शिंदखेडा तालुक्याला आतापर्यंत एकदाच अध्यक्षपदाचा बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:01 PM2020-01-14T19:01:34+5:302020-01-14T19:02:14+5:30

आतापर्यंत अध्यक्षपदावर शिरपूर, साक्रीचे राहिले आहे वर्चस्व

Shindkheda taluka has the honor of being the president once | शिंदखेडा तालुक्याला आतापर्यंत एकदाच अध्यक्षपदाचा बहुमान

शिंदखेडा तालुक्याला आतापर्यंत एकदाच अध्यक्षपदाचा बहुमान

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेच्या गेल्या ५८ वर्षाच्या कालावधीत २९ जणांनी अध्यक्षपद भूषविले आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनानंतर अध्यक्षपदाचा सर्वात जास्त बहुमान शिरपूर व साक्री, धुळे तालुक्याला मिळाला आहे. तर शिंदखेडा तालुक्याला आतापर्यंत केवळ एकदाच अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, तसेच कोणत्या तालुक्याला पुन्हा संधी मिळते याची जिल्ह्याला उत्सुकता लागलेली आहे.
धुळे जिल्हा परिषदेची स्थापना मे १९६२ मध्ये झालेली आहे. नंदुरबार जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी धुळे जिल्हा एकच होता. सुरवातीच्या काळात अध्यक्षपदाचे वर्चस्व नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर या तालुक्याकडेच असायचे. मात्र जुलै १९९८ मध्ये नंदुरबार जिल्हा अस्तित्वात येत धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले.
विभाजनानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचा बहुमान हा सर्वात जास्त शिरपूर, साक्री या दोन तालुक्यांना मिळाला आहे. त्याखालोखाल धुळे तालुक्याच्या वाटेला हे पद आलेले आहे. मात्र शिंदखेडा तालुक्याला गेल्या २२ वर्षात केवळ एकदाच अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेला आहे.
नंदुरबार जिल्हा असतांना शिरपूरचे व्यंकटराव तानाजी रणधीर यांनी अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर कलाबाई युवराज भील, सरलाबाई प्रल्हाद पाटील यांनीही अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच साक्री तालुक्यातील लतिका ज्ञानेश्वर नागरे, तर शिवाजीराव नामदेव दहिते यांनी तीनवेळा अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय धुळे तालुक्यातून सुभाष शिवाजीराव देवरे, मनोहर दत्तात्रय भदाणे, सुधीर सुधाकर जाधव, यांनी अध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळलेले आहे. तर शिंदखेडा तालुक्याच्या संगीता राजेंद्र देसले या एकमेव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत. आताही १० पैकी ८ जागा भाजपने जिंकल्या असल्या तरी या तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणे जवळपास कठीणच आहे. दरम्यान आता जिल्हा परिषदेचा ३० व्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. अध्यक्षाची निवड १७ रोजी होणार आहे.

Web Title: Shindkheda taluka has the honor of being the president once

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे