Accumulated: The cost of judgment | संचित : निर्णयाची किंमत

संचित : निर्णयाची किंमत

- जेफ बेझॉस

आपल्याला मिळालेल्या निसर्गदत्त देणगीचा उपयोग आपण कसा करतो? त्या देणगीचा तुम्हाला अधिक अभिमान असतो की आपण जाणीवपूर्वक एखादा निर्णय घेतो, निवड करतो त्याचा? तुमच्या लक्षात येईल, आपण जाणीवपूर्वक जे निर्णय घेतो, ते बऱ्याचदा आपल्या नैसर्गिक हुशारीपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात. कारण त्यावरच तुमचं वर्तमान आणि भविष्य ठरत असतं.
ज्यावेळी अ‍ॅमेझॉन सुरू करण्याचा निर्णय मी घेतला, त्यावेळी तरुण होतो. तीस वर्षांचा होतो. वर्षभरापूर्वीच माझं लग्न झालं होतं. माझ्या लक्षात आलं, इंटरनेट, वेबचा वापर दरवर्षी तब्बल २३०० टक्क्यांनी वाढतो आहे. कुठल्याही गोष्टीचा इतक्या वेगानं प्रसार होणं यापूर्वी मी कधीच पाहिलं नव्हतं की ऐकलं नव्हतं. माझ्या डोक्यात होतं, ते आॅनलाइन पुस्तकविक्री करण्याचा व्यवसाय करण्याबाबत. लक्षावधी पुस्तकं मला त्यामाध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची होती. वास्तव जगात हे आजपर्यंत कधीच झालं नव्हतं आणि ते शक्यही नव्हतं. माझ्या या योजनेबाबत मी अतिशय उत्सुक होतो.
माझ्या पत्नीचाही मी याबाबत सल्ला घेतला आणि तिला विचारलं, या व्यवसायासाठी मी नोकरी सोडू इच्छितोय आणि नवं काही करू पाहतोय. कदाचित मला त्यात यश मिळणारही नाही. पण पत्नीनं मला त्यासाठी नुसती संमतीच दिली नाही, तर माझ्या नव्या प्रवासाला प्रोत्साहनही दिलं. न्यू यॉर्क शहरात एका वित्तविषयक संस्थेत मी नोकरी करीत होतो. माझ्या बॉसपुढे मी नोकरी सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याचं म्हणणं होतं, ही अतिशय उत्तम कल्पना आहे; पण ज्यांना चांगली नोकरी नाही, त्यांच्यासाठी ही जास्त चांगली कल्पना आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार कर. मलाही त्याचा सल्ला योग्य वाटला. निर्णय कठीण होता; पण शेवटी मी माझ्याच निर्णयानं जायचं ठरवलं. कारण मी प्रयत्न करूनही अयशस्वी झालो असतो, तर त्याचं मला दु:ख वाटलं नसतं; पण प्रयत्न न करताच हा विचार सोडून दिला असता, तर मात्र आयुष्यभर वाईट वाटलं असतं. (उत्तरार्ध)

Web Title: Accumulated: The cost of judgment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.