बॉम्ब बनवला अन् निकामी करायला पोलिसात गेला; कुरापतखोर युवकाचा प्रताप बघून प्रशासन हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:18 AM2021-06-14T07:18:58+5:302021-06-14T07:20:04+5:30

Bomb making on you tube video: एका  थैलीत हा जिवंत बॉम्ब ठेवला व तो सरळ नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने तेथील पोलीस हवालदार मडावी यांना आपल्याजवळ बॉम्ब असल्याची माहिती दिली. 

youth rahul pagade make bomb after saw on youtube; went to police to defuse in Nagpur | बॉम्ब बनवला अन् निकामी करायला पोलिसात गेला; कुरापतखोर युवकाचा प्रताप बघून प्रशासन हादरले

बॉम्ब बनवला अन् निकामी करायला पोलिसात गेला; कुरापतखोर युवकाचा प्रताप बघून प्रशासन हादरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : एका रिकाम्या कुरापतखोर युवकाने यू-ट्यूबचे व्हिडीओ बघून चक्क बॉम्ब तयार केला. पण तो निकामी कसा करायचा याची माहिती नसल्याने त्याची तंतरली. मग त्याने तो जिवंत बॉम्ब पिशवीत टाकून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले. बऱ्याच परिश्रमानंतर बॉम्ब निकामी करण्यात आला. त्यामुळे स्फोटाची घटना टळून अनेकांचे जीव वाचले. (Youth made bomb at home, but after he went to police.)

नंदनवन पोलीस ठाण्यात शनिवारी हे थरारनाट्य घडले. राहुल युवराज पगाडे (२५) असे या ‘काडीबाज’ आरोपीचे नाव आहे. नंदनवन ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात तो राहतो. यू-ट्यूबवर बॉम्ब कसा बनवायचा, याचे त्याने व्हिडीओ बघितले आणि त्याच्या डोक्यात बॉम्ब बनविण्याचा किडा वळवळू लागला. त्यानुसार त्याने बॅटरी, इलेक्ट्रिक सर्किट, तसेच इतर साहित्य जमविले आणि बॉम्ब तयार केला. बॉम्ब तयार तर झाला, आता तो निकामी कसा करायचा, असा प्रश्न त्याला पडला. ते तंत्र त्याला अवगत नव्हते. बॉम्बचा स्फोट होऊ शकतो आणि आपला जीव जाऊ शकतो, याची त्याला कल्पना आल्याने तो नखशिखांत हादरला. काय करावे हे त्याला कळेना. 

अखेर त्याने एका  थैलीत हा जिवंत बॉम्ब ठेवला व तो सरळ नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने तेथील पोलीस हवालदार मडावी यांना आपल्याजवळ बॉम्ब असल्याची माहिती दिली. 

मनोरुग्ण असावा, असे समजून पोलिसांनी आधी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याने शांतपणे पिशवीतून बॉम्ब काढला आणि पोलिसांपुढे ठेवला. जिवंत बॉम्ब पुढ्यात बघून ठाण्यात एकच खळबळ उडाली. ठाणेदार  मुक्तार शेख यांनी लगेच वरिष्ठांना, तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला माहिती देऊन ठाण्यात बोलावून घेतले. दोन मिनिटांतच संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे झाले. बॉम्बनाशक पथक ठाण्यात पोहोचले. त्यांनी बॉम्ब बघितला. तो ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेला. बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट बॅटरीपासून वेगळे केले व बॉम्ब निकामी केला.

यंत्रणेचा जीव भांड्यात 
नंदनवन ठाण्यात एक माथेफिरू जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचल्याचे कळताच शहर पोलीस यंत्रणा हादरली. अनेक वरिष्ठांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. बॉम्ब निकामी झाल्याचे कळताच पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला.  

पोलिसांची गोपनीयता
विशेष म्हणजे या खळबळजनक घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून शनिवारी आणि रविवारी सकाळपर्यंत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती, हे विशेष! 
आरोपी गजाआड
आरोपी राहुल पगाडेविरुद्ध भारतीय हत्यार कायदा सहकलम १२३, तसेच भादंविच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title: youth rahul pagade make bomb after saw on youtube; went to police to defuse in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.