धुळे : शिरपूर तालुक्यात मध्य प्रदेश सीमेलगतच्या आदिवासी पाड्यांमध्ये लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. डोंगराळ भागातील कुटुंबे मंजुरीसाठी स्थलांतरित होत असत. पण लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले. आदिवासी महिला लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन दहा ते बारा किलोमीटर पायी जाऊन बोराडी या बाजारपेठेच्या गावात मोळी विकून ८० ते ९० रुपये कमवायचे. परंतु लॉकडाऊनच्या काळात सर्वच बंद असल्याने मोळी विकणेही बंद झाले. अशा परिस्थितीत किराणासाठी पैसे नसल्यामुळे रेशन दुकानावरून मिळालेला तांदूळ शिजवून नुसताच भात खायची वेळ या लोकांवर आली आहे. तर थोडाफार किराणा आणावयाचा असेल तर रेशनमध्ये मिळालेले धान्य दुकानात विकून किराणा आणण्याची वेळ आदिवासीं कुटुंबांवर आली आहे.
ही बाब लक्षात घेत बोराडीच्या पुढे मध्य प्रदेश सीमेवरील आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये कार्यरत यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून मोळी विकणाऱ्या १०० आदिवासी कुटुंबांना पहिल्या टप्प्यात किराणा किट उपलब्ध करून दिले. गुऱ्हाडपाणी, सितारापाडा या पाड्यांमध्ये किमान एका कुटुंबासाठी साधारणपणे १० दिवस पुरेल एवढा किराणा या कुटुंबांना देण्यात आला. त्यामुळे या कुटुंबांना चांगला आहार आणि आधार मिळाला आहे.
तसेच पुढील टप्प्यात जवळपास ३०० कुटुंबांना या भागात अशा प्रकारच्या मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन यंग फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी राजेंद्रसिंग पावरा, संदीप देवरे, चेतना अमृतकर आदी परिश्रम घेत आहेत.