आईला किल्ल्यावरुन कोसळताना पाहून चिमकुल्या यशने फोडला टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:23 AM2020-11-21T11:23:22+5:302020-11-21T11:23:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : दिवाळीच्या सुटीत आई - बाबांसोबत पर्यटन, किल्ला गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी १२ वर्षाचा चिमुकला यश ...

Seeing his mother falling from the fort, Chimkulya burst with success | आईला किल्ल्यावरुन कोसळताना पाहून चिमकुल्या यशने फोडला टाहो

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दिवाळीच्या सुटीत आई - बाबांसोबत पर्यटन, किल्ला गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी १२ वर्षाचा चिमुकला यश पहाटे सहा वाजताच उठून लळींग किल्ल्यावर गेला. काही क्षणातच आईला डोळ्यादेखत पाय घसरुन खाली पडतांना पाहून यशने आई....आई म्हणत हंबरडा फोडला. ग्रामस्थ तसेच त्याठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. पण खोल दरी असल्याने शेवटी आपत्ती निवारण पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन यशची आई ललीता चव्हाण यांना वर काढले. रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात पाठविले. परंतू रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्या गतप्राण झाल्या होत्या. अवघ्या काही क्षणातच होत्याचे नव्हते झाल्याने उपस्थितही भावविवश झाले.
शहरातील गोपाळ नगरात धुळे पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहायक प्रफुल्ल चव्हाण हे आपल्या आई, पत्नी ललीता (वय ३७) आणि मुलगा यश (१२) यांच्या सोबत राहतात. प्रफुल्ल चव्हाण हे १० वर्षापासून जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये त्यानंतर एक वर्ष शिंदखेडा पंचायत समिती आणि आता गेल्या सहा महिन्यापासून धुळे पंचायत समितीत वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर सुटीत मुलगा यश आणि पत्नी ललीता सोबत त्यांनी शुक्रवारी सकाळी गिर्यारोहणाचा बेत केला होता. शहरानजीक महामार्गावर असलेल्या किल्ला लळींग येत जाणार होते. आपण आई -बाबांसोबत गिर्यारोहणाला जाणार म्हणून गुरुवारी रात्रीपासून यश हा खूप आनंदीत होता. शुक्रवारी पहाटे सहा वाजता आई -बाबांसोबत तो लळींग किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर पोहोचला. किल्ल्यावर पहाटे अनेक लोक व्यायाम आणि फिरण्यासाठी येत असतात. त्यांची बऱ्यापैकी गर्दी होती. किल्ल्यावरील एका कोपऱ्यात बुरुजाजवळ मंदीर होते. त्या मंदीराजवळ जाऊन आई ललीता चव्हाण यांनी पती प्रफुल्ल यांना फोटो काढण्यासाठी सांगितले.प्रफुल्ल फोटो काढत असतांना ललिता यांचा पाय हा त्याठिकाणी झालेल्या भुसभुशीत मातीवरुन घसरला आणि काही क्षणात त्या खाली कोसळल्या. ते पाहून यशने आई म्हणत टाहो फोडला. प्रफुल्ल यांनी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास धुळ्यातच राहणाऱ्या आपला भाऊ चेतनला कळविले. त्यामुळे भाऊ व त्यांचे मित्र सकाळी साडे नऊ वाजता किल्ल्यावर पोहोचले. ललीता चव्हाण यांचा शोध घेणे सुरु होते. त्या खोल दरीत झाडा - झुडपांमध्ये जखमी अवस्थेत दिसून आल्या. टोल नाक्यावरील रुग्णावाहिकेतील कर्मचारी आणि आपत्ती निवारण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ललीता चव्हाण यांना बाहेर काढून तातडीने शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. डॉ. अरुण कुमार नागे यांनी तपासणी करुन ११ वाजून ५४ मिनिटांनी ललीता यांना मृत घोषीत केले.

Web Title: Seeing his mother falling from the fort, Chimkulya burst with success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.