१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 06:56 AM2021-07-28T06:56:27+5:302021-07-28T09:29:58+5:30

जपानची १३ वर्षांची चिमुरडी मोमिजी निशिया, आणि कुवैतचा ५७ वर्षांचा शूटर अब्दुल्लाह अल रशिदी; दोघांच्याही गळ्यात टोकियो ऑलिम्पिकची पदकं आहेत!

13 of 57? - What is the age to win Tokyo Olympic medal ?; The two players simply stunned the world | १३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं

१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं

googlenewsNext

ऑलिम्पिकसारख्या जगातल्या सर्वोच्च दर्जाच्या स्पर्धात्मक खेळासाठी खेळाडूचं वय किती असायला हवं? अर्थातच ऑलिम्पिक समितीचं यावर कोणतंही बंधन नाही. कोणत्याही वयाचा खेळाडू, कोणत्याही खेळात भाग घेऊ शकतो, पण कोणाला ऑलिम्पिकला पाठवायचं, त्याविषयीचे निकष काय, हे त्या त्या देशातील खेळांचा महासंघ ठरवत असतो. कोरोनानं वय वाढवलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा यंदा टोकियोमध्ये होत आहेत. ऑलिम्पिकची अजून तशी सुरुवात, पण सध्या दोन कारणांनी आणि दोन खेळाडूंमुळे ही स्पर्धा चर्चेत आहे. एक आहे जपानची १३ वर्षांची चिमुरडी मोमिजी निशिया. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सामील केल्या गेलेल्या स्ट्रीट स्केटबोर्ड या खेळाचं पहिलं गोल्ड मेडल तिनं मिळवलं आहे. दुसरा खेळाडू आहे कुवैतचा ५७ वर्षांचा शूटर अब्दुल्लाह अल रशिदी. त्यानंही आपल्या देशासाठी कांस्यपदक पटकावलं आहे. त्याच्या वयाच्या निम्मे असलेले खेळाडू या वयात ऑलिम्पिकसारख्या खेळातून निवृत्ती घेत असतात.

जमैकाचा ‘फास्टेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड’ उसेन बोल्ट याने ऑलिम्पिकमध्ये अनेक इतिहास रचताना वयाच्या ३१ व्या वर्षीच स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती घेतली. वयाच्या पंचवीशी-तिशीतच अनेकांचं स्पर्धात्मक क्रीडा वय संपलेलं असतं. अर्थातच मोमिजी निशिया असो किंवा अब्दुल्लाह अल रशिदी. यांच्यापेक्षा कमी आणि जास्त वयाच्या खेळाडूंनी याआधी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे आणि पदकंही जिंकली आहेत. पण, या निमित्तानं वयाचा मुद्दा जगभरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

 यंदा स्ट्रीट स्केटबोर्ड या खेळात पदकं जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सामील झाल्या होत्या. तिघीही  लहान वयाच्या आहेत. सुवर्णपदक पटकावणारी मोमिजी १३ वर्षे ३३० दिवसांची, रौप्य पदक घेणारी ब्राझीलची रेयसा लील ही मोमिजीपेक्षाही छोटी म्हणजे १३ वर्षे २०३ दिवसांची, तर कांस्य पदक पटकावणारी जपानची फुना नाकायामा १६ वर्षांची आहे. एकाच खेळात पहिली तिन्ही पदकं जिंकणारं ऑलिम्पिकमधलं हे सर्वात कमी वयाचं त्रिकूट आहे, असं मानलं जात आहे.

सगळ्यात कमी वयात ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक मिळविण्याचा मान अमेरिकेच्या मार्जरी गेस्ट्रिंग हिच्या नावे जातो. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये १३ वर्षे २६८ दिवसांची असताना तिनं स्प्रिंगबोर्डमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं.  एकीकडे ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंचं वय दिवसेंदिवस कमी होत आहे. पण, दुसरीकडे ज्येष्ठ खेळाडूंनीही अनेक इतिहास रचले आहेत. त्यातलं एक नाव आहे अब्दुल्लाह अल रशिदी. कुवैतच्या या खेळाडूनं तब्बल सात वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. पाच वेळा तो अपयशी ठरला. सहाव्या वेळी त्यानं कांस्य पदक पटकावलं.  यंदा वयाच्या ५७ व्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये  त्यानं पुन्हा कांस्य पदक मिळवलं. 

स्वीडनच्या ऑस्कर स्वॉन यांनी १९१२ च्या ऑलिम्पिकमध्ये वयाच्या ६४ व्या वर्षी शूटिंगमध्ये सुवर्ण तर १९२० च्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा कमबॅक करताना वयाच्या ७२ व्या वर्षी रौप्य पदक मिळवलं होतं. वयाचे हे दोन्ही रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. अशा वेळी पुन्हा मुद्दा येतो, वय महत्त्वाचं कि अनुभव? क्रीडांगणावर खरंतर या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी दिशेने जाणाऱ्या ! वय  अधिक म्हणजे शरीराची साथ कमी, तर कमी वयात अनुभव असा कितीसा असणार?.. पण पराकोटीचं कौशल्य आणि मनोबल दाखवताना मोमिजी निशिया आणि अब्दुल्लाह अल रशिदी या वयाबाबत दोन टोकांना असलेल्या दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं आहे !  - अर्थात ऑलिम्पिकचं मैदान सगळ्या मर्यादा पार करुन जाऊ शकतात, त्यांच्यासाठीच  तर असतं !  ज्यांच्याकडे पराकोटीची क्षमता, जिद्द असते, ते त्यावर आपलं नाव कोरत असतात; मग त्यांचं वय कितीही असो आणि अनुभव असो, ...वा नसो !

समीर मराठे

उपवृत्तसंपादक, लोकमत

sameer.marathe@lokmat.com

 

Web Title: 13 of 57? - What is the age to win Tokyo Olympic medal ?; The two players simply stunned the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.