लागवडीच्या कांदा रोपांवर करपा रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:19 PM2019-11-20T23:19:45+5:302019-11-20T23:20:19+5:30

रब्बी हंगाम : रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ घटणार, गहू, हरभरा, मका पिकांच्या क्षेत्रात होणार वाढ

Crab disease on cultivated onion plants | लागवडीच्या कांदा रोपांवर करपा रोग

Dhule

googlenewsNext

मालपूर : कांद्यापाठोपाठ आगामी रब्बी हंगामासाठी टाकलेल्या रांगडा कांद्याच्या रोपांवर देखील करपा रोग आल्यामुळे मालपूरसह परिसरात कांदा रोप बसण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामाच्या लागवड क्षेत्रात येथे मोठी घट होणार असल्याने कांदा लागवड क्षेत्र घटणार आहे. तर गहू, हरभराच्या क्षेत्रफळात वाढ होईल तर खरीपातील कपाशीचे पीक शेताबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.
मालपूरसह संपूर्ण परिसरातील सुराय, अक्कलकोस, कर्ले, परसोळे, वैंदाणे, ऐचाळे, दुसाणे, इंदवे, हट्टी आदी संपूर्ण भागात खरीप व रब्बी हंगामातील रांगडा कांदा, सफेद कांदा आदी पिकांचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे खरीपातील कांदा उत्पादन घटले होते. तुटपूंज्या पाण्याच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण कांदा नासवला. बाजारपेठेतील सध्याचा कांद्याचा दर बघता अनेक शेतकऱ्यांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखून त्यादृष्टीने तयारी देखील केली. मात्र कांदा पाठोपाठ नवीन टाकलेल्या रोपांवर देखील करपा या रोगाचे अतिक्रमण झाल्यामुळे आता नाईलाजास्तव गहू, हरभरा या पिकाकडे वळावे लागणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे.
कांदा लागवड करायची असेल तर दोन्ही हंगामात महिना दीड महिना अगोदर तयारी करुन कांद्याचे प्रथम त्या-त्या हंगामानुसार प्रमाणित केलेले बियाणे टाकून रोप तयार करावे लागते. हे रोप साधारण दीड महिन्यानंतर लागवडीयोग्य तयार झाल्यावर क्षेत्रफळ तयार करुन मजुरांच्या सहाय्याने वाफे पद्धत किंवा बेडवर ठिबक सिंचनच्या सहाय्याने लागवड येथील शेतकरी करतात. वाफे पद्धतीत सुद्धा सर किंवा गादी वाफे या पद्धतीने लागवड होत असते. मात्र लागवडीसाठी आता या करपा रोगामुळे रोपच शिल्लक राहणार नसल्यामुळे पाणी असून देखील येथे कांदा पिकाचे क्षेत्रफळ घटणार असल्याचे सध्या दिसत आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला व त्यापाठोपाठ जबरदस्त दाट धुके म्हणजे धुव्वारीच्या अतिक्रमणामुळे शेतकºयांची कांदा लागवडीसाठी टाकलेली संपूर्ण रोपेच बसून गेलीत. यात अजून कांदा रोगांचे देखील एकदम अ‍ॅटेक झाल्यामुळे रोपांचे होत्याचे नव्हतेच झाले. चांगली वाढीस लागलेली रोपांची पात करपून नाहिशी झाल्यामुळे कांदा लागवडीवर पाणी सोडावे लागणार आहे.
विकत रोप आणून लागवड केल्यास मजुरी व खर्च जास्त वाढतो. यामुळे येणारे उत्पन्नातून खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे घरचेच रोप या उत्पादनासाठी सोयीस्कर असते, असे येथील कांदा उत्पादक शेतकरी सांगतात.
आजच्या कांद्याचा बाजारपेठेतील भाव लक्षात घेता बºयाच शेतकºयांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखला होता. या तीन महिन्यात तिसºयांदा कांद्याने सहा हजाराच्या वर आकडा गाठला आहे. यामुळे येथील शेतकºयांना चांगल्या आशा देखील पल्लवीत झाल्या होत्या. कांदा पिकाला भरपूर पाणी लागते व यावर्षी येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून नदी नाले आजतापागायत दुथडी भरुन वाहत आहे.
परिणामी विहिरी देखील ओसंडून वाहत आहे म्हणून पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सुटला असताना रोपे शिल्लक नसल्यामुळे कांदा लागवड क्षेत्रफळ घटणार आहे. तर नाईलाजास्तव रब्बीतील गहु, हरभरा, मका या पिकाकडे वळावे लागणार असल्याने या पिकाचे क्षेत्रफळात वाढ होणार आहे.

Web Title: Crab disease on cultivated onion plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे