डोस कमी अन् लाभार्थी अधिक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:25+5:302021-07-04T04:22:25+5:30
ढोकी/तेरखेडा : प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या डोसच्या जवळपास तीनपट अधिक लाभार्थी लस घेण्यासाठी पहाटेपासून केंद्रावर दाखल झाले. यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील ...

डोस कमी अन् लाभार्थी अधिक !
ढोकी/तेरखेडा : प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या डोसच्या जवळपास तीनपट अधिक लाभार्थी लस घेण्यासाठी पहाटेपासून केंद्रावर दाखल झाले. यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे शनिवारी दिसून आले. शिवाय, नियोजन करताना स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही मोठी धांदल उडाली.
ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शनिवारी लसीकरणासाठी २०० डोस उपलब्ध झाले होते. यातील १०० पहिल्या तर १०० दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी होते. शनिवारी जनता कर्फ्यू असतानादेखील कोराेनाची लस घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी जमली होती. अचानक झालेल्या गर्दीने आरोग्य कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. केवळ दोनशे डोस मिळाल्याचे समजताच गोंधळ सुरू झाल्याने फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला. दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी येऊन टोकन घ्यावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे नागरिक सकाळपासून दाखल झाले होते.
तेरखेडा केंद्रावरदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ६ वाजल्यापासून तेरखेडासह परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणीही उपस्थित नसल्याचे दिसून आले. येथे शनिवारी २१० डोस प्राप्त झाले होते. परंतु, लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांची संख्या सहाशेहून अधिक होती, असे आरोग्य विभागाचे सुपरवायझर जाधवर यांनी सांगितले.
कोट.........
तेरखेडा लसीकरण केंद्रावर शनिवारी २१० डोस प्राप्त झाले होते. परंतु, लाभार्थ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे दुपारनंतर इतर ठिकाणी शिल्लक राहिलेले १०० डोस मागवून घेऊन उर्वरित लाभार्थ्यांनादेखील लसीकरण करण्यात आले.
- डॉ. गोवर्धन महिंद्रकर, तालुका आरोग्य अधिकारी, वाशी
030721\20210703_111124.jpg
फिजिकल डिस्टींगचा फज्जा