The problem of traffic congestion near the Dhule Bazar committee | धुळे बाजार समितीजवळ वाहतुक कोंडीची समस्या
धुळे बाजार समितीजवळ वाहतुक कोंडीची समस्या

आॅनलाइन लोकमत
धुळे :येथील बाजार समितीसमोर एकाचवेळी अनेक वाहने आल्याने सकाळी जवळपास अर्धातास वाहतुकीची कोंडी झालेली होती. वाहतूक सुरळीत करतांना पोलिसांनाही कसरत करावी लागली होती.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या पारोळा रस्त्यावर बाजार समिती आहे. अगोदरच या रस्त्यावर एस.टी.सह इतर वाहनांची वर्दळ असते. त्यातच दर मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातील विक्रेते वाहनातून माल घेऊन येत असल्याने, वाहनांची अधिकच गर्दी होत असते.
बाजार समितीत येणारी वाहने तसेच शहरातून बाहेर जाणारी वाहने व बाहेरगावाहून शहरात येणारी वाहने एकाचवेळी आल्याने बाजार समिती परिसरात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली होती. त्यातच दुचाकी व कारचालकांनी पुढे निघण्याच्या प्रयत्नात मध्येच वाहने उभी केल्याने, कोंडीत अधिक भर पडली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने उभी असल्याने, गाड्या मागे-पुढेही घेता येत नव्हत्या.बाजार समितीसमोर वाहनांच्या रांगा लागल्या तरी त्याठिकाणी वाहतूक पोलिसांचा पत्ता नसल्याने, वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. अखेर नागरिकांनीच पुढाकार घेऊन काही वाहनांना थांबवून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी वाहतूक पोलीस पोहचले. त्यांनाही वाहतूक सुरळीत करतांना तारेवरची कसरत करावी लागली होती.
बाजार समितीच्या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असून, त्याठिकाणीही दुचाकी व इतर वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडत असते.


Web Title: The problem of traffic congestion near the Dhule Bazar committee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.