सानेगुरूजींचे धुळे कारागृहात होते वास्तव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:52 PM2019-08-14T22:52:52+5:302019-08-14T22:53:17+5:30

स्वातंत्र्यलढ्यात उडी : प्रताप विद्यालयातील नोकरीचा राजीनामा देत सर्वसामान्यांचे प्रबोधन

Saneguru's Dhule was in jail! | सानेगुरूजींचे धुळे कारागृहात होते वास्तव्य!

सानेगुरूजींचे धुळे कारागृहात होते वास्तव्य!

Next

सुरेश विसपुते । 
धुळे  : मातृहृदयी सानेगुरूजी यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे. त्यासाठी त्यांना ब्रिटीश सरकारने पकडून येथील जिल्हा कारागृहात ठेवले होते. हा त्यांचा पहिलाच कारावास होता. त्यानंतर त्यांना अनेकदा कारावास पत्करावा लागला. येथील कारागृहातील वास्तव्यातच त्यांनी विनोबाजींना गीताई लिहिण्यासाठी सहाय्य केले होते. 
नोकरीचा राजीनामा 
सानेगुरूजी अमळनेर येथील प्रताप विद्यालयात कार्यरत होते. त्याचवेळी स्वातंत्र चळवळीने जोर धरला. युवक वर्ग महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारांनी भारावला होता. त्यावेळी कित्येक युवकांनी आपली नोकरी, व्यवसाय सोडून या स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले होते. सानेगुरूजी यांनीही प्रताप विद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला. 
स्वातंत्रलढ्यात उडी 
त्या काळी जळगाव जिल्हा हा पूर्व खान्देश तर धुळे जिल्हा हा पश्चिम खान्देश म्हणून ओळखला जात होता. नोकरीच्या राजीनाम्यानंतर सानेगुरूजींनी या दोन्ही जिल्ह्यात फिरून देशाच्या स्वातंत्र लढ्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. पश्चिम खान्देश म्हणजे धुळे जिल्ह्यातील शिरूड, धुळे यासह पूर्व खान्देश म्हणजे हल्लीच्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, यावल, सावदा या भागात त्या काळी सानेगुरूजींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी एक हजार स्वयंसेवक उभे केले. ते युवकांना त्यासाठी उद्युक्त करत होते. या लढ्यासाठी निधी गोळा करण्याचे काम त्यांच्याकडेच होते. 
धुळे कारागृहात रवानगी 
सानेगुरूजींनी स्वातंत्र्य लढ्यासाठी चालविलेले कार्य पाहून ब्रिटीश सरकारकडून त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. आणि फेबु्रवारी १९३२ मध्ये अटक करून धुळे कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तेथे जून महिन्यापर्यंत त्यांचे वास्तव्य होते. 
‘गीताई’चा जन्म!
सानेगुरूजी यांच्यासोबत त्यावेळी धुळ्याच्याच कारागृहात आचार्य भागवत व आचार्य विनोबा भावे हेही होते. या कारागृहातच विनोबा भावे यांनी लिहिलेल्या ‘गीताई’चा जन्म झाला. 
विशेष म्हणजे विनोबा भावे यांनी ही गीता प्रवचने सांगितली व साने गुरूजी यांनी ती लिहून घेतली.  यातून गीताई आकारास आली. येथून नाशिक येथे रवानगी झाल्यानंतर तेथील कारागृहात सानेगुरूजींनी ‘शामची आई’ ही प्रसिद्ध कादंबरी लिहिली.
‘खरा तो एकचि धर्म..’
सानेगुरूजी यांना पुन्हा १९४० साली ब्रिटीश सरकारने अटक करून धुळे कारागृहातच रवानगी केली.
 तेथे त्यांचे दोन वर्षे म्हणजे १९४२ पर्यंत वास्तव्य होते. यावेळी सानेगुरूजींनी त्यांची ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना लिहिली.  ती खूपच प्रसिद्ध झाली. अशा पद्धतीने स्वातंत्र्यलढ्यात धुळ्याचा मोठा सहभाग दिसून येतो. 

Web Title: Saneguru's Dhule was in jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे