चौथ्या दिवसांपासून आरास भाविकांसाठी खुल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:35 PM2019-09-05T22:35:16+5:302019-09-05T22:35:47+5:30

आरास बघण्यासाठी होऊ लागली गर्दी   : मोजक्या मंडळांतर्फे सजीव आरास सादर करण्यावर भर, विविध विषयांवर प्रबोधन

Fourth day open to adorers | चौथ्या दिवसांपासून आरास भाविकांसाठी खुल्या

भगवा चौक गणेश मंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या सजीव आरासच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आदी विषयांवर प्रबोधन करण्यात येत आहे

Next

धुळे :  शहरात सोमवारी अतिशय धुमधडाक्यात गणरायांचे आगमन झाल्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर सर्वच सार्वजनिक मंडळांची आरास पूर्ण झालेली आहे. चौथ्या दिवसापासून आरास बघण्यासाठी भाविकांची ठिकठिकाणी गर्दी होवू लागली आहे. सजीव आरास लक्षवेधक ठरू लागल्या आहेत. 
यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सर्वच  मंडळांतर्फे अगदी जल्लोषात ‘श्रीं’चे  स्वागत  करण्यात आले. परंतु गेल्या महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवीत व वित्तहानी झाली. त्यामुळे मोजक्या मंडळांनीच यावर्षी मोठ्या आरास सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित मंडळांनी केवळ भव्य-दिव्य, आकर्षक  मूर्ती स्थापनेवरच भर देवून आरासवर होणारा खर्च टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
दरम्यान गणेश चतुर्थीपासून सुरवातीचे दोन दिवसात वरूणराजाने दमदार हजेरी लावल्याने, अनेक मंडळांना आपल्या आरास, अथवा सजावटीचे काम पूर्ण करता आले नव्हते. आरासचे काम सुरू केल्याबरोबर पावसाचे आगमन होत असल्याने, मंडळांच्या कार्यकर्त्यांना मूर्ती झाकणे, प्लॅस्टिकचा कागद आंथरणे, वीज पुरवठा बंद करणे आदी गोष्टी करतांना त्यांची दमछाक होत होती. 
परंतु बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने, मंडळाच्या कार्यकर्त्यांना राहिलेले काम पूर्ण करता आले. त्यामुळे अखेर तिसºया दिवशी आरासचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गुरूवारपासून आरास बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. अनेक मंडळांनी सजीव आरास सादर करण्यावरच सर्वाधिक भर दिलेला आहे. 
ज्या मंडळांनी केवळ मोठी मूर्ती स्थापन केली आहे, त्यांनीही आपल्या मंडळाच्या परिसरात  महापुरामुळे झालेले नुकसान,  बेटी-बचाओ-बेटी पढाओ, पाणी वाचवा, गड-किल्यांचे संरक्षण, संवर्धन करा आदी विषयांवर  समाज प्रबोधनाबरोबरच एक वेगळा संदेशही दिलेला आहे. 
रस्ते गर्दीने फुलू लागले
दरम्यान चौथ्या  दिवसांपासून गणेश मंडळांच्या आरास भाविकांसाठी खुल्या झाल्याने, आता रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास हळूहळू गर्दी होऊ लागली आहे. गणेश भक्तांमुळे गर्दी फुलू लागले आहे. मंडळांनी तयार केलेल्या आरासला भाविकांकडून दाद मिळू लागल्याने, कार्यकर्त्यांनाही समाधान वाटू लागले आहे. तसेच भल्या मोठ्या मूर्तीही लक्षवेधक ठरत आहेत. पावसाने उघडीप घेतल्यास अजून गर्दी होऊ शकेल.
पुढील सहा-सात दिवस भाविकांना वेगवेगळ्या आरास बघायला मिळणार आहेत. 
भगवा चौक गणेश मंडळातर्फे सजीव आरास
*शहरातील भगवा चौक गणेश मंडळातर्फे  ज्वलंत प्रश्नावर सजीव आरास सादर करण्यात येत आहे. यात सजीव आरासमधून शिक्षण, आरोग्य, मोबाईल, प्लॅस्टिकबंदी आदींवर जनजागृती करण्यात येत आहे. मोबाईल हा संपर्कासाठी प्रत्येकासाठी आवश्यक झालेला आहे. मात्र त्याचा अतिरेक झाला तर काय दुष्परिणाम होतात हे यातून दाखविण्यात आले आहे. तर शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातलेली आहे. असे असतांनाही काहीजण प्लॅस्टिकचा वापर करतात. प्लॅस्टिकपासून होणारे दुष्परिणाम या सजीव आरासमधून दाखवित प्लॅस्टिकचा वापर टाळा असा संदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर शिक्षण किती महत्वाचे आहे हे देखील या सजीव आरासच्या माध्यमातून पटवून दिले आहे. आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. 
*डी.के. डान्स गृपचे कार्यकर्ते ही जवळपास १० मिनिटांची सजीव व प्रबोधनपर आरास सादर करीत आहेत. यात दीपक साळुंके, तन्वी शर्मा, महेश माळी, नितीन वानखेडे, पवन भगत, प्रभाकर पाटील, भावेश अहिरराव, भूषण संसारे, अनिल सोनवणे, चेतन नेतकर या कलाकारांचा समावेश आहे. 
*भगवा चौक गणेश मंडळातर्फे दरवर्षीच समाज प्रबोधनपर आरास सादर करण्यात येत असते. मंडळाचे हे १८ वे वर्ष आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भुपेंद्र लहामगे, संजय गुजराथी, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पंकज गोरे हे आहेत. मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष सुरेश जडे, उपाध्यक्ष राम परदेशी, कुणाल मराठे, स्वागताध्यक्ष सुहास शिर्के व अनेक सदस्यांचा समावेश आहे.

Web Title: Fourth day open to adorers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे