साताºयाचे भोसले’ हे नाव ऐकताच गडबडून विषय बदलत) निमगावच्या ‘शिंदे’ घराण्याशी माझे खूप जवळचे संबंध. एकेकाळी ‘बबनदादां’ना जिल्ह्यात मीच मोठ्ठं केलेलं.
पंत : (गालातल्या गालात हसत) होय...होय... निवडणुकीपूर्वी सारखं आमच्या संपर्कात असायचे, तेव्हा त्यांनी सांगितलेलं. (निश्वास सोडत) तिकीट वाटपात युती नसती तर ‘दादा’ आमचे आमदार राहिले असते आज.
दादा : (अकलूजच्या दिशेनं बघत) पण ते ‘दादा’ तर तुमच्याच गोटात आहेत की सध्याऽऽ.. नशीबवान आहात. ‘अकलूजचे पाटील’ तुम्हाला लाभले.
पंत : (‘इंदापूर अन् इस्लामपूर’च्या दिशेनं नजर फिरवत)  का? या साºया पाटलांवर तुमचा एवढा राग का ?
दादा : (हळूच कानात) या साºया ‘पाटलां’ना पर्याय देण्याचा मी खूप प्रयत्न केला. ‘अनगरच्या पाटलां’नाही कदाचित माहीत नसावं,‘या इलेक्शनला अर्ज भरून ठेवा,’ असा गुपचूप निरोप मी मंगळवेढ्याच्या ‘लक्ष्मणरावां’ना दिला होता; मात्र ते सध्या बनलेत तुमच्या मूळ कार्यकर्त्यांपेक्षाही अधिक कट्टर ‘भक्त’. डायरेक्ट ‘नाच्या’च निघाले.
पंत : (मनातल्या मनात सुखावत) ही सारी तुमच्या ‘थोरल्या काकां’चीच कृपा. अशी कैक मंडळी आमच्याकडं जमलीत.
   (एवढ्यात दोघांच्या मध्ये सोफ्यावर ठेवलेला मोबाईल वाजू लागतो.)
पंत : (मोबाईल कानाला लावत) हांऽऽ बोला राजाभाऊऽऽ काय म्हणतेय बार्शीची धूळ ? कसा काय फोन लावलात.. विसरलात की काय ?
दादा : (घाई गडबडीत) हा फोन माझाय होऽऽ तुमचा तुमच्या खिशात आहे बघा. आजकाल ‘राजाभाऊ’ मला कॉल करत असतात. सवयीनं तुम्ही चुकून उचललात.
पंत : (डोकं खाजवत) ते तुमचे ‘पंढरपूरचे नाना’ही असाच गोंधळ घालतात हो कधी कधी. नेहमीच्या सवयीनं कॉल मला करतात अन् ‘थोरले काका’ समजून चुकून मलाच ‘हात जोडून’ नमस्कार करतात.
दादा : पण काहीही म्हणाऽऽ त्या अक्कलकोटच्या ‘अण्णां’चा पद्धतशीरपणे पार राजकीय चुराडाच करून टाकलात तुम्ही. याला अगदी कसं ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ म्हणतात बघा.
पंत : (हसत)  हांऽऽ हांऽऽ हांऽऽ तसंही अक्कलकोटच्या राजकारणाला ‘मर्डर-हाफ मर्डर’ शब्द नवे नाहीत म्हणा...पण तुम्हीही तुमच्या सांगोल्याच्या ‘दीपकआबां’ची सारी गणितं बिघडविलीत की.
दादा : (सूचकपणे) ज्या नेत्याला साधं कारखान्याचं गणित जमत नसतं, त्याच्यासाठी राजकारणाचीही समीकरणं कधीच सुटत नसतात म्हटलं.
पंत : कारखान्यावरनं आठवलं. आता तुमचे सत्तेतले भागीदार म्हणजे ‘परंड्याचे तानाजीराव’ म्हणे बार्शी अन् करमाळ्याचा कारखाना घेणार आहेत चालवायला.
दादा : थांबा...थांबा...आधी ‘सहकार’ खातं घेऊ दे ताब्यात मला. मग        बघाऽऽ त्या शिखर बँकेच्या माध्यमातून कसा एकेकाला कामाला         लावतो की नाही ? बघा.. तुमचे ‘सुभाषबापू’ कसा चेहरा गंभीर करून बसलेत बाजूलाच.
(एवढ्यात अक्षता पडतात...)
पंत : (खोचकपणे) तुमचं सरकार कधी पडतंय, याची वाटच पाहत बसलोय आम्ही.
(बाहेर बँडही वाजू लागतो...)
दादा : (मिस्कीलपणे) तुम्ही काळजी करू नका... यांचा ‘बँडबाजा’ वाजविला तर मीच वाजवेन. दुसरं कुणी नाही.

पाटलांची आमदारकी !

सध्या ‘माळशिरस’ अन् ‘मोहोळ’ मतदारसंघात तयार झालाय उत्साहाचा भलताच माहोल. दोन्ही नवे-कोरे आमदार आखू लागलेत गावोगावी दौरे. लागलेत विकासाची भाषा बोलू; मात्र यामुळं गोंधळात पडलीय सर्वसामान्य जनता... कारण या दोन्ही तालुक्यात विकासावर बोलावं ते केवळ ‘पाटलां’नीच म्हणे. आजपर्यंतचा अनुभव पाहता इथल्या ‘राखीव’ आमदारांनी निवडून आल्यानंतर थेट घरचा रस्ता पकडावा. पाच वर्षांत कधीतरी अधून-मधून एखाद्या सोहळ्यात हजेरी लावावी. हळूच चेहरा दाखवावा. बस्स्ऽऽ बाकीचं पुढचं काम सारं इथल्या ‘पाटलां’नीच करावं. या आमदारांचे ‘दौरे’ही ‘पाटलां’नीच आखावेत. सह्या केलेले ‘लेटरपॅड’ही ‘पाटलांच्या वाड्या’वरच ठेवावेत. आता हे ‘पाटील’कोण असा बाळबोध प्रश्न ‘अकलूज’ किंवा ‘अनगर’मध्ये जाऊन विचारू नका, म्हणजे मिळविली. लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: The air of herpes ... lotus water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.