शहरातील आरक्षण क्र. ३२/३३ वरील गाळे लिलावातून संकलित झालेल्या रकमेतून शहरातील लोकोपयोगी कामे व्हावीत, यासाठी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी कळंब नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मशानभूमी आधुनिकीकरण, पुनवर्सन सावरगावमध्ये नर्सरीच्या जागेत फक्त महिलांसाठी व्यायामशाळा व फक्त महिलांसाठी बगिचा आणि जुन्या मंगल कार्यालयाच्या जागी अद्ययावत असे २० अटॅच बाथरूम, दोन डायनिंग हाॅल, फंक्शन हाॅल, लाॅन असे मल्टिपर्पज हाॅलचे काम सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यातील मल्टिपर्पज हाॅलचे प्रकरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाले असून, लवकरच निविदा निघेल. उर्वरित दोन्ही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या; परंतु, तांत्रिक मुद्दा पुढे करून शिवसेनेचे कार्यकर्ते विजय पारवे यांनी या कामांवर स्थगिती आणण्यासाठी नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. न. प. तील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली होती. आघाडी सरकारमध्ये नगरविकास विभाग सेनेकडे असल्याने काही दिवसांपूर्वी या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचे पत्र त्या विभागाने काढले होते.
शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकास कामांना ब्रेक लागल्याने नागरिकांत नाराजी होती. अनेकांनी पालिकेत जाऊन सत्ताधारी मंडळींना प्राधान्य तत्वावर ही कामे करण्याची विनंती केली. याची गंभीरता लक्षात घेऊन २८ डिसेंबर २०२० रोजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे व उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून वस्तुस्थिती विषद केली. काम व निविदा योग्य असल्याबाबतचे विविध तज्ज्ञ आणि अधिकार असलेल्या खात्याचे प्रमाणित पत्र तसेच जनभावना व या कामाची लोकोपयोगीता त्यांच्या लक्षात आणून दिली. मंत्री शिंदे यांनीही याची सविस्तर माहिती घेऊन अशी कामे अडवणे योग्य नाही म्हणून स्थगिती आदेश मागे घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर ६ जानेवारी रोजी याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने निर्गमित केले.