धुळे : शहरात लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली असून याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेवून चर्चा केली.
राष्ट्रवादी काॅंग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागावर कामाचा ताण वाढला. भविष्यात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना, बालकांना धोका असल्याचे म्हटले आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असेल असे बोलले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफने तसा इशारा दिला आहे.
धुळे शहराची लोकसंख्या ५ लाखापेक्षा अधिक आहे. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जळगाव, नंदुरबार, मालेगाव येथील रुग्ण देखील धुळे शहरात येतात. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता धुळे शहरात तातडीने बाल कोविड सेंटर सुरु करावे आणि त्यात पालकांची देखील सोय होइल अशी व्यवस्था करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भाेसले, जोसेफ मलबारी, मंगेश जगताप, यशवंत डोमाडे, उमेश महाले, सलीम लंबू, संजय माळी, धनराज शिरसाठ, नवाब बेग मिर`झा , राजेंद्र सोलंकी, विजय वाघ, राहूल महाजन, रजनिश निंबाळकर, स्वप्निल पाटील, वाल्मिक मराठे, जयदिप बागल आदी उपस्थित होते.