यावेळी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण काटे, डॉ. तेजस जैन,
आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, संजय तावडे, अहमद शेख, पंकज चौधरी, संजय चंदणे, पंकज बोरसे, छोटू ढोले, इस्माईल पिजांरी, मनोज सोनवणे, अनिल सिसोदिया, आदी उपस्थित होते.
कोरोनाची वाढती बाधा, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार रावल यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या. उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णास वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे, अशी सूचना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
आमदार रावल म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयातील ज्या समस्या असतील त्या सांगा, आपण त्या समस्या सोडविणार. दोंडाईचा नगरपालिका माध्यमाने मदत करणार. आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय साहित्य व इतर सोयी उपलब्ध करून देणार.
कोरोनाचे सर्वत्र संकट बघता कोणीही गाफील राहू नका.
रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा, असे आवाहन करून आगामी काळात रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज पाहता लवकरच दोंडाईचा व शिंदखेडा येथे जागा उपलब्ध झाल्याबरोबर ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाईल, असे सांगितले. १०२ क्र.च्या रुग्णवाहिकेबाबत ते म्हणाले की, या रुग्णवाहिकेवर २४ तास डॉक्टर व चालक राहणार असून रुग्णास उपचारासाठी या रुग्णवाहिकामार्फत जाता येईल.
उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांवर उपचार करण्यास अडचण असल्याने दादासाहेब रावल स्टेडियमला उपचाराची सोय करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सद्य:परिस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात ६५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था असून लवकरच ती १०० बेडची करण्यात येईल. कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारण न करता आपणास काय योगदान देता येईल ते द्या, असेही आवाहन त्यांनी केले.